केटी बागलीलिखित ‘ओडिसी इन दि ओशन’ आणि ‘इन्ट्रिग्विंग इन्सेक्ट्स’ ही दोन पुस्तकं म्हणजे लहान मुलांसाठी निसर्गातील स्वारस्यपूर्ण माहितीचा खजिना आहे. समुद्रीजगत आणि कीटकांच्या विश्वाची अनोखी सफर ही पुस्तकं घडवून आणतात.
श्री बुक सेंटरच्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन अलीकडेच मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत करण्यात आले. यातील ‘ओडिसी इन दि ओशन’ या पुस्तकात समुद्रातील प्राणिजगत, वनस्पती आणि निसर्गासंबंधीची शास्त्रीय माहिती रंजकपणे देण्यात आली आहे. तर ‘इन्ट्रिग्विंग इन्सेक्ट्स’ या पुस्तकात वेगवेगळ्या कीटकांची आणि त्यांच्या जीवनप्रक्रियेची, सवयींची माहिती आहे.
बालवाचकांना नजरेसमोर ठेवून लिहिल्या गेलेल्या या दोन्ही पुस्तकांत दिली गेलेली शास्त्रीय माहिती कधी गोष्ट रूपात तर कधी कविता, संवाद यातून उलगडत जाते. आणि म्हणूनच मुलांपर्यंत ही सारी माहिती हलक्याफुलक्या मात्र लक्षात राहण्याजोग्या पद्धतीने पोहोचते.
गोष्ट अथवा कवितेनंतर त्या गोष्टीत डोकावलेले समुद्री प्राणी, वनस्पती वा कीटकांसंबंधी स्वारस्यपूर्ण माहितीची चौकट देण्यात आली आहे. केवळ लहानग्यांनाच नव्हे तर मोठय़ा वाचकांनाही या चौकटीचे वाचन करणे, हा आनंददायी अनुभव ठरतो. व्हेल, खेकडे, ओअर मासा, बेडूक जातीतला उभयचर प्राणी मडस्किपर, ऑक्टोपस, सी-हॉर्स, चित्त्यापेक्षा वेगाने पाणी कापत पोहणारा सेल-फिश, स्टारफिश, जेली फिश, फेदर डस्टर नावाचा किडा, उडणारे सायमन मासे, आर्चर फिश, शिंपले, समुद्री कासव, चंद्रप्रकाशात दिसणारे समुद्री जगत, कोरल्स आदींच्या गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतील.
वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या आणि माश्या, वाळवी, नाकतोडे, मधमाशी, कोळी, रेशमाचा किडा, अळी आणि पतंग यांसारख्या प्राण्यांचे जग, त्यांचे जीवनचक्र, उपजीविका, त्यांच्या सवयी यासंबंधीच्या अभ्यासपूर्ण गोष्टींचा समावेश ‘इन्ट्रिग्विंग इन्सेक्ट्स’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
समुद्रातील प्राणिजगत आणि कीटकांचं विश्व जाणून घेऊ इच्छिणाऱ्या बालकांना ही पुस्तकं नक्की आवडतील.
‘ओडिसी इन दि ओशन्स’ –
केटी बागली, श्री बुक सेंटर,
पृष्ठे – १०८, मूल्य -१९९ रुपये.
‘इन्ट्रिग्विंग इन्सेक्ट्स’ –
केटी बागली, श्री बुक सेंटर,
पृष्ठे – ११४, मूल्य – १९९ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा