गोपाळकाल्यानिमित्त सोसायटीमधील मोठय़ा मुलांचा दहीहंडीचा सराव चालू होता. दोन-तीन वेळा सराव झाला.  सोसायटीतील छोटी मुलंही मोठय़ा संख्येने जमली होती. तेव्हढय़ात पितळे आजोबा म्हणाले, ‘‘मुलांनो, दहीहंडीचा हा खेळ पाहायला खूप मजा वाटते ना तुम्हाला?’’
‘‘हो, हो, आजोबा, खूप मजा वाटते.’’ सर्व मुले एकाच आवाजात म्हणाली.
‘‘या खेळाचा काय फायदा होतो रे?,’’ आजोबांनी विचारले.
सुहास पटकन् म्हणाला, ‘‘आजोबा, यामुळे  दहीहंडी फोडणारी मुलं एकत्र येतात. पटकन् थर रचतात. सर्वात मोठे दादा खालच्या थरांमध्ये असतात आणि कमी वजनाची मुलं वरच्या थरांमध्ये असतात. खूप गंमत येते.’’
नीरज म्हणाला, ‘‘खूप मज्जाही येते.’’
आजोबा म्हणाले, ‘‘मुलांनो, दहीहंडीमध्येही व्यवस्थापनशास्त्र असतं हे तुम्हाला माहीत आहे का? श्रीकृष्ण स्वत: व्यवस्थापनशास्त्रात कुशल होता. दहीहंडीच्या या खेळात तुम्ही ते व्यवस्थापनशास्त्रच शिकत असता. आता मला सांगा, दहीहंडीच्या खेळात आपलं ध्येय कोणतं असतं?’’
‘‘हंडी फोडण्याचं!’’
‘‘अगदी बरोबर! कोणत्याही कामात आपलं ध्येय सर्वाना माहीत असणं महत्त्वाचं असतं. ध्येय हे नेहमी उच्च दर्जाचं हवं. ते साध्य करण्यासाठी वेळेचं नियोजन म्हणजे टाइम मॅनेजमेंट करणं अत्यावश्यक असतं. दहीहंडी फोडायला जास्त वेळ लागला तर काय होईल?’’
‘‘आजोबा, खालचा थर दमून जाईल. सर्वच खाली कोसळतील.’’
‘‘अगदी बरोबर! म्हणजे हा खेळ वेळेतच उरकायला हवा. दिरंगाई, बेफिकिरी, मतभेद इथे उपयोगाचे नाहीत. आपला लीडर जसं सांगेल तसंच वागायला हवं. त्या लीडरनेही आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी. इथे एकानं जरी चूक केली तरी इतरांना इजा होऊ शकते.’’
‘‘होय आजोबा, अगदी बरोबर!’’
‘‘आणखी काय काय लागतं या खेळात?’’
‘‘सर्वाची एकजूट असायला हवी. एकमेकांचं सहकार्य हवं.’’
‘‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता जरुरीची असते. टीम स्पिरिट म्हणजे संघभावना आवश्यक असते. तसेच उंचच उंच मनोरे रचण्याचे प्रयोग धोकादायकही ठरू शकतात, हे ग्रुप लीडरने लक्षात ठेवावयास हवे. येथे चढाओढ उपयोगाची नाही. अतिउंच मनोरे रचण्याचा हव्यास कधीही धरू नये. ’’
‘‘आजोबा, दहीहंडीचं कळलं. पण आपण जन्माष्टमी का साजरी करतो?’’
‘‘सव्वातीन हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या अलौकिक, तेजस्वी अशा लोकनायक कृष्णाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण जन्माष्टमी साजरी करीत असतो.’’
‘‘पण आजोबा, कृष्णाला ‘गोवर्धनधारी’ असं का म्हणतात?’’
‘‘आता तुम्ही दमला असाल! नंतर सांगेन कधीतरी!’’
‘‘नाही आजोबा, आत्ताच सांगा.’’ मुलांनी एकच गलका केला.
‘‘बरं सांगतो! गोकुळातील लोकांचा पूर्वी असा समज होता, की इंद्र गोकुळात पाऊस पाडतो. म्हणून सर्व गोकुळवासी इंद्राची पूजा करीत. श्रीकृष्णानं त्यांना समजावून सांगितलं की, इंद्र पाऊस पाडत नसून गोवर्धन पर्वतामुळे गोकुळात पाऊस पडतो. आपण इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. त्याप्रमाणे सर्व गोकुळवासी गोवर्धनाची पूजा करू लागले. इंद्र रागावला. गोकुळात खूप पाऊस पडायला लागला. गोकुळवासीयांना वाटलं, इंद्र रागावल्यानेच तो गोकुळात खूप पाऊस पाडत आहे. गोकुळवासी घाबरले. पण श्रीकृष्णाने त्यांना धीर दिला व गोवर्धन पर्वताचा आश्रय घेण्यास सांगितलं. त्यावेळी सर्व गोकुळवासी गोवर्धन पर्वतामुळे वाचले. श्रीकृष्णाच्या या विवेकी वर्तनाने गोकुळवासी खूश झाले. गोवर्धनधारी कृष्णाचा जयजयकार करण्यात आला. पण  मुलांनो, हे लक्षात घ्या- जुन्या काळातसुद्धा कृष्णाला निसर्गशक्तीचं महत्त्व समजलं होतं.’’
‘‘आजोबा, श्रीकृष्ण गाई चरायला नेत असे ना?’’
‘‘होय! शेतीप्रधान भारतदेशासाठी गाई पाळणे किती आवश्यक आहे ते त्याने सर्वाना पटवून दिले. गाई चरायला नेण्याच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्या कामात आनंद मिळावा यासाठी तो बासरीही उत्तम प्रकारे वाजवीत असे. बासरीवादनाची कला कृष्णामुळेच लोकप्रिय झाली.’’
‘‘आजोबा, कृष्णाने कालिया नागालाही मारले ना?’’
‘‘कालिया हा नागवस्तीचा पुढारी होता. नागलोक अनेक प्रकारे यमुना नदीचे पाणी प्रदूषित करीत. यमुनेच्या प्रदूषित, विषारी पाण्यामुळे अनेक माणसे, लहान मुले, गाईगुरे आजारी पडू लागली. श्रीकृष्णाने त्याला समजावलं, दटावलं आणि मग सगळे उपाय हरल्यावर त्याला पराभूत केलं. शरण आलेल्या कालियाचं त्यानं दुसरीकडे पुनर्वसन केलं. आणि नंतर यमुनेचं पाणी स्वच्छ केलं.’’
‘‘भगवद्गीता हीदेखील कृष्णानेच सांगितली ना?’’
‘‘होय! मुलांनो, तुम्ही भगवद्गीतेचा अर्थ समजून घ्या. स्वत:चे कर्म प्रामाणिकपणे करा, असं त्यात सांगितलेलं आहे. भक्तियोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांचं सविस्तर विश्लेषण त्यामध्ये आहे. भगवद्गीतेमध्येही कृष्णानं व्यवस्थापनशास्त्र सुंदर पद्धतीनं समजावलं आहे.’’
‘‘आजोबा, श्रीकृष्ण खरोखरच ग्रेट होता. आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी करू!’’
तेवढय़ात पितळे आजींनी मुलांसाठी दहीपोहे आणले. मुलांनी आनंदानं दहीपोह्य़ाचा प्रसाद घेतला आणि कृष्णमाहात्म्य समजल्याच्या आनंदात ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत घर गाठले.