भारत आणि इराण या देशांत हाताने केलेली कापडावरील चित्र म्हणून प्रसिद्ध झालेली व आत्ताही थोडय़ा प्रमाणात टिकून असणारा हा चित्र प्रकार म्हणजे ‘कलमकारी’! आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे व आणखी काही भागात ही कला उदयास आली. श्रीकलाहस्ती शैली आणि मच्छलीपट्टणम असे दोन काहीसे भिन्न कलानिर्मितीचे प्रकार यात दिसून येतात.
कापडावर प्रिंटसाठी म्हणून कोरीव काम केलेले लाकडी ठोकळे वापरूनदेखील चित्रं छापली जायची, पण त्यावरही बारीक नक्षीकाम हातानेच केले जायचे. पर्शियन भाषेतील शब्द ‘कलम’(पेन)आणि ‘कार’ (प्रावीण्य असणारी माणसे) या दोन शब्दांचा मिळून कलमकारी हा शब्द तयार झाला. असे ‘कारी’ असणारे शब्द आपण सतत ऐकत असतो. जसं की- कलाकारी, सुवर्णकारी, शिकारी, भिकारी..आणि ब्रिटानिया मारी!
हा हा!!
तर ही कला विशेष ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापडावर पेन वापरून काढलेली मुक्त हस्त चित्र (फ्री हँड ड्रॉइंग). त्यावर नैसर्गिक रंगाचे डाय वापरून केलेलं रंगकाम, हे होय. खरं तर चित्रकथी पट्टचित्रजवळ जाणारी आणि बाटिक पद्धतीने रंगवलेल्या कापडाशी साधम्र्य असणारी. हाताने केलेलं कापडावरचं नक्षीकाम या चित्रांना वेगळं करतं. हा पेन कुठला असायचा? अॅडजेल?.. रोटोमॅक? फ्लेअर? नाही! बांबू किंवा खजुराच्या झाडाच्या फांद्यांच्या बारीक तासून हे अणकुचीदार पेन बनले जायचे व नैसर्गिक रंग वापरल्याने कापड पाण्याने धुतले तरी रंग जायचा नाही. ही रंग लावण्याची पद्धत (डाय) थोडी क्लिष्ट आहे.
हा चित्र प्रकार मुघल, गोवळकोंडा राजवटीत बहरला. पण आपली वेगळी ओळख जपलेली दिसते. या चित्रातील प्राणी अलंकारिक (नक्षीदार) पद्धतीने काढलेली आहेत. बऱ्याचदा कपडय़ात प्राणी सोडून बॅकग्राऊंडला रंग लावलेला दिसतो. या चित्रात फार जंगली प्राणी दिसत नाहीत. कारण चित्रांचे विषय केवळ रामायण, महाभारतसारख्या पुराणकथा किंवा देवाची वाहने असणारे प्राणी याचभोवती फिरत असल्याने त्यात जितके प्राणी येतात तितकेच प्राणी चित्रातही दिसतात. यातील सिंहाचे तोंड पाहिल्यास दक्षिण भारतातील मंदिरशिल्पांची आठवण येईल.
ही चित्रकला मंदिर व आसपासच्या भागात विकसित झाली. कलमकारी पद्धतीने सजलेल्या साडय़ा, ओढण्या बाजारात मिळतात. तुम्हालाही या पद्धतीत प्रयोग करून पाहायचा असेल तर यूटय़ूबवर टय़ुटोरिअल्स मिळतील किंवा घरातील स्वच्छ धुतलेला रुमाल घ्या. फॅब्रिक रंग घेऊन पातळ करा. त्यात रुमाल बुडवून ठेवा व उन्हात सुकू द्या. तो नीट सुकला की त्यावर काळ्या मार्करने कुठल्याही प्राणी-पक्ष्यांचे चित्र काढा. कपडय़ांवर चित्र काढायचा विशेष पेन बाजारात मिळतो.
मग करताय ना कारागिरी विथ कलमकारी!
श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in