मुक्ता चैतन्य

आज मी तुम्हाला एका वेगळ्या माध्यमाची ओळख करून देणार आहे. या माध्यमाचं नाव आहे पॉडकास्ट. पॉडकास्ट म्हणजे एकप्रकारचा रेडिओच. फक्त हा रेडिओ म्हणजेच पॉडकास्ट इंटरनेटवर उपलब्ध असतं. रेडिओसाठी लागणारी फ्रिक्वेन्सी, सरकारी परवानग्या वगैरेंची यात गरज नसते. या पॉडकास्टवर एखादी व्यक्ती एखादा विषय घेऊन श्रोत्यांशी संवाद साधते. मोठय़ांसाठी जसे पॉडकास्ट असतात तसेच लहान मुलांसाठीही पॉडकास्ट असतात. पॉडकास्टच्या वेबसाईट्स वर जाऊन किंवा अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता.

भारतात मुलांसाठीचे पॉडकास्ट मोठय़ा प्रमाणावर नसले तरी जगभर मुलांसाठी अनेक छान छान पॉडकास्ट आहेत. आणि हाताशी इंटरनेट असल्यावर आपण देशांच्या सीमारेषा ओलांडून कुठल्याही देशातले पॉडकास्ट ऐकू शकतो. नाही का?

बीबीसी या जगविख्यात कंपनीचं लहानमुलांसाठी पॉडकास्ट आहे. निरनिराळ्या विषयांवर हे पॉडकास्ट आहेत. गणित, विज्ञानापासून संगीत आणि साहित्याचे पॉडकास्टही तुम्हा मुलांसाठी बनवलेले आहेत. या पॉडकास्ट साठी https://www.bbc.co.uk/radio/categories/childrens या लिंकचा वापर करा.

‘बट व्हाय’ हा असाच अजून एक पॉडकास्ट. या पॉडकास्टवर जगभरातून मुलं त्यांचे प्रश्न विचारून पाठवत असतात. यात तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर प्रश्न रेकॉर्ड करूनही या पॉडकास्टला पाठवू शकता. एकदा तुमचा प्रश्न त्यांच्याकडे गेला की तिथले तज्ज्ञ त्याचं उत्तर पॉडकास्टच्या माध्यमातून देतात. हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी या http://digital.vpr.net/programs/why-podcast-curious-kids#stream/0 लिंकचा वापर करा. अजून एक असाच इंटरेस्टिंग पॉड- कास्ट आहे अमेरिकन पब्लिक मीडियाचा. नाव ब्रेन्स ऑन. तुम्ही मुलं खूप जिज्ञासू असता. तुम्हाला सारखे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम हा पॉडकास्ट करतो. विशेषत: विज्ञान आणि इतिहासातल्या गोष्टींची उत्तरं देण्यात हा पॉडकास्ट पटाईत आहे. शिवाय, अनेकदा पॉडकास्ट चालवणारी मुलंच असतात. त्यांना होस्ट म्हणतात. या पॉडकास्टवर जवळपास १०० हून अधिक निरनिराळ्या विषयांवरचे एपिसोड्स आहेत. जगभरातल्या विविध गमतीशीर, कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ‘वॉव इन द वर्ल्ड’ या पॉडकास्ट मधून मिळू शकते. त्यासाठी https://www.npr.org/podcasts/510321/wow-in-the-world ही लिंक वापरा. मराठीत स्नॉवेल म्हणून एक संस्था आहे. त्यांच्या साइटवर गेलात की मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. तिथे तुम्हाला छान छान गोष्टी आणि पुस्तकं ऐकायला मिळतात. त्यासाठी  https://snovel.in/product-tag/children  या लिंकचा वापर करा.

इंटरनेटवर फक्त व्हिडीओज् असतात असं नाहीये. पॉडकास्टची दुनिया मोठी रंजक आणि प्रचंड माहिती देणारी, छान छान गोष्टी सांगणारी आहे. तर मग सतत काहीतरी बघत बसण्यापेक्षा आता शांत बसून ऐकण्याची मजाही घेऊयात का?

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)