Yamaha Launched First FZ S FI Hybrid Motorcycle In India : बाईक उत्पादक कंपनी यामाहा इंडियाने देशातील पहिली हायब्रिड बाईक लाँच केली आहे. त्यामध्ये तुम्हाला दमदार सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली ही देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. इंडिया यामाहा मोटारच्या (IYM) या पहिल्या हायब्रिड मोटरसायकलचे नाव ‘२०२५ एफझेड-एस फाय हायब्रिड’ (2025 ‘FZ-S Fi Hybrid) असे आहे, ज्याची किंमत १,४४,८०० (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

२०२५ च्या ‘एफझेड-एस फाय हायब्रिड’ची (FZ S FI Hybrid) डिझाइन अत्याधुनिक आहे. त्याच्या टँक कव्हरवरील शार्प कडांनी त्याचा स्पोर्टी लूक आणखीन वाढवला आहे. त्याचबरोबर प्रमुख डिझाइन अपडेटमध्ये इंटिग्रेटेड फ्रंट टर्न सिग्नल आता एअर इनटेक एरियामध्ये दिले आहेत, ज्यामुळे या बाईकला एरोडायनॅमिक (aerodynamic) लूक आला आहे.

यामाहाच्या FZ S FI Hybrid या मोटरसायकलमध्ये १४९ सीसी ब्लू कोअर इंजिन आहे, जे OBD-2B अनुरूप आहे. त्यात कंपनीचे स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टीम (एसएसएस)देखील आहे. एसएमजी कोणताही साउंड न करता इंजिन सुरू होते. जेव्हा बाईक थांबते तेव्हा SSS सिस्टीम आपोआप इंजिन बंद करते आणि क्लच दाबल्यावर ते पुन्हा सुरू करते. त्यामुळे पेट्रोलची खूप बचत होते.

रायडर्सच्या अधिक सोईसाठी नवीन ‘FZ-S Fi हायब्रिड’ मध्ये ४.२ इंचांचा फुल कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सादर केला आहे, जे Y-Connect ॲपच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होते. त्यात गूगल मॅप्सशी जोडलेले टर्न-बाय-टर्न (TBT) नेव्हिगेशन आहे, जे रिअल-टाइम डायरेक्शन, नेव्हिगेशन इंडेक्स, इंटरसेक्शन डिटेल्स व रस्त्यांची नावे सांगते, ज्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता, गाडी चालवण्याचा आनंद लुटता येतो. हँडल बारवरील स्विचेस आता Hand gloves घालूनही सहजपणे वापरता येईल. हॉर्न स्विचची जागादेखील बदलण्यात आली आहे.

टाकीला विमानासारखी इंधन टोपी

आराम आणि वापरण्यास योग्य अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी हॉर्न स्विचची जागा बदलण्यात आली आहे. ‘FZ-S Fi हायब्रिड’मध्ये इंधन टाकीला विमानासारखी इंधन टोपी देण्यात आलीय. तसेच ‘FZ-S Fi हायब्रिड’ आता रेसिंग ब्ल्यू व सायन मेटॅलिक ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.