रस्त्यावर धावणारी वाहनं कायम आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्याचा आकार, रंग आणि फिचर्सची कायम चर्चा होत असते. महागड्या कारची चर्चा तर जोरदार होत असते. मात्र या व्यतिरिक्त गाड्यांवर असलेले नंबर प्लेट्स लक्ष वेधून घेतात. कारण या नंबर प्लेटवरील रंगाचा अर्थ प्रत्येकाला माहिती असतो असं नाही. तुम्हालाही अनेकदा प्रश्न पडला असेल पांढऱ्या, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ नेमका आहे तरी काय? रस्त्यावर धावण्याऱ्या गाड्या विशेष उपयोग दर्शवत असतात. चला तर मग जाणून घेऊयात या कोणत्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ काय आहे?
- हिरव्या रंगाची नंबर प्लेट – सध्या देशात इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या सर्रास पाहायला मिळत आहे. हिरव्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ इलेक्ट्रिक वाहनांवर लावली जाते. हिरव्या रंगाचे नंबर प्लेट ही खासगी आणि व्यावसायिक वाहनांवर लावली जाते. पण या नंबर प्लेटवरील अंक हे त्या त्या वर्गवारीनुसार लावले जातात. म्हणजे जर एखादे इलेक्ट्रीक वाहन हे खासगी असेल, तर त्यावरील अंक हे पांढरे असतात. तर जी कारही व्यावसायिक असेल त्यावरील अंक हे पिवळ्या रंगाचे असतात.
- पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट – सफेद किंवा पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ खासगी वाहनांसाठी दिली जाते. जर तुमच्या घरी एखादी मोटारसायकल किंवा कार असेल तर त्याची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते.
- पिवळ्या रंगाची नंबर प्लेट – पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ सार्वजनिक आणि व्यावसायिकपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांना दिली जाते. भारतात धावणाऱ्या बहुतांश बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. त्यासोबतच व्यावसायिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. यात ट्रेलर, ट्रक, मिनी ट्रक यासारखे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांकडे व्यावसायिक वाहनचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
- काळ्या रंगाची नंबर प्लेट – काळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ भाड्याने दिलेल्या व्यावसायिक वाहनांवर पाहायला मिळते. अनेक भाड्याच्या कारवर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. ज्यावर पिवळ्या रंगात क्रमांक लिहिला जातो.
- लाल नंबर प्लेट – लाल रंगाची नंबर प्लेट ही फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या नंबर प्लेटमध्ये क्रमांकाऐवजी अशोक चक्र असते. याशिवाय लाल रंगाची नंबर प्लेट ही एखाद्या कार निर्माती कंपनी चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवरही असते. या वाहनांना त्यावेळी तात्पुरता नंबर दिला जातो.
Hero Destini 125 vs Suzuki Access 125: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोण वरचढ जाणून घ्या
- निळ्या रंगाची नंबर प्लेट – परदेशी प्रतिनिधींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जातात. या गाडीतून केवळ परदेशी राजदूत प्रवास करु शकतात.
- वर दिशेला बाण असलेली नंबर प्लेट – रस्त्यावर या अनोख्या प्रकारची नंबर प्लेट दिसणार नाही. पण जर तुम्ही अशी प्लेट पाहिली असेल तर समजून घ्या की ते सैन्याचे वाहन आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत या प्लेटवर क्रमांक नोंदवले जातात.