कार चालवणाऱ्या लोकांना ड्रायव्हिंगशिवाय कार पार्क करणं हे काम अधिक आव्हानात्मक वाटतं. तुम्ही जर ट्रॅफिक असलेल्या किंवा माणसांची आणि वाहनाची वर्दळ असलेल्या ठिकाणी कार पार्क करत असाल तर हे काम आणखीनच कठीण वाटू लागतं. अनेक उत्तम ड्रायव्हर्स कार पार्क करताना घाबरतात. कारण कार पार्क करताना आसपासच्या कोणत्याही वस्तूला, कारला किंवा व्यक्तीला कार धडकू शकते. हे काम खूप सावधपणे करावं लागतं. पण आता हे काम सोप होणार आहे. आता तुम्हाला बिना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. आता यासाठी एक नवीन तंत्रज्ञान आलाय.
जगातील पहिले ऑटोमेटेड ड्रायव्हरलेस पार्किंग
टेस्लासारख्या कंपन्या चालकविरहित वाहनांची सुविधा देत आहेत, मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनात चालक असणे आवश्यक आहे. मात्र, आता तुम्हाला ड्रायव्हरशिवाय वाहन उभे करता येणार आहे. या वैशिष्ट्याला ‘सेल्फ-पार्किंग सिस्टम’ म्हणतात. बॉश आणि मर्सिडीज-बेंझ समूहाला पूर्णपणे स्वयंचलित स्वयं-पार्किंग प्रणालीसाठी मंजुरी मिळाली आहे. ही जगातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित ड्रायव्हरलेस SAE लेव्हल 4 पार्किंग सुविधा आहे.
ड्रायव्हरच्या मदतीशिवाय कार पार्क करता येणार
या तंत्रज्ञानाद्वारे ड्रायव्हरच्या मदतीशिवाय कार पार्क करता येणार आहे. सध्या, ही सेवा जर्मनीमधील मर्सिडीज-बेंझ संग्रहालयाच्या पार्किंग गॅरेजमध्ये वापरली जाऊ शकते. ही पार्किंग सेवा स्मार्टफोन अॅपद्वारे वापरली जाऊ शकते आणि त्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही.
(आणखी वाचा : Car Tips: थंडीच्या दिवसांत कारमध्ये हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर ‘या’ चुका करु नका; अन्यथा हलगर्जीपणा पडेल महागात…)
‘हे’ फीचर याप्रमाणे करेल काम
या वैशिष्ट्याचा वापर करून, ड्रायव्हरला फक्त सांगितलेल्या ठिकाणी वाहन पोहोचवावे लागेल आणि वाहनातून बाहेर पडावे लागेल. पार्किंग गॅरेजमधील पायाभूत सुविधा वाहनाचा ताबा घेते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कार रिकाम्या जागेवर नेऊन पार्क करते. विशेष म्हणजे, वाहन पार्किंगसाठी जागा त्याच्या आकारानुसार निवडली जाते.
कंपनीन असा दावा केलाय की, ड्रायव्हरलेस सिस्टम इंटेलिजेंट पार्किंगच्या माध्यमातून कमी वेळात गाडी त्या जागेत पार्क होईल. त्यामुळे वेळेची बचत आणि पार्क करताना गाड्या धडकण्याची धास्ती निघून जाईल. ड्रायव्हरलेस सिस्टम कार रिकाम्या जागेवर पोहोचवण्यासाठी आणि पार्क करण्यासाठी बुद्धिमान पार्किंग गॅरेज पायाभूत सुविधा वापरते. त्यामुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय चालकाकडून होणार्या चुकाही टळतात आणि कमी जागेत जास्त वाहने उभी करता येतात. कार पार्किंगसोबतच कार चार्ज आणि कार वॉशिंगची सुविधाही येथे उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
तर बॉशचे म्हणणे आहे की, दोन्ही कंपन्यांनी २०१५ मध्ये या सुविधेवर काम करण्यास सुरुवात केली आणि २०१८ पासून ही सेवा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने वापरली जात आहे. ही सेवा वापरण्यासाठी, कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्टीयरिंग असिस्टंट, स्टार्ट/स्टॉप फंक्शन यासारखी वैशिष्ट्ये असली पाहिजेत.