-फारुक एस. काझी
शाळेचा पहिला दिवस. पानूबाई पहिलीत गेली. पानूबाई आज शाळेत गेली. बावरलेली पानूबाई एका कोपऱ्यात अवघडून बसून राहिली. बाकीची मुलं मस्ती करत होती. पकडापकडी खेळत होती. उड्या मारत होती. ओरडत होती. पानूबाई बावरल्या डोळ्यांनी सगळं पाहत होती. पापण्या सारख्या खालीवर होत होत्या. तिने मान वळवून पाहिलं. खिडकीजवळ उभा राहून एक मुलगा ‘कुहुऽऽऽ कुहुऽऽऽ’ असा आवाज काढत होता. पलीकडच्या आंब्यावरचा कोकीळ त्याला उत्तर देत होता. ‘कुहुऽऽऽ कुहुऽऽऽ ’ ‘कुहऽऽऽ कुहुऽऽऽ ’
पानूबाईला खूप मज्जा वाटली. आंब्याच्या झाडाखाली तिने केलेला नाच तिला आठवला. तांड्यावर काही कार्यक्रम असला की सगळेच नाचायचे. पानूबाईपण ताल धरायची. नाचायची. इतक्यात घंटा वाजली. पानूबाईची तंद्री मोडली. सगळी मुलं पळतच वर्गात आली. आपापल्या जाग्यावर बसली. खिडकीजवळचा मुलगा अजून तिथंच उभा होता. आता तो ओरडत नव्हता. सर वर्गात आले. येताना हातात चॉकलेटचा पुडा होता. सगळ्या मुलांच्या जिभेवर पाणी आलं. मुलं आनंदाने ओरडली.
हेही वाचा…बालमैफल: सोनाराने टोचले कान
सरांनी सगळ्यांना चॉकलेट दिलं. खिडकीजवळचा मुलगा अजून तिथंच उभा होता. ‘‘रोहितराव, या बसा आता.’’ असं म्हणताच सगळा वर्ग हसायला लागला. त्याचं नाव रोहित आहे तर! पानूबाई मनातल्या मनात बोलली. रोहित लाजून जागेवर येऊन बसला. पानूबाईचं लक्ष टेबलाकडे होतं. पण तिथं काहीच नव्हतं. हातातलं चॉकलेट तिनं पिशवीत टाकलं- छोट्या कृष्णाला द्यायचं म्हणून. इतक्यात दारात कुणीतरी आलं. त्यांच्या हातात पुस्तकांचा गठ्ठा होता. पानूबाईचे डोळे चमकले. चेहरा फुलला. नवीन पुस्तक! नवंकोरं!
सरांनी पुस्तकं टेबलावर ठेवली. सगळ्या मुलांना शांत केलं. सरांनी पुस्तकं वाटायला सुरुवात केली. पानूबाईची चुळबूळ वाढली. सर तिच्याजवळ येईपर्यंत पुस्तकं संपली तर? सरांनी पुस्तक नाहीच दिलं तर? असं उगीचच मनात येऊन गेलं. पानूबाईचा जीव कासावीस झाला. सर तिच्याजवळ झाले. तिला नाव विचारलं.
हेही वाचा…बालमैफल : शेताची सफर
‘‘तुझं नाव काय गं?’’
‘‘पानूबाई.’’ तिनं नाव सांगितलं. सरांनी पुस्तकावर तिचं नाव लिहिलं आणि पुस्तक पानूबाईकडे दिलं. पानूबाई हरखून हरखून गेली. तिने अलगद पुस्तक मांडीवर ठेवलं. डोळे भरून पाहून घेतलं. हात पुस्तकावरून फिरवला. किती मोठं सुख होतं ते!
तिनं पुस्तक उघडलं. सरांनी लिहिलेल्या नावावरून हात फिरवला. तिचं नाव! तिचं लिहिलेलं नाव ती पहिल्यांदाच पाहत होती. तिचा चेहरा फुलून आला. डोळे चमकले. तिनं पानं पालटली. चित्रं पाहिली. पुस्तक उचलून त्याचा वास घेतला. वास घेताना डोळे मिटून घेतले. ओठांवर हसू सांडलं होतं. तिनं पुस्तक तसंच छातीशी घट्ट धरलं. पुस्तकाचे पंख लावून आपण उडत उडत दूर निघालोय असं तिला वाटायला लागलं. दिवस बघता बघता फुर्र झाला.
हेही वाचा…बालमैफल : ‘अपोफिस’
हवेवर तरंगतच ती घरी आली. घरात सगळ्यांना पुस्तक दाखवलं. तिच्या घरात आलेलं ते पहिलं पुस्तक होतं. घरात आणि तांड्यावर सगळ्यांना पुस्तक दाखवून झालं. पुस्तक घेऊन आंब्याखाली फेर धरून नाचूनही झालं. सगळी चित्रं बघूनही झाली. वाचता येत नव्हतं तरी अक्षरांवर बोट ठेवून गुणगुणूनही झालं. पानूबाईला जणू नवीन मित्र भेटला होता. जिवलग मित्र. असेच काही दिवस गेले. पानूबाई अंगणात अभ्यास करत बसली होती. छोटा कृष्णा शेजारी खेळत होता. माय-पप्पा अजून कामावरून आले नव्हते. कृष्णा खेळत खेळत तांड्याजवळच्या रस्त्याकडे गेला. पानूबाईचं लक्ष नव्हतं. कुणीतरी तिला हाक मारून कृष्णा रस्त्यावर गेल्याचं सांगितलं. तिनं आसपास पाहिलं. कृष्णा दिसला नाही. ‘कृष्णा कसा आन कधी गेला?’ असा प्रश्न स्वत:ला विचारत तिने रस्त्याकडे धाव घेतली. ती घाबरली होती. थरथर कापत होती. रडायला येऊ लागलं होतं. कृष्णा रस्त्यावर खेळत होता. पानूबाईने त्याला उचलून घेतलं. रागावली, पाठीत धपाटा घातला. त्याला कडेवर घेऊन ती घराकडे वळली. अंगणात येताच तिने कृष्णाला खाली बसवलं. झाडाला बांधलेली दोरी कृष्णाच्या पायाला बांधली. तो इकडे तिकडे जाऊ नये म्हणून माय त्याच्या पायाला नाहीतर कमरेला दोरी बांधून कामं करायची. कृष्णाला बांधून पानूबाई दप्तराकडे वळली आणि समोर जे दिसलं ते बघताच तिचे पाय गळून गेले. ती मटकन खाली बसली.
