ज्या ग्राहकांनी ओला कंपनीला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटरसाठी आधीच २०,००० रुपये दिलेले आहेत, अशा ग्राहकांसाठी ओला इलेक्ट्रिक २१ जानेवारी रोजी अंतिम पेमेंटची व्यवस्था करणार आहे. ओलाचे अध्यक्ष आणि गट कार्यकारी अधिकारी भाविष अग्रवाल यांनी शुक्रवारी यासंबंधी माहिती दिली. जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांदरम्यान नवीनतम खरेदीसाठी स्कूटर पाठवल्या जातील. ज्यांनी पूर्वीच या इलेक्ट्रिक स्कुटरची खरेदी केलेली आहे अशांना या स्कुटर पाठवण्यात आल्याचे कंपनीने गेल्या महिन्यात सांगितले.
“स्कुटरचा सागर वाट पाहत आहे ! ज्या ग्राहकांनी २०,००० रुपयांची रक्कम आधीच भरलेली आहे, त्यांच्यासाठी २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता ओला अॅपमधील अंतिम पेमेंटसाठी विंडो उघडली जाईल. यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये स्कुटर पाठवली जाईल.” असे कंपनीच्या कारखान्यातील स्कुटरचा व्हिडीओ शेअर करत अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये त्यांच्या ग्राहकांना लोहरी, मकर संक्रांती आणि पोंगलच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, एस-वन आणि एस-वन प्रो लॉन्च करून ग्रीन व्हेइकल क्षेत्रात प्रवेश केला. त्याची किंमत अनुक्रमे ९९,९९९ रुपये आणि १,२९,९९९ रुपये इतकी होती. परंतु जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याचे कारण देत कंपनीने आपली बहुप्रतिक्षित वितरण अंतिम मुदत पुढे ढकलली होती.
फक्त १९ हजार देऊन घरी घेऊन जा Yamaha R15 V4 स्पोर्ट्स बाईक; स्टाईलसोबतच मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स
हिरो मोटोकॉर्प एथर एनर्जीमध्ये करणार ४२० कोटी रुपयांची गुंतवणूक
दरम्यान, भारतातील सर्वांत मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पच्या संचालक मंडळाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता एथर एनर्जीमध्ये ४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एथर एनर्जीमध्ये एक किंवा अधिक टप्प्यात गुंतवणूक करण्यात मान्यता देण्यात आल्याचे याबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिरो मोटोकॉर्पने एथर एनर्जीमध्ये प्रस्तावित गुंतवणुकीपूर्वी ३४.८% हिस्सा घेतला होता.
या गुंतवणुकीनंतर त्यांची हिस्सेदारी वाढेल, मात्र एथरचे भांडवल उभारण्याची फेरी पूर्ण झाल्यानंतरच नेमकी रक्कम ठरवली जाईल. “आम्ही एथर एनर्जीमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहोत. गेल्या काही वर्षांत त्यांनी केलेली प्रगती पाहून आम्हाला आनंद झाला आहे.” असे हिरो मोटोकॉर्पच्या इमर्जिंग मोबिलिटी बिझनेसचे प्रमुख स्वदेश श्रीवास्तव म्हणाले. हिरो मोटोकॉर्प या वर्षी मार्च महिन्यात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संशोधन आणि विकास केंद्रात हे वाहन विकसित केले जात असून चित्तूर प्लांटमध्ये त्याचे उत्पादन केले जाईल.