जी बाब मला महाभारताविषयी जाणवली, अगदी तीच मला लोककथांविषयी जाणवते. जगातल्या अनेक देशांमध्ये परंपरेने चालत आलेल्या लोककथा आहेत. बायबलपासून अनेक धर्मग्रंथात गोष्टी आहेत. भारतात तर पंचतंत्र, संतकथा, लोककथांचे भांडार आहे, पण आजच्या मुलांपर्यंत हे भांडार पोहोचत नाही. अशा काही भावविश्व फुलविणाऱ्या गोष्टी असतात हेच मुलांना माहीत नाही. पूर्वी आजी घरातले पोथीपुराण मुलांपर्यंत पोहोचवायच्या.
नांदेडचे कवी मनोज बोरगावकर यांनी आपले हे संचित मुलांपर्यंत पोहोचवायचा एक वेगळा प्रयत्न केलाय. ‘अकथ कहाणी सद्गुणांची’ या पुस्तकात त्यांनी मानवी जीवनातल्या सद्गुणांचे महत्त्व मुलांना पटवून दिले आहेत. विशेष म्हणजे उपदेश न करता केवळ या प्रत्येक सद्गुणांशी निगडित जगातल्या आणि भारतातल्या ७५ पेक्षा जास्त गोष्टी, किस्से आणि लोककथा अगदी गोष्टी सांगाव्यात अशा सहजतेने सांगितल्या आहेत. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, किस्सा सुरू होतो आणि मुले त्यात गुंतत जातात. त्यात सद्गुणाची व्याख्या, उपदेश असले काहीच नाही, पण तरीही ते सद्गुण मुलांच्या भावविश्वात शिरतात.
बोरगावकरांनी वाचनाचे महत्त्व, स्त्रीप्रतिष्ठा, करुणा, परोपकार, पर्यावरण, विवेक, निरागसता, मप्रतिष्ठा, सृजनाच्या वाटा, सहिष्णूता, बंधुत्व, विनोदबुद्धी, सत्य अशा सद्गुणांवर दोस्तोव्हस्की, गुर्जएिफ, शंकराचार्य, बुद्ध, कबीर, नानक, रामकृष्ण परमहंस, न्यूटन, एडिसन, टागोर, राधाकृष्णन् यांच्या जीवनातील गोष्टी सांगितल्या आहेत.
अफगाणिस्तान, कुमाऊ, ग्रीक अशा अनेक लोककथा, पंचतंत्र, भूतकथा यांतील गोष्टी सांगितल्या आहेत.
‘अकथ कहाणी सद्गुणांची’ –  मनोज बोरगावकर, सायन पब्लिकेशन, पुणे, पृष्ठे -१६०, किंमत- १५० रुपये.     

Story img Loader