Bike Refueling Precautions: अनेकदा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना बाईकला अचानक आग लागते. अशा घटना हल्ली वारंवार सोशल मीडियावर पाहायला मिळतात. खरंतर, बाईकमध्ये ऑईल भरताना बाईकचालकांकडून किंवा पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांकडून नकळत काही चुका होतात, त्यामुळे बाईकला आग लागते. परंतु, बाईकमध्ये ऑईल भरताना बाईकचालकांनी काही खबरदारी घेतल्यास अशा घटना टाळता येतील.

खरंतर पेट्रोल हा एक अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे, जो कोणत्याही गरम वस्तू किंवा ठिणगीच्या संपर्कात येताच जळू लागतो. त्यामुळे बाईकमध्ये इंधनाची गळती होऊ नये, तसेच पेट्रोल भरताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे.

पेट्रोल भरण्याची योग्य पद्धत काय?

बाईकमध्ये पेट्रोल भरताना अनेकांचे लक्ष त्यांच्या हातातील मोबाइलकडे किंवा इतर दुसऱ्या गोष्टीकडे असते, त्यामुळे चुकून बाईक पेटते. पेट्रोल भरताना मोबाइल वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. पेट्रोल भरताना मोबाइल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निर्माण करणारे कोणतेही उपकरण वापरू नये. शिवाय यावेळी फोनवरही बोलू नका.

बाईकमध्ये पेट्रोल भरताना नोजलकडे लक्ष न देणे ही देखील महत्त्वाची चूक आहे. पेट्रोल पंप कर्मचारी अनेकदा ही चूक करतात. पेट्रोल भरल्यानंतर नोझल काढताना पेट्रोलचे काही थेंब दुचाकीच्या टाकीवर आणि इंजिनवर पडतात. बाईकचे इंजिन गरम असेल तर त्याच पेट्रोलच्या थेंबांना आग लागते. त्यामुळे पेट्रोल घेताना नोझलमधून तेल दुचाकीवर पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

अनेकदा पेट्रोल भरताना लोक बाईकचे इंजिन चालू ठेवतात, जे खूप धोकादायक आहे. पेट्रोल भरताना इंजिन चालू ठेवल्यास आग लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे पेट्रोल पंपावर इंजिन बंद ठेवावे.

बाईकची टाकी पूर्णपणे भरल्यास आगीचा धोकाही वाढतो, कारण टाकी पूर्ण भरली की पेट्रोल बाहेर पडते, त्यामुळे टाकी कधीही संपूर्ण भरू नये.

हेही वाचा: तुमच्याही वाहनातून सतत पांढरा धूर निघतो? ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा

पेट्रोलमुळे आग लागल्यास काय करावे?

दुर्दैवाने अशी घटना तुमच्याबरोबर किंवा तुमच्या आसपास घडत असेल तर लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करू नका. केवळ अग्निशामक यंत्राद्वारे पेट्रोलची आग विझवणे सुरक्षित आहे. पेट्रोल हे पाण्यापेक्षा हलके असते, त्यामुळे ते पाण्यावर तरंगते आणि आग लागते. अशा परिस्थितीत कार्बन डाय ऑक्साइड अग्निशामकाने आग विझवता येते.