Zundapp’s Z101 Folding E-Bike: मागील काही वर्षांपासून ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांऐवजी विजेवर सुसाट पळण्यासाठी वाहनांची खरेदी करु लागले आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळे मोठमोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करु लागल्या आहेत. यामध्ये Zundapp या कंपनीचा देखील समावेश झाला आहे. जर्मन स्थित या कंपनीने नुकतीच विद्युत शक्तीवर चालणाऱ्या गाड्या तयार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या एकूण उत्पादनांमध्ये Zundapp’s Z101 Folding E-Bike ला ग्राहकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे.
१९१७ मध्ये Zundapp कंपनीची स्थापना झाली होती. तेव्हापासून ते आजतागयत या कंपनीने विविध प्रकारच्या बाईक्सचे उत्पादन केले. उच्च-गुणवत्ता असलेली अभियांत्रिकी व्यवस्था आणि सुबक कल्पकता यासाठी ही कंपनी प्रसिद्ध होती. या कंपनीच्या बाईक्सचा वापर महायुद्धामध्येही करण्यात आला होता. हळूहळू प्रगती करत कंपनीने चारचाकी गाड्या बनवायला सुरुवात केली. या क्षेत्रामध्येही त्यांना यश मिळाले. भविष्यातील संधी ओळखून त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व्यवसायामध्ये पदार्पण केले.
Zundapp कंपनीच्या Z101 Folding E-Bike या इ-बाईकची बाजारामध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. ही फोल्डिंग बाईक शहरामध्ये सहजपणे वापरता येते. ही बाईक सध्या ठराविक रंगांमध्ये उपलब्ध आहे. एप्रिल २०२३ पर्यंत ही फोल्डिंग बाईक पांढऱ्या, निळ्या आणि चांदेरी (Sliver) रंगांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. याचा चाकाचा आकार २० इंच असून यामध्ये मध्यभागी फोल्ड करता येणारी अॅल्युमिनियम फ्रेम आहे. ही बाईक (२१ किलोग्रॅम बॅटरीसह) फोल्ड करुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेता येते. कारच्या मागच्या बाजूलाही ही बाईक जोडता येते.
या अत्याधुनिक बाईकमध्ये 250-वॅट हब-माउंट मोटर लावण्यात आले आहे. शिवाय यामध्ये 30 न्यूटन-मीटरचा टॉर्क आउटपुट आणि टॉप स्पीड २५ किमी प्रति तास आहे. Zundapp च्या या इ-बाईकमध्ये 270-वॅट-आव्हर यूनिट बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यालवर ही बाईक ६५ किलोमीटर रेंजचा टप्पा पूर्ण करु शकते. पण बॅटरी संपूर्ण वापरल्यास तिला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात.
Zundapp Z101 मध्ये असिस्ट मोड ऑफर करणारा कंट्रोलरचा समावेश करण्यात आला आहे. यात हॅन्डी वॉक मोड देखील आहे. या मोडमध्ये जेव्हा मोटर सुरु झाल्यानंतर स्वयंचलितपणे बाईकचा वेग वाढत जाईल. त्याव्यतिरिक्त यामध्ये सहा-स्पीड शिमॅनो ड्राइव्हट्रेन आणि LED डिस्प्ले देखील जोडण्यात आले आहेत. या बाईकची किंमत १,३९९ युरो (भारतीय चलनानुसार १,२०,००० ते १,२५,००० च्या आत) इतकी आहे.