मेघना जोशी
‘भीती वाटते!’.. सहजगत्या देता ना हे कारण? आठवा बरं स्वत:शीच. कोणतीही स्पर्धा, परीक्षा, एवढंच काय, एखाद्या वर्गकार्यातला सहभाग किंवा कोणाकडे जाऊन चौकशी करणं किंवा निरोप देणं.. यासाठी हे कारण सहजगत्या पुढे केलं जातं. आणि ही भीती कुणाची आणि कसली वाटते? असा प्रश्न विचारल्यावर मला अनेक उत्तरं मिळालीयत. जसं की, परीक्षेच्या हॉलमध्ये जायची भीती वाटते. किंवा सगळ्यांसमोर उभं राहून काही करायला किंवा सांगायला भीती वाटते. परीक्षेत किंवा स्पर्धेत अपेक्षित यश मिळालं नाही तर आई-बाबा ओरडतील किंवा शिक्षक ओरडतील अशीही भीती वाटते काही जणांना. तर काही जणांना स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी करू शकलो नाही तर आपणच आपल्या नजरेतून उतरू अशी भीती वाटते. एवढंच कशाला, साधं वर्गात उभं राहून उत्तर द्यायचं किंवा एखादं गाणं म्हणायचं किंवा गोष्ट सांगायची तर इतर काय म्हणतील, काही चुकलं तर हसतील, मित्रमंडळी चेष्टा करतील.. एक ना अनेक गोष्टींची भीती मनात दबा धरून बसलेली असते. आणि ही भीती हा आपला सगळ्यात मोठ्ठा हितशत्रू असतो. कारण ही भीती आपण जर मनात तशीच साठवून ठेवली तर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी आपण पुढाकार घेणार नाही. जसं की- स्पर्धा, परीक्षा यांमधला सहभाग. त्याबरोबरच वर्गात उत्तर देणं.. यासारखी साधीशी गोष्टसुद्धा आपण करणार नाही आणि सर्वामधून आपोआपच मागे पडत जाऊ. हे टाळण्यासाठी भीती काढून टाकायची. ती कशी? तर एक छोटीशी गोष्ट करायची, जे काम करायचं त्यावर लक्ष द्यायचं, पुढे काय घडेल याचा विचार नाही करायचा. म्हणजे, गाणं म्हणायचं असेल तर ते सुंदर म्हणायचं. उत्तर जास्तीतजास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा; म्हणजे आपोआपच भीती कमी होईल. तसंच आई-बाबांची भीती वाटून काही काम तुम्ही टाळत असाल तर आई-बाबांशी तसं स्पष्ट बोलायचं. आणि कुणी हसण्याची भीती वाटत असेल तर ‘हसतील त्याचे दात दिसतील,’ असं म्हणायचं आणि आपल्या कामात व्यग्र व्हायचं. अजून एक महत्त्वाचं, एखादी मोठी व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असेल आणि घरचे त्यांच्याशी संपर्क ठेवायला भाग पाडत असतील, तर ते टाळण्यासाठी फक्त ‘भीती वाटते’ हे पालुपद वापरायचं नाही बरं का! ती का वाटते हे विनासंकोच सांगायचं घरच्यांना. बघा बरं, आता जाईल ना भीती!
joshimeghana231@yahoo.in