Why Do Some Semi Truck Tires Not Touch The Ground: रस्त्यावरून चालताना विविध प्रकारची वाहने आपल्याला दिसतात. प्रत्येकाची बनावट त्याच्या कामानुसार वेगळी असते. ट्रक यासारखी वाहतूक करणारी वाहने आकाराने मोठी असतात आणि त्यानुसार त्यांची रचना केली जाते. तुमच्या लक्षात आले आहे का की, काही ट्रकचे टायर कमी असतात तर काही ट्रकचे टायर जास्त असतात. असे का असते? किंबहुना, ट्रकचे टायर जितके जास्त तितकी त्याची भार वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. वजन वाहून नेण्याची क्षमता लक्षात घेऊन ट्रक बनवले जातात आणि त्यानुसार त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात टायरही दिले जातात.
आता आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या ट्रकमध्ये जास्त टायर आहेत, त्यांचे काही टायर हवेत लटकलेले दिसतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, ते टायर हवेत का लटकलेले असतात आणि त्यांचा काही उपयोग होत नाही तरीही मग ते ट्रकमधून का काढले जात नाहीत माहितेय का? हे हवेतील टायर फक्त डिझाईनसाठी लावलेले नसतात तर यामागेसुद्धा विज्ञान आहे. चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…
(हे ही वाचा : ट्रक आणि बसच्या मागच्या बाजूला साखळ्या का लटकलेल्या असतात माहितेय का? यामागील खरं कारण जाणून व्हाल थक्क )
काही ट्रकचे टायर हवेत का लटकतात?
तुम्हाला माहिती असेल की वाहनांमध्ये दोन्ही बाजूची चाके Axle ने जोडलेली असतात. ट्रकमधील हवेत असलेली चाके किंवा टायर प्रत्यक्षात Lift Axle ला जोडलेले असतात, त्याला Retractable Axle असेही म्हणतात. हे असे टायर आहेत की, जेव्हा जेव्हा ट्रक ड्रायव्हरला अतिरिक्त चाके लागतात तेव्हा तो त्यांचा वापर करू शकतो.
जड भार वाहून नेण्यासाठी ट्रक तयार केला जातो, तेव्हा त्याला अतिरिक्त एक्सलची आवश्यकता असते. लिफ्ट एक्सल बटण दाबून हे टायर कमी किंवा उंच केले जाऊ शकते. ट्रक ओव्हरलोड असेल तर ड्रायव्हर लिफ्टचा एक्सल खाली करतो आणि हवेत लटकलेले टायरही रस्त्यावरुन चालण्याचे काम करतात. दुसरीकडे, जर ट्रकचे वजन कमी असेल किंवा तो रिकामा असेल, तर ड्रायव्हर लिफ्टचा एक्सल वाढवतो, ज्यामुळे टायर हवेत उंचावतात.
ट्रकमध्ये जेवढे जास्त एक्सल असतात तेवढे जास्त वजन ट्रक वाहू शकते. ट्रकला जास्त एक्सल असल्या कारणाने ट्रकची गती मंदावते. मात्र, जेवढे जास्त टायर्स तेवढा जास्त खर्च मेंटेनंसला येतो. ट्रक ओव्हरलोड झाल्यावरच स्पेअर एक्सल किंवा टायर खाली केले जातात. जेव्हा वजन कमी केले जाते, तेव्हा एक्सल उचलला जातो जेणेकरुन टायरची झीज होणार नाहीत आणि ते दिर्घकाळ टिकतील.