मेघश्री दळवी meghashri@gmail.com
दुर्बीण आकाशात रोखून ग्रहगोल पाहण्याची मजा काही औरच असते. पण कितीही चांगली दुर्बीण असली तरी वातावरणाचा थर आणि सगळीकडे सतत दिव्यांचा वापर यामुळे नीट निरीक्षण होऊ शकत नाही. मग याच्यावर उपाय म्हणून दुर्बीण घेऊन अवकाशातच गेलं तर?
लायमन स्पिट्झर या शास्त्रज्ञाने ही कल्पना मांडल्यावर १९६५ पासून अशा छोटय़ा-मोठय़ा दुर्बिणि अवकाशात सोडलेल्या आहेत. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर गेलं की अवकाशाच्या पोकळीत निरीक्षण जास्त चांगलं होऊ शकतं. यातली सर्वात मोठी शक्तिशाली दुर्बीण म्हणजे हबल. १९९० पासून हबल आपल्याला अवकाशाबद्दल सतत नवनवीन माहिती देत असते. कधी दहा कोटी प्रकाशवर्ष दूरचे तारकापुंज, तर कधी नेपच्यूनचे अत्यंत सुस्पष्ट फोटो.
आता हबलशी टक्कर घ्यायला तयार आहे नवी अवकाश दुर्बीण- जेम्स वेब. २०२१ मध्ये ती अवकाशात सोडली जाईल. तिच्याकडून काय काय माहिती मिळेल म्हणून कित्येक खगोलशास्त्रज्ञ आतापासूनच डोळे लावून बसले आहेत. ही अतिशय शक्तिशाली दुर्बीण आपल्या सूर्यमालेच्या पलीकडल्या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करू शकेल. तिथे पाण्याचा शोध घेऊ शकेल. विश्वातला सर्वात पहिला प्रकाश पाहण्याइतपत क्षमता तिच्यात आहे. त्यामुळे विश्वाच्या निर्मितीची कोडी उलगडायला तिची मदत होईल.
जेम्स वेब हा नासासाठी खूप मोठा प्रकल्प आहे. एकतर ही दुर्बीण हबलच्या जवळजवळ दुप्पट मोठी आहे. तिच्या आरशाचा व्यास तब्बल साडेसहा मीटर आहे. या आरशावर पन्नास ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेला आहे. तिची अचूकता इतकी आहे की, चाळीस किलोमीटर दुरून ती पाच रुपयाचं नाणं स्पष्ट पाहू शकेल.
अशी ही सोनेरी दुर्बीण आपल्यापासून प्रचंड अंतरावर असेल. चंद्र जितक्या अंतरावर आहे, त्याच्या चौपट दूर. त्यामुळे तिथे जाऊन तिची दुरुस्ती करणं कठीण आहे. तेव्हा ती इथूनच अगदी निर्दोष करून मगच अवकाशात पाठवावी लागेल. २०२१ मध्ये निघून ही दुर्बीण एकदा का तिथे पोचली, की पुढची दहा-पंधरा वर्ष अफलातून अवकाश खजिना आपल्याला खुला करणार आहे!