Ethanol Fueled Car: देशात पेट्रोल-डिझेलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार दाखल केली आहे. ‘टोयोटो इनोव्हा हायक्रॉस’ असं या गाडीचं नाव आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल (Electrified Flex fuel Car) कार आहे. BS6 स्टेज-२ मानांकनानुसार, याची निर्मिती करण्यात आली आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच शंभरी टक्के इथेनॉलवर कार धावतेय. त्यानंतर भारतभर या पर्यायी इंधनाविषयी उत्सुकता ताणल्या गेली आहे. खरंतर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल कार देशात लाँच करण्यात आली आहे.
देशात सध्या ई-२० लागू आहे, म्हणजेच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल. इथेनॉलच्या वापरातून गाडी चालविण्याचा हा पहिला व्यावहारिक प्रयोग क्रांतिकारी म्हणावा लागेल. नितीन गडकरी यांनी येत्या काही महिन्यांत देशात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या धावतील, अशी घोषणा अलीकडेच केली. यासाठी विविध कंपन्यांशी बोलणे सुरू असून लवकरच काही तांत्रिक बदल करून पूर्णपणे इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्यांचे युग अवतरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या घोषणेची बरीच चर्चा होत आहे. लहान-सहान गाड्यांसाठी कोणत्याही अन्य मिश्रणाशिवाय थेटपणे वापरण्यात येणारे इथेनॉल हे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमधील इंधनासाठी खात्रीशीर पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
इथेनॉलचा वापर सर्वात आधी कोणत्या देशात करण्यात आला?
वाहनोद्योगात इथेनॉलचा वापर जगात सगळयात आधी ब्राझील ह्या देशात १९३२ साली करण्यात आला होता. त्यांचे पाहून अमेरिकेनेही इथेनॉलचा वापर सुरू केला. आज भारतासह जगातील सर्व देश इथेनॉलचा वापर करतात. देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोल योजना राबवत आहे, ज्याअंतर्गत तेल विपणन कंपन्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करतात. या कार्यक्रमांतर्गत सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इथेनॉल कसं बनतं?
इथेनॉल हे एक जैवइंधन असून ते मका (Corn), ऊस (Sugarcane) आणि बीट (Beetroot) यांच्यापासून हे इंधन तयार केलं जातं. इथेनॉल हा एक प्रकारचं अल्कोहोल आहे, जो पेट्रोलमध्ये मिसळला जातो आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरता येतो. उसापासून इथेनॉल तयार होते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून इंधन म्हणून वापरणारा भारत हा एकमेव देश नाही. स्वीडन आणि कॅनडामध्येही अशा प्रकारे इथेनॉलचा वापर केला जातो. त्यासाठी तिथलं सरकार नागरिकांना अनुदानही देत आहे.
ऊसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते. भारत सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा प्रचार केला जात आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. हेच प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे. उसाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. यामुळे देशात इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते.
इथेनॉलमुळे कोणाला, कसा फायदा?
इथेनॉलमुळे महागड्या पेट्रोल-डिझेलपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. वायू प्रदूषणापासून सुटका होईल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही कार फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय यामुळे देशातील शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले जात आहे. इथेनॉलचा वापर केल्यामुळे देशाला होणारा फायदा स्पष्ट आहे. पेट्रोलमध्ये ते मिसळल्यामुळे खनिज तेल आयातीसाठी भारताचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होईल. तसंच खर्चातही कपात होईल. सरकार इथेनॉलच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. इथेनॉलसाठी पिकांची लागवड केल्याने गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांची ४० हजार ६०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ऊस उत्पादकांना याचा मोठा फायदा होतो आहे. याखेरीज साखर कारखान्यांनाही यामुळे संजीवनी मिळणार आहे. एकूणच कृषी उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्या विस्तारातून रोजगार वाढेल.
इथेनॉलवर कोणती कार धावेल?
