मधुमालती ही भारतीय वंशाची एक सदाहरित वेलवर्गीय वनस्पती. Combretum indicum (कॉम्ब्रेटम इंडिकम) हे तिचे शास्त्रीय नाव. इंग्रजीत हिला Rangoon creeper असे म्हणतात. व्यवस्थित आधार मिळाला तर हिची लांबी साधारण सत्तर फुटापर्यंत जाऊ शकते.

बंगल्याच्या प्रवेशद्वारावर किंवा मंदिर, शाळा यांच्या प्रवेशद्वारावर गोलाकार कमानीवर मधुमालतीची वेल सोडलेली दिसते. या फुलांचा मंद गंध सहज थकवा दूर पळवतो. याची सुंदर सफेद, फिकट गुलाबी आणि गडद गुलाबी रंगाची फुले सुंदर दिसतात.

banana cultivation Ujani
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात केळीच्या लागवडीत मोठी वाढ
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
how to make phulka
फुलका फुगत नाही? जाणून घ्या परफेक्ट फुलके बनवण्याच्या खास टिप्स
Patil family grew strawberries farm in Nagpur
पाटील कुटुंबाने पिकविली रसदार स्ट्रॉबेरी, नागपूरकरांच्या पडतात उड्यावर उड्या
Rishikesh Tripathi spider research
जंगलबुक : ‘स्पायडर’ मॅन
spring the season of new beginnings
कहत है ऋतुराज आयो री…
nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
In Sangli market green currant sold for 225 kg and yellow for 191 kg this season
सांगलीत बेदाणा सौद्याला प्रारंभ, हिरव्याला २२५, तर पिवळ्या बेदाण्याला १९१ रुपये दर

फुले फांदीच्या शेंडय़ावर गुच्छाने येतात. गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा लांब देठ यामुळे या फुलांचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. फुले झुंबरासारखी जमिनीकडे झुकलेली असतात. पाकळ्यांचा रंग आधी सफेद, मग फिकट गुलाबी आणि नंतर गडद गुलाबी होत जातो, या फुलांची गंमत म्हणजे देठाच्या टोकाकडील भाग थोडा फुगीर असतो, त्यामुळे एका फुलाच्या पाच पाकळ्यांच्या मध्यभागी असणाऱ्या छिद्रात दुसऱ्या फुलाचे टोक घुसवले की घट्ट बसते आणि अशीच एकात एक फुले अडकवत गेल्यास विना सुईदोरा मधुमालतीच्या फुलांचा छान हार तयार होतो. इतकंच काय, पण सागरवेणीप्रमाणे याची फुले एकात एक गुंफली असता सुंदर अशी चटईवेणी तयार होते. मधुमालतीची फुले ही कृमिनाशक असून वैद्याच्या मार्गदर्शनाखाली याचा काढा दिल्यास लहान मुलांच्या पोटातील जंत पाडण्यास याचा उत्तम उपयोग होतो. इकेबानामध्ये (इकेबाना- फुलांची सजावट) देखील या फुलांचा वापर होतो.

मधुमालतीची पाने गर्द हिरवी, गोलाकार असून टोकाला महिरपी कंसाप्रमाणे टोकदार असते. मधुमालती ही २१ गणेशपत्रींमधील एक वनस्पती असून, भाद्रपदातील श्री पार्थिव महागणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेतील पत्रीपूजनात या वनस्पतीची पाने गणपतीबाप्पाला वाहिली जातात. ही पाने हगवणीवरही औषधी आहेत.

फुले एकदा उमलली की साधारण २ ते ३ दिवस राहतात. मधुमालतीला वर्षभर फुले येत असली तरी उन्हाळ्यात हिला विशेष बहर येतो. फुले साधारण रात्रीच उमलतात. एकाच गुच्छात सफेद, फिकट गुलाबी आणि गडद गुलाबी या तिन्ही रंगाची फुले एकत्र पाहताना निसर्गाच्या अद्भुत कलाकारीची महती पडते. फुले गळून पडली की साधारण हिरडय़ाच्या आकाराची फळे येतात. वातावरणाचा परिणाम किंवा आणखी काही कारण असेल, पण आपल्याकडे हिला फलधारणा होत नाही. मी तरी याची फळे प्रत्यक्षात पाहिली नाहीयेत. ही फळेदेखील औषधी असून चीन, इंडोनेशिया या देशांत पारंपरिक औषधात याचा वापर केला जातो.

मधुमालतीची वेल ही बहुवर्षांयू असून तिची फार काळजी घ्यावी लागत नाही. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत ही वेल सहज वाढते. उद्यानात हिची शोभेची वनस्पती म्हणून लागवड केली जाते. हिरव्याचुटूक पानांमध्ये गुलाबी फुलांचा घोस फार सुंदर दिसतात. मधुमालतीची नवीन रोपे ही बिया तसेच फांदीपासून करता येतात, तसेच हिच्या मुळांपासूनदेखील नवीन फुटवे तयार होतात, ते खोदून आपण दुसरीकडे लावू शकतो. प्रखर सूर्यप्रकाश असले तर फुले खूप येतात. आजकाल मधुमालतीची छोटी खुजी (Dwarf) जातदेखील रोपवाटिकेत मिळते. तिची फार वाढ होत नाही, पण फुले मात्र येतात. कुंडीत लागवड करून आपण हिला घरात जिथे सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी ठेवू शकतो. चला तर मग, आपल्या सोसायटीची, शाळेची शोभा वाढविण्यासाठी मधुमालतीला आपल्या हरित धनात सामील करून घेण्यास सज्ज व्हा!

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

Story img Loader