नुसत्या डोळ्यांनी आपण किती दूरवर पाहू शकतो हे माहीत आहे का तुम्हाला? चंद्र, सूर्य, शनी असे एखादे तुमचे उत्तर असेल तर ते साफ चूक आहे. शनी साधारण १५० कोटी किलोमीटर दूर आहे. त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला फक्त ८० ते ८५ मिनिटे लागतात. पण ज्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत यायला २२ लाख वष्रे लागतात अशी वस्तू नुसत्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता हे माहीत आहे का तुम्हाला? काळोख्या रात्री, निरभ्र आकाशात आपणास ही वस्तू ‘धूसर’ ठिपक्याच्या स्वरूपात दिसू शकते. ही वस्तू म्हणजेच देवयानी आकाशगंगा ( Andromeda Galaxy M-31).
विसाव्या शतकाच्या दुसऱ्या शतकापर्यंत म्हणजे साधारण १०० वर्षांपूर्वीपर्यंत आपली आकाशगंगा म्हणजेच ‘विश्व’ असे आपण समजत होतो. १९२०-३०च्या दशकात शास्त्रज्ञांच्या चिकाटीमुळे आणि तांत्रिक प्रगतीमुळे आपली ही समजूत पार खोटी ठरली. कोलमडून पडली. अमेरिकेत २५४ सेंटीमीटर व्यासाची दुर्बीण माऊंट विल्सन येथे आहे. या दुर्बणिीचे याकामी मोठेच योगदान आहे. देवयानी आकाशगंगा पूर्वी एखाद्या तेजोमेघाप्रमाणे दिसायची. तिच्या पोटात तारे आहेत याचा आपणास पत्ता नव्हता. एडविन हबल या खगोलतज्ज्ञाने वरील दुर्बणिीचा वापर करून देवयानी तेजोमेघाचा फोटो घेतला तेव्हा त्यामध्ये खच्चून तारे भरलेले आढळले.
या फोटोमध्ये आपलं तेज कमी-जास्त करणाऱ्या ‘रूपविकारी’ ताऱ्यांचा ‘सिफाइड रूपविकारी तारे’ हा प्रकार आढळला. या प्रकारच्या ताऱ्यांची तेजस्विता कधी कमी तर कधी जास्त होते. त्यामध्ये एक प्रकारचा कालावधी असतो आणि तो नियमित असतो. या कालावधीवरून आणि त्याच्या तेजस्वितेतील फरकावरून ताऱ्याचे अंतर ठरविता येते. देवयानी आकाशगंगेतील या सिफाइड प्रकारच्या ताऱ्यांवरून या समूहाचे म्हणजे देवयानी आकाशगंगेचे अंतर वरीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आणि ते साधारण २२ लाख प्रकाशवष्रे आहे, असे ठरले. आपल्या आकाशगंगेचा व्यास फक्त एक लाख प्रकाशवष्रे आहे. म्हणजेच ‘देवयानी’ आकाशगंगा हे एक वेगळेच विश्व आहे असे सिद्ध झाले. आपल्या विश्वाची मर्यादा वाढली. आता संशोधनाअंती अशा अब्जावधी आकाशगंगा असल्याचे सिद्ध झाले आहे. उलट शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आकाशगंगांचे समूह किंवा गट (groups) आहेत. आपली आकाशगंगा, तिच्या दीडपट मोठी असलेली देवयानी आकाशगंगा आणि इतर छोटय़ा-मोठय़ा आकाशगंगा हा आकाशगंगांचा एक स्थानिक गट आहे.    n

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा