कीर्ति कुळकर्णी – lokrang@expressindia.com

(करोनाच्या पाश्र्वभूमीवर सागरी जीवनात मारलेला काल्पनिक फेरफटका.. हलकाफुलका आणि अंतर्मुख करणारा!)

मत्स्यनगरीत पापलेटबाई आजकाल काहीशा संभ्रमित होत्या. अचानक अलीकडे जरा गर्दी वाढलेली वाटत होती. कालच मि. पापलेट त्रागा करत होते, ‘‘आजकाल चांगलं ऐसपैस पोहता येत नाही. पोरांना शिस्तीत पोहता येत नाही. सारखी मधे मधे येतात. अंग कसं आखडून गेल्यासारखं वाटतं.’’

पापलेटबाईंनी सकाळचा फेरफटका सुरमई आळीच्या अंगाने मारला तर तिथंही नेहमीपेक्षा जास्त गर्दी वाटली. संध्याकाळी पापलेटभाऊंना घरी यायला जरा उशीरच झाला. कारण विचारलं तर म्हणे बोंबील कट्टय़ावर आज बरेच जण भेटले, त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात वेळ गेला. अलीकडे मुलं एकसारखी तोंड वासून खायला मागत नव्हती. स्वत:च कोलंब्या गट्ट करून आपलं पोट भरत होती. हल्ली पाणीही कमी प्रदूषित वाटत होतं.

बराच विचार करूनही काही उमजेना, तेव्हा त्यांनी थेट आपल्या भावाशी म्हणजेच हलव्याशी संवाद साधला. हलवाभाऊंनी बहिणीच्या निरीक्षणाला दुजोरा दिला, ‘‘खरंय गं. आमच्याकडेही अलीकडे गर्दी वाढलेय. शोध घ्यायला पाहिजे.’’

रात्री पापलेटबाईंनी पापलेटभाऊंच्या कानावर आपला गोंधळ घातला. नेहमीप्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव आणला, पण थोडे विचारात पडले. बाजूला पोरांच्या कंपूत जरा जास्त खुसखुस वाटल्यामुळे त्यांनी पोरांना फटकारलं.

सकाळपासून पोरं गायब असल्यामुळे पापलेटबाई सचिंत होत्या. पोरांचा शोध घेत फिरता फिरता त्यांना बांगडेवहिनी भेटल्या. त्याही मुलांचाच शोध घेत होत्या. ‘‘हल्ली भारीच द्वाड झालीत मुलं! कालही अशीच बराच वेळ गायब होती. कुठं जातात कोण जाणे.’’ बांगडेवहिनी म्हणाल्या. आल्यावर खरपूस समाचार घ्यायला हवा या विचारावर दोघी सहमत होऊन निरोप घेणार तेवढय़ात मुलं उडय़ा मारत येताना दिसली. एखादं अ‍ॅडव्हेंचर करून आल्याच्या आनंदात उसळत तरंगत होती. खडसावून विचारल्यावर लांबवर किनाऱ्याच्या दिशेकडे पोहून आल्याचं म्हणाली. पापलेटबाईंनी शेपटीने पोरांना फटकारलं, ‘‘किती वेळा सांगितलं तिथं जाऊ नका, माणसं पकडतात.. तरी नाही ऐकायचं.. नसते धंदे करतात.’’

‘‘पण काकू, हल्ली तिथं कुणीच नसतं. आम्ही रोजच जातो.’’ – इति बांगडे पिल्लावळ.

‘‘हो, तिथं किती मज्जा आली. मी पाण्याच्या वर जाऊन आलो आणि वरचं निळंशार आकाश पण बघितलं.’’ कावळटाच्या या चिवचिवटाने पापलेटबाई अधिकच संभ्रमित झाल्या.

आता मात्र मत्स्यनगरीत हा एक चर्चेचा व चिंतनाचा विषय झाला. पापलेटभाऊंनी हलवा, सरंगा, बोंबील, बांगडा, घोळ, पालाई सर्वाची मीटिंग भरवली. पापलेटभाऊंनी विषयाला हात घातला. ‘‘आजकाल बोटी व माणसं कमी दिसतात खरी.’’ सरंग्याने दुजोरा दिला. बहिणीशी हा विषय आधीच झाला असल्यामुळे हलवाभाऊ तयारीनिशी आले होते. त्यांनी आधीच खेकडेभाऊंना कामाला लावलं होतं. आजकाल खेकडेवाडीत माणसं खेकडे पकडायला येत नसल्याची, इतकंच नव्हे तर आजकाल समुद्रकिनारेसुद्धा ओस असतात, त्यामुळे खेकडय़ांची पोरं समुद्रकिनाऱ्यांवर मनसोक्त धुमाकूळ घालू शकतात अशी ग्वाही खेकडेभाऊंनी दिली. माणसं अलीकडे कुणा सूक्ष्म विषाणूच्या भीतीनं घरीच दडी मारून बसल्याची गोटातली खबर त्यांनी काढली होती.

हे ऐकताच सर्व मत्स्य-आयांचा जीव भांडय़ात पडला. ‘‘चला, सध्या तरी मुलांची काळजी नाही. जरा मोकळेपणाने पोहतील तरी.’’

तेवढय़ात माशांची काही पोरं तोंडात नवीनच काही धरून येताना दिसली. खेकडय़ाने लगेच ते ओळखलं. ‘‘आजकाल माणसं विषाणूच्या भीतीने तोंडाला हे बांधून फिरतात. समुद्रकिनारी अशी बरीच पडली होती.’’

हे ऐकताच सर्वाच्या छातीत धडकी भरली. अरे बाप रे! म्हणजे माणसांमुळे येऊ घातलेलं हे आणखी एक नवं संकट!