भारतीय रेल्वे सेवेत सध्या अनेक आधुनिक बदल पाहायला मिळत आहेत. मेट्रो, वंदे भारत ट्रेनपासून अनेक हायस्पीड ट्रेन्स सध्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोच पण प्रवासही सुखकर होतोय. यामुळे अनेक नव्या सेमी हायस्पीड ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यात भारतातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्सबद्दल सांगायचे झाल्यास वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस आहेत. पण जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्सबद्दल आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेन्सचा वेग किती?
जगातील सर्वात वेगवान ट्रेन्स फक्त अमेरिका, जपानमध्येच नाहीत तर भारताच्या शेजारील देश चीनमध्येही आहेत. चीनमधील शांघाय मॅग्लेव्ह नावाची ट्रेन शांघायच्या पुडोंग विमानतळापासून ते लाँगयांग रोड स्टेशनपर्यंत जोडलेली आहे. या ट्रेनचा कमाल वेग ४६० किमी /तास आहे. या सुपर स्पीड ट्रेनद्वारे नोएडा आणि अलाहाबाद दरम्यानचे ७०० किमीचे अंतर अवघ्या दीड तासांत पूर्ण करता येते.
ही ट्रेन लोखंडी चाकांवर नाहीतर हवेत धावते
या ट्रेनची एक खास गोष्ट म्हणजे तिला लोखंडी चाकं नसून ती मॅग्नेटिक लेव्हिटेशनने (मॅगलेव्ह) धावते. या टेक्निकमुळे रुळांवर चुंबकीय प्रभाव पडतो आणि ट्रेन रुळांच्या वरती हवेत राहून धावतात. ट्रॅकच्या या चुंबकीय प्रभावामुळे ट्रेन स्थिर राहते आणि कोणताही आवाज न करता वेगाने धावत राहते.
जर्मन टेक्निकचा केला वापर
मॅग्लेव्ह टेक्निक हे मूळचे जर्मनी देशाचे आहे. ही मॅग्लेव्ह ट्रेन चीनमध्ये गेल्या जवळपास एक दशकापासून धावत असून आता त्यांनी स्वदेशी बनावटीची 600 किमी/तास वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन तयार केली आहे. मात्र या ट्रेनमधून अद्याप प्रवाशांना प्रवासीची परवानगी नाही. त्यामुळेच सर्वात वेगवान ट्रेनचा किताब अजूनही शांघाय मॅग्लेव्ह ट्रेनच्या नावावर आहे.
अॅडव्हान्स बुकिंग करण्याची सोय
या ट्रेनची लांबी 153 मीटर, रुंदी 3.7 मीटर आणि उंची 4.2 मीटर आहे. यामध्ये एकूण 574 प्रवासी प्रवास करू शकतात. यामध्ये ३ प्रकारचे कोच आहेत, ज्यात फर्स्ट क्लास, सेकंट क्लास आणि एंड सेक्शनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅडव्हान्स बुकिंग करावे लागते. चिनी नागरिकांशिवाय परदेशी नागरिकांनाही या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येतो. त्यामुळे चीनमध्ये पर्यटनासाठी गेलेले अनेक पर्यटक या ट्रेनमधून प्रवास केल्याशिवाय माघारी परतत नाहीत.