Driving Tips: उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या की, किल्ल्यांचे सौंदर्य आणि डोंगरावरील निसर्ग पाहणं, तसेच सामान्य शहरी दिनचर्येतून विश्रांती घेण्यासाठी अनेक जण गड, किल्ले, हिल स्टेशनवर फिरायला जायचा प्लान करतात. ज्यांना गाडी चालवायला आवडते त्यांच्यासाठी ही चांगली संधी असते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसांत रस्ते खूप तापतात. त्याशिवाय डोंगरावरही खूप ऊन लागते. त्यामुळे कारचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, डोंगर किंवा टेकड्यांमधून तुमची ड्रायव्हिंग सर्वांत संस्मरणीय बनविण्यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.

डोंगराळ भागात गाडी चालवताना अशी घ्या काळजी

कधीही ओव्हरटेक करू नका

महामार्गांवर किंवा अगदी शहरी रस्त्यांवरही ओव्हरटेक करणे ठीक आहे; परंतु टेकडी किंवा डोंगरावर असताना, कधीही दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने समस्या निर्माण होऊ शकते. डोंगराळ रस्ते अरुंद आणि अवघड वळणांनी भरलेले असतात, अशा रस्त्यांवर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने तुमच्यासाठी आणि इतर वाहनचालकांसाठीही तो जीवघेणा अपघाताचा प्रसंग ठरू शकतो.

वाहन हळू चालवा

डोंगराळ रस्त्यांवर कमी गतीने गाडी चालवल्याचे अनेक फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे तुमच्या वाहनाचे नियंत्रण तुमच्या हातात राहील. कोणत्याही धोकादायक परिस्थितीत जास्त वेगाने गाडी चालवण्यापेक्षा कमी गतीने गाडी चालवण्यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे खूप सोपे जाते. दुसरी बाब म्हणजे हळू गाडी चालवल्याने तुम्हाला रस्ते आणि परिसराचा थोडासा आनंद घेता येईल.

योग्य गिअरमध्ये गाडी चालवा

डोंगरावर गाडी चालवताना पाळावी लागणारी सर्वांत महत्त्वाची सूचना म्हणजे चढाई करताना योग्य गिअरमध्ये गाडी चालवणे; विशेषतः उतारावर येताना. चढाई करताना, गुरुत्वाकर्षण वाहनाच्या विरोधात काम करते आणि त्यामुळे साहजिकच वाहनाचा वेग कमी होतो. म्हणून कमी गिअरमध्ये गाडी चालवा, उतारावर येताना, पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये गाडी चालवा. कारण- कमी गिअरमध्ये गाडी चालवल्याने गाडीचा वेग वाढणार नाही आणि नियंत्रण सुटणार नाही.

इंजिन ब्रेकिंग वापरा

इंजिन ब्रेकिंग ही ब्रेकिंगची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. उतारावरून येताना गाडी हळू चालवा आणि ब्रेक पॅड जळून निकामी होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी या तंत्राचा वापर करा.

अर्धा क्लच दाबून गाडी चालवू नका

अनेक चालक क्लच अर्ध्यावर दाबून गाडी चालवतात. असे केल्याने क्लच पूर्णपणे सुटत नाही. तसेच त्यामुळे क्लच प्लेट जळू शकते.

Story img Loader