मेघश्री दळवी
बोयान स्लाट हा एक डच शाळकरी मुलगा. सुट्टीत हौसेने ग्रीसमध्ये गेला. पण तिथल्या समुद्रात पोहताना त्याला आजूबाजूला प्लॅस्टिकचा कचराच कचरा दिसला. प्लॅस्टिकचं हे प्रमाण बघून तो इतका हताश झाला, की आता काहीतरी करायलाच हवं हे त्यानं मनाशी पक्कं केलं.
ही गोष्ट २०११ ची. तेव्हा तो अवघा सोळा वर्षांचा होता. पण तेव्हा केलेला निर्धार कायम ठेवून त्याने पुढची अनेक वर्ष याच कामाला वाहून घेतलं.
खरं तर या वयात खेळ, सिनेमे, मित्र-मैत्रिणी यापलीकडे मुलांचं फारसं लक्ष जात नाही. पण बोयानने ते केलं. २०१३ मध्ये त्याने ‘ओशन क्लीनअप’ ही संस्था स्थापन केली. भरपूर अभ्यास करून पॅसिफिक महासागरातला प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याची योजना बनवली. त्याला काही सागरविज्ञान संशोधकांचा पाठिंबा मिळाला. आर्थिक मदत मिळाली. ही महत्त्वाकांक्षी योजना हळूहळू आकार घेत गेली. अलीकडेच सप्टेंबर २०१८ मध्ये तिचा पहिला टप्पा सुरू झाला, म्हणजे सात वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर!
एक ते दोन किलोमीटर लांबीचे अर्धवर्तुळाकार तरंगते तराफे ही रचना म्हणजे एक कृत्रिम किनाराच समजा. त्याला खोल नांगर आहेत, तेही तरंगते. त्यामुळे तिथे मोठं मजबूत बांधकाम करावं लागणार नाही. पॅसिफिक महासागरातल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे प्लॅस्टिक कचरा आपोआप या रचनेजवळ गोळा होईल, एखाद्या बीचवर येतो तसा. मग महिन्यातून एकदा तो कचरा बोटीने उपसून काढायचा. बोयानची ओशन क्लीनअप कल्पना तशी सोपी आहे आणि अशा सोप्या कल्पना मुलांनाच सुचतात.
२०२० पर्यंत ही पूर्ण योजना कामाला लागेल. त्यात साठ तराफे असतील. २०२५ पर्यंत पॅसिफिक महासागरातला कचरा निम्मा करण्याची बोयानची आकांक्षा आहे. या अनोख्या प्रकल्पाकडे येती अनेक र्वष जगाचं लक्ष असेल हे नक्की!
मनात आणलं तर माणसाला काहीही शक्य आहे हे बोयानने अक्षरश: खरं करून दाखवलं आहे. लहान वयातली त्याची पर्यावरणाविषयी समज, चिकाटी आणि आत्मविश्वास याला मनापासून सलाम!
meghashri@gmail.com