मेघश्री दळवी
सुट्टीत घरात पाहुणे येणार होते म्हणून आम्ही तयारी करत होतो. घराची साफसफाई, पाहुण्यांसाठी गाद्या-चादरी आणि विचार करून ठरवलेले दर दिवशीचे मेन्यू. आता ताज्या भाज्या आणायचं तेवढं बाकी होतं. सानिका टुणकन् उडी मारून या कामासाठी तयार झाली.
सानिकाला रंगीबेरंगी फळं आणि भाज्या बघायचा छंद आहे. बाजारातली गजबज, वेगवेगळ्या थाटात बोलणारे भाजीवाले, तऱ्हेतऱ्हेचे गंध याने ती अगदी वेडावून जाते. कोणत्या भाज्या घ्यायच्या, त्यांचे काय काय पदार्थ बनवता येतील, याची स्वप्नं रंगवायला तिला आवडतात. आणि जोडीने त्यांच्या किमती किती यांचा हिशेब करायलाही आवडतं.
आम्ही दोघी बाजारात पोहोचलो तर सुरुवातीलाच कोथिंबीर विकणारे पाचसहा जण बसले होते. छान ताज्या, हिरव्यागार जुड्यांचे ढीग बघून आणि तो खास गंध घेऊन मन तृप्त झालं. त्यातला एक लहान मुलगा बघून सानिका त्याच्याकडे गेली.
‘‘कितीला एक जुडी?’’
‘‘ताई, अगदी ताजी कोथिंबीर आहे.’’ तिचा प्रश्न ऐकून तो चुणचुणीत मुलगा हसून म्हणाला, ‘‘दहा रुपयाला एक आणि तीन घेतल्या तर पंचवीस रुपये.’’
‘‘हूं. म्हणजे प्रत्येक जुडी आठ रुपये तेहतीस पैशांना पडेल. आणि चार घेतल्या तर?’’
तो मुलगा गडबडला. पण त्यानेही मनोमन आकडेमोड केली असावी, कारण तो हुशारीत उत्तरला, ‘‘तीस रुपये.’’
‘‘अरे वा! मग तर प्रत्येक जुडी साडेसात रुपयांना पडेल. आई, घेऊया का?’’
‘‘ताई,’’ तो मुलगा पुढे म्हणाला. ‘‘बघा, सहा जुड्या घेतल्या तर मघाच्या रेटने पन्नास रुपये होतील. पण मी पंचेचाळीसला देतो.’’
‘‘हे तर आणखीच छान! आई, सहा जुड्या एकदम घेऊया का?’’
‘‘सानिका, चार जुड्यांचे तीस रुपये आणि सहा जुड्यांचे पंचेचाळीस. यात काय फरक आहे?’’
‘‘काहीच नाही आई. बरोबर. मग सहा जुड्या चाळीस रुपयांना मागू का? तर प्रत्येक जुडी सहा रुपये सहासष्ट पैशांना मिळेल. सर्वात स्वस्त. बरोबर?’’
मी बरोबर म्हटलं, पण तो मुलगा हिरमुसला. मग पुढे होऊन मी त्याला म्हटलं, ‘‘आधी म्हणालास ना, तशा पंचेचाळीस रुपयांना सहा जुड्या दे.’’
मी सानिकाकडे पन्नास रुपयांची नोट दिली.
‘‘आई, जीपे कर की!’’ सानिका लगेच म्हणाली.
तेवढ्यात तो मुलगा म्हणाला, ‘‘ताई, जीपे घेतो मी, पण ना – तुम्ही पन्नास रुपये दिलेत तर मी पाच रुपयांचं नाणं परत करेन. तुम्ही वीस रुपयांच्या तीन नोटा दिलात तर मी पंधरा रुपये परत करेन. असं तोंडी गणित करायला मजा येते.’’
सानिकाला असली मजा हवीच असते! ती लगेच म्हणाली, ‘‘हो, तू म्हणतोस तशी तोंडी गणिताची प्रॅक्टीस पाहिजे. त्यात काय काय धमाल असते! आणि अरे, नाण्यांची ना कोडीपण असतात. तुला माहिताय?’’
मग त्या मुलाकडे दुसरं गिऱ्हाईक आल्यावर आम्हाला निघायला लागलं, नाहीतर सानिका बसली असती तिथेच गप्पा मारत नि कोडी सोडवत!
आम्ही पुढे गेल्यावर सानिकाला प्रश्न पडला, ‘‘आई, आपल्याला त्या मुलाने सहा जुड्या पंचेचाळीस रुपयांना दिल्या. त्याच जर त्याने सुट्या सुट्या दहा रुपयांना विकल्या असत्या, तर त्याला एकूण साठ रुपये मिळाले असते ना? जास्त नफा झाला असता ना?’’
‘‘हिशेब बरोबर आहे. पण बघ, सहा जुड्या सहा माणसांना विकायला वेळ लागला असता. इथे एकाच वेळी ते काम होऊन गेलं. आणि पुढे कोणी गिऱ्हाईक आलंच नाही तर? अपेक्षा असेल तेवढी विक्री झालीच नाही तर? शिवाय कोथिंबीर लवकर खराब होऊ शकते. मग गेली ना ती फुकट. त्यात तर सगळाच तोटा. म्हणून त्याने आलेल्या संधीचा फायदा घेऊन लवकर माल संपवण्यावर भर दिला. मग नफा थोडा कमी झाला तरी चालेल.’’
‘‘अरे वा! म्हणजे स्वस्त-महाग, नफा-तोटा अशा साध्या आकडेमोडीच्या पलीकडेपण विचार करायला लागतो?’’
‘‘हो सानिका. अगं मोठी होशील तेव्हा शिकशील हे सारं वेगवेगळ्या विषयांमध्ये.’’
‘‘हूं. आता आणखी एक प्रश्न. आई, या जुड्या काही आपल्याला फार स्वस्त पडल्या नाहीत. एरव्ही जास्त घेतल्यावर स्वस्त मिळते भाजी. पण इथे त्याने चार जुड्यांचा जो भाव सांगितला त्याच भावाने आपण सहा जुड्या घेतल्या. आणि तू नेहमी करतेस तसं आपण बाकीच्या भाजीवाल्यांनासुद्धा नाही विचारलं. असं का?’’
‘‘काही वेळा ना सानिका, खूप घासाघीस नसते करायची. तू विचार केलास तर तुझं तुला उत्तर मिळेल – की आपण त्या मुलाकडून सहा जुड्या का घेतल्या.’’
‘‘आलं लक्षात.’’ क्षणभर थांबून सानिका म्हणाली. ‘‘चल आई, आता पुढची खरेदी करूया.’’
meghashri@gmail.com