इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांना टक्कर देण्यासाठी यूएसस्थित एका ईव्ही स्टार्टअप कंपनीने कंबर कसली आहे. याचा सर्वांत जास्त फायदा भारताला होणार आहे. कारण या कंपनीने येत्या काही दिवसांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहने लॉंच करण्याच्या आपल्या योजनांची पुष्टी केली आहे. ही कंपनी म्हणजे फिस्कर. पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंत या कंपनीच्या फ्लॅगशिपच्या गाड्या भारतामध्ये धावताना दिसतील, असेही कंपनीने सांगितले आहे. कमी आयात शुल्क सुरक्षित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे कंपनी स्थानिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे या ईव्हीची किंमत कमी ठेवण्यास मदत होईल.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे सीईओ हेन्रिक फिस्कर यांनी सांगितले, “यूएसस्थित फिस्कर भारतामध्ये नफा कमावण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर इतर देशांच्या तुलनेत कमी असला, तरीही आम्हाला येथे प्रथम-प्रवर्तक फायदा मिळवायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “शेवटी, भारत पूर्ण इलेक्ट्रिक होईल. तो कदाचित यूएस, चीन किंवा युरोप इतका वेगवान होणार नाही, परंतु आम्ही येथे येणार्या पहिल्या लोकांपैकी एक होऊ इच्छितो.”
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारतात ईव्ही लाँच करण्याची त्यांची योजनेला स्थगिती दिल्यानंतर काही महिन्यांनी फिस्करने भारतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाला भारतात कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करात सूट हवी होती. तसेच आधी चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून टेस्लाला भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा होता. या गोष्टीवरुन हा प्रस्ताव बराच काळापासून रखडला आहे. फिस्करलाही कोणतीही सवलत मिळवण्यात यश आलेले नाही, मात्र तरीही त्यांनी भारतातील व्यवसायाचे नियोजन केले आहे. “शेवटी, जर तुम्हाला भारतात काही प्रमाणात मोठे व्हॉल्यूम मिळवायचे असेल, तर तुम्हाला येथे वाहन निर्मिती सुरू करावी लागेल किंवा किमान असेंब्ली करावी लागेल.” फिस्कर म्हणाले.
बाईकच्या डिस्क ब्रेकला छिद्र का असतात? कारण जाणून तुम्हीही हैराण व्हाल
फिस्करची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ओशन याआधी युनायटेड स्टेट्समध्ये लॉंच झाली आहे. ओशन एक्सट्रीम एसयूव्ही एका चार्जमध्ये ५६३ किमीची रेंज प्रदान करते, तर ओशन अल्ट्रा ५४७ किमीची रेंज देते. दुसरीकडे टेस्ला मॉडेल वाय एका चार्जवर ५३१ किमीची रेंज देते. द ओशन स्पोर्ट प्रति चार्ज ४०२ किमीची श्रेणी देते. ओशन एसयूव्ही निकेल-आधारित आणि लोह-आधारित बॅटरी वापरतात.
फिस्कर ओशन हाय-रेंज मॉडेल्स ऑल-व्हील ड्राइव्ह या मानक वैशिष्ट्यासह येतात. तसेच या एसयूव्हीची डिझाइन अतिशय स्टायलिश आणि अनोख्या वैशिष्ट्यांसह आहे. ओशन एक्सट्रीम या इलेक्ट्रिक एसवायव्हीच्या उच्च ट्रिमला सौर छत मिळते जे दरवर्षी ३,२१८ किलोमीटर ड्रायव्हिंगसाठी पुरेशी उर्जा पुरवते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये एक हॉलीवूड मोड आहे, जो एसयूव्हीच्या मोठ्या १७.१ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमला लँडस्केपपासून पोर्ट्रेट ओरिएंटेशनपर्यंत फिरवतो. फिस्करचा असाही दावा आहे की एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत ओशन एसयूव्ही आपल्या मालकाच्या घराला उर्जा देऊ शकेल आणि इतर इलेक्ट्रिक वाहनांना देखील चार्ज करू शकेल.
पीअर नावाची लहान पाच आसनी कार, हे फिस्करचे आगामी इलेक्ट्रिक वाहन आहे. कंपनी २०२६ नंतर हे वाहन भारतात लॉंच करण्याचा विचार करू शकते. कंपनी भारतात प्लांट उभारण्यासाठी किती गुंतवणूक करत आहे हे फिस्करने उघड केले नाही. त्यांचा व्यवसाय सक्षम करण्यासाठी दरवर्षी किमान ३० ते ४० हजार युनिट्स लागतील असे ते म्हणाले. ५० हजार युनिट्सची वार्षिक उत्पादन क्षमता साध्य करण्यासाठी, फिस्करला सुमारे ८०० दशलक्ष डॉलर खर्च येईल. फिस्कर सध्या नवी दिल्ली येथे सुरू होणारे आपले पहिले शोरूम उघडण्यासाठी जागेच्या शोधात आहे. तसेच, ते ऑटो पार्ट्स पुरवठादारांनाही भेटत आहे.