एक म्हैस तिचं पुस्तक चघळत होती. तिनं काठी घेऊन म्हशीला हाकलली. पण तोवर म्हशीने सगळं पुस्तक चघळून खराब करून टाकलं होतं. पानूबाई रडू लागली. तिचं पुस्तक पूर्ण खराब झालं होतं. अंधार पडला. माय-पप्पा घरी आले तरी तिचं रडणं सुरूच होतं.
‘‘काई जालो गंऽऽऽ? का रडतीस?’’ मायनं विचारताच पानूबाई मोठ्याने रडू लागली. पप्पानी समजावलं. पण ती काही केल्या ऐकेना.
‘‘मारो पुस्तक मला पायजे.’’ एवढं एकच वाक्य ती सारखं बोलत होती. रात्री न जेवताच पानूबाई झोपली. तिला ताप भरला.
‘‘काई केरीचू, पानूसाटी नवं पुक्सत आनाऽऽऽ . छोरी सारकी रडतीय, ताप बी आलाय तिला.’’
‘‘महाग असन तिचं पुक्सत. कांई करावं?’’ पप्पा काळजीने बोलले.
हेही वाचा…चित्रास कारण की… : कांचीवरम
‘‘लावो एक, एक दिसाची मजुरी जाईल.’’ मायनं समजावलं. पप्पांनी पुस्तक आणायचं कबूल केलं. पानूबाईचं मन कुठेच रमेना. कृष्णामुळे पुस्तक खराब झालं याचा तिला राग आलेला. त्याला तिने धपाटे लावलेच. आपला राग काढला. पण शाळेत, मैदानावर, मैत्रिणीत कुठंच मन लागेना. वर्गात शिकवताना सरांनी पुस्तक वर काढायला सांगितलं.
‘‘पुस्तक कुठंय?’’ सरांनी असं विचारताच ती मुकी झाली. सरांनी दोन-तीनदा विचारलं. झालेला प्रकार तिने सरांना सांगितला. सरांना राग आला.
‘‘नवं पुस्तक सांभाळून न्हाई ठेवता येत? वेडीय का तू? आतय कुठून आणू पुस्तक? एखादं जुनं असलं तर बघतो.’’ पानूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. दिवस बेचैनीत गेला. उदास मनानं ती घरी आली. पप्पा अजून आलेले नव्हते. पानूबाई न जेवताच रडून झोपी गेली. स्वप्नात तिला पुन्हा पुस्तक दिसलं. पुस्तकांचे पंख झाले. पानूबाई पुस्तकाचे पंख लावून उडू लागली. दूरदूरच्या आजवर न बघितलेल्या पऱ्यांच्या देशात. डोंगरावर, नदीवर. पानुबाई स्वप्नात हसत होती. इतक्यात. इतक्यात जोराचा वारा सुटला आणि पानूबाईच्या पुस्तकाचे पंख फाटले. आणि इकडे तिकडे उडून गेले. पानूबाई खाली कोसळली. पानूबाई जोरात ओरडली. झोपेतून ती ओरडतच उठली.
हेही वाचा…बालमैफल : चिन्मयची दुनिया
‘‘काय जालं बाई? का वरडली?’’ आईनं तिला जवळ घेतलं. डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला.
‘‘मारो पुस्तक…’’ असं म्हणून ती रडू लागली.
‘‘रो मत बेटा. इकडं बग… इकडं बग.’’
पानूबाई काहीच बघायला तयार नव्हती.
‘‘बग तरी, तुजा पप्पा तुज्यासाटी पुक्सत घेऊन आलाय.’’
हेही वाचा…बालमैफल: जागते रहो…
मायनं पिशवीतून पुस्तक काढून तिच्यासमोर धरलं. पानूबाईला विश्वासच बसेना. पानूबाईनं पुस्तक ओढून घेतलं. छातीशी घट्ट धरलं. पुस्तक उघडून त्याचा वास घेतला आणि पुस्तकाकडे किती तरी वेळ टक लावून बघत बसली. पुस्तक तसंच छातीशी कवटाळून झोपी गेली. मायनं तिच्या गालावरून हात फिरवून दोन्ही हातांची बोट कानशिलावर ठेवून कडाकडा मोडली. पुस्तक घेऊन पानूबाईच्या दप्तरात ठेवलं. पानूबाई झोपेत अजून हसू लागली. स्वप्नात तिला नव्या पुस्तकाचे पंख मिळाले होते. नवेकोरे पंख. दूर दूर घेऊन जाणारे.
farukskazi82@gmail.com