धकाधकीचा काळात तरुणांमध्ये दुचाकीचं प्रचंड मागणी आहे. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढणं सोपं होतं. त्यामुळे तरूण चारचाकी ऐवजी दुचाकीला पसंती देतात. त्यात रॉयल इनफिल्ड तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. जावा बाइक्स भारतात लॉन्च केल्यानंतर, आता क्लासिक लीजेंड्स देखील लवकरच भारतीय बाजारपेठेत Yezdi ब्रँड आणण्याच्या तयारीत आहे. ७० च्या दशकात भारतीय बाजारात Yezdi ची प्रचंड मागणी होती. त्यावेळेस ऑइल किंगच्या नावे भारतात लॉन्च केली होती. यात पेट्रोलसोबत ऑइल मिक्स केलं जात होतं. जावा मोटरसायकलसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर Yezdi बाइक्सने ही योजना बनवली आहे.
क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी अलीकडेच एका ट्विटमध्ये याबाबतचे संकेत दिले होते. “आम्ही दुसऱ्या भावाला बोलवलं आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. लॉन्चनंतर Yezdi ADV ची स्पर्धा Royal Enfield Himalayan सोबत असेल. विशेष म्हणजे Yezdi नवीन बाईक Royal Enfield Himalayan च्या किमतीच्या सेगमेंटमध्ये असेल. नवीन Yezdi बाईक फक्त जावा पेराकसोबत आलेल्या ३३४ सीसी इंजिनसह येण्याची शक्यता आहे. पेराकचे हे इंजिन ३० एचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क निर्माण करते.
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपने क्लासिक लीजेंड्समध्ये गुंतवणूक केल्यापासून जावा मोटारसायकल, BSA आणि Yezdi कमबॅकबद्दल बोलले जात होते. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला क्लासिक लेजेंड्सने भारतात Yezdi रोडकिंगचा ट्रेडमार्क देखील दाखल केला होता. तेव्हापासून Yezdi बाईक भारतात परतणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. नुकतेच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही Yezdiच्या भारतात परतण्याबाबत ट्विट केले होते.
Yezdi ADV च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर, बाइकमध्ये फुल-एलईडी लाइटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल-चॅनल ABS असणे अपेक्षित आहे. हार्डवेअरमध्ये वायर-स्पोक व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील मोनो-शॉक आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देखील दिसू शकतात.