इथेनॉलवर फक्त पेट्रोल कार चालवता येतात. या इंधनावर डिझेल गाड्या चालवता येत नाहीत. डिझेल गाड्यांचे इंजिन पूर्णपणे वेगळे असल्याने त्यांना इतर कोणत्याही इंधनावर चालवणे शक्य होत नाही. पेट्रोल कार इथेनॉलवर चालविल्या जाऊ शकते. पण त्यामध्ये एक अडचण आहे. जुन्या पेट्रोल कारला इथेनॉलवर धावण्याविषयी केंद्र सरकारने अजूनही कोणतेही म्हणणे मांडलेले नाही. तथापि, सामान्य कारमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळता येत नाही. जुन्या कार इथेनॉलने चालवण्यासाठी सध्या कोणतेही नवीन किट किंवा फिल्टर बाजारात आलेले नाही. अशा परिस्थितीत इथेनॉलवर जुनी पेट्रोल कार चालवणे हानिकारक ठरू शकते. या इंधनामुळे इंजिनसह इतर अनेक भागांचे नुकसानही होऊ शकते.
जितकी मागणी असेल तितकं इथेनॉल आपण बनवू शकतो?
इथेनॉलच्या उपलब्धतेवरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. आजघडीला देशात बहुतांश इथेनॉल हे साखर कारखाने आणि डिस्टिलरीतून मिळते आहे. त्याचा मुख्य स्रोत हे ऊस आहे. देशात इथेनॉल निर्मितीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. कारण तेथे ३० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर उसाची लागवड होते. साखर कारखान्यांच्या दुरवस्थेमुळे उसाचे क्षेत्र कमी झालेले आहे. महाराष्ट्र आणि देशातील अन्य राज्यांतील इथेनॉल निर्मितीचे प्रमाण पाहता आगामी दहा वर्षांपर्यंत देशाची गरज भागू शकेल, अशी आजची स्थिती नाही. २०२५ पर्यंत २० टक्क्यांचे ध्येय गाठण्यासाठी सध्याच्या काळात तयार होणारे इथेनॉलचे उत्पादन दुपटीहून अधिक म्हणजेच १,५०० कोटी लिटरपर्यंत वाढायला हवे.
वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात, “फ्लेक्स फ्यूएलवर मास प्रोडक्शन असणारी वाहने धावण्यास अजून बराच कालावधी आहे. सध्या पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉलचे मिश्रण होत आहे. प्रत्यक्षात वीस टक्के इथेनॉल मिश्रण असणारे इंधन उपलब्ध करण्याची सरकारची योजना आहे. कंपन्यांकडून विशेषतः वाहन कंपन्यांकडून फ्लेक्स फ्यूएलवर आधारित गाड्यांचे उत्पादन होण्यास अजून दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. तत्पूर्वी इलेक्ट्रिक हायब्रीड व सीएनजी अधिक व्यावसायिक ठरेल.”
इथेनॉल कारसाठी खर्च किती?
इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे. आजघडीला एक लिटर इथेनॉलची किंमत सरासरी ६६ रुपयाच्या जवळपास आहे; तर पेट्रोलचा दर १०८ रुपये आहे. साहजिकच किमती थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त झाल्या तरी इथेनॉलवरील गाड्यांमुळे चालकाला प्रतिलिटर ४० रुपयांचा थेट फायदा होणार आहे. ही बाब लोकांना आकर्षित करणारी ठरत आहे. कालांतराने अधिकाधिक नागरिक याच पर्यायाची निवड करतील.
मायलेजचा विचार करता, इथेनॉलवर २२ ते २५ किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज मिळते. तज्ज्ञांच्या मते, इथेनॉलवरच्या गाड्यांचे मायलेज चांगले राहील आणि ते पूर्णपणे स्वदेशी असण्याची बाब निर्मात्यांसाठी वेगळाच अनुभव देणारी राहू शकते. इथेनॉलमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते कोणतेही नुकसान करत नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
किती पर्यावरण पूरक आहे?
इथेनॉलला ‘हरित इंधन’ म्हटले जाते. इथेनॉलवरच्या गाड्यांमुळे हवेतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून सरकार आणि सामान्य माणसाच्या आरोग्यावरील खर्चात कपात होईल, असे मानले जाते. तसेच इथेनॉल हे स्वच्छ इंधन असल्यामुळे याच्या वापरामुळे ग्लोबल वार्मिंग कमी होण्यास मदत मिळणार आहे आणि अनेक नैसर्गिक उत्पादनातून जनतेचे हित साधले जाणार आहे. इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे.