मेघश्री दळवी
गगनयानातून भारतीय अंतराळवीर २०२२ मध्ये अवकाशात जातील- ही घोषणा ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले असतील ना? स्टार वॉर्स, स्टार ट्रेक या मालिकांत नेहमी नवनव्या ग्रहांवर माणसं जाताना दिसतात. त्यांच्या जागी आपण असावं असंही वाटतं ना?
अवकाशात भरारी मारण्याचं स्वप्न कित्येकांचं असतं. येत्या काही वर्षांमध्ये त्यातली काही निवडक मंडळी खरोखरच असा नवलाईचा प्रवास करीत मंगळावर जातील. स्पेसएक्स कंपनीला दोनशे जणांचा चमू २०२४ मध्ये मंगळावर न्यायचा आहे. तिथे जाऊन राहण्याची सगळी व्यवस्था ते तिथे करणार आहेत. मग नंतर आणखी माणसंही हळूहळू जाऊ शकतील.
‘मार्स वन’ हा असा अजून एक प्रकल्प. मंगळावर जायचं असं त्यांनी २०१२ मध्ये नुसतं जाहीर केलं मात्र आणि लगोलग दोन लाख लोकांनी त्यांच्याकडे अर्ज केले. मंगळाच्या या दोन्ही मोहिमा फक्त जायच्या आहेत, परत यायचं नाही, हे माहीत असतानाही!
२०३५ मध्ये तिथे पोचण्याच्या दृष्टीने नासाचेसुद्धा प्रयोग सुरू आहेत. मंगळावर तिथलंच साहित्य वापरून घर उभं करण्याच्या स्पर्धेसाठी नासाने आराखडे मागवले होते. अलीकडे जूनमध्ये त्यातले पाच नासाने निवडले. तऱ्हेतऱ्हेचे आकार असलेली ही थ्रीडी प्रिंटिंग केलेली घरं म्हणजे माणसाच्या कल्पनाशक्तीचा जबरदस्त आविष्कार आहेत. कोणी तिथले खडक आणि बर्फ वापरलाय, तर कोणी थर्मोप्लॅस्टिक. रेडिएशनपासून बचाव आणि घरात पुरेसा प्रकाश यांचा विचार या आराखडय़ांमध्ये आहे.
अर्थात, मंगळावर राहणं जितकं थरारक आहे तितकंच खडतरही आहे. विरळ वातावरण, त्यातला कार्बन डायऑक्साइड, अपायकारक अल्ट्राव्हायोलेट किरण, कमी गुरुत्वाकर्षण, अंटाक्र्टिकाहून अधिक थंडी, पाण्याची चणचण.. या सगळ्याचा सामना करत त्यांना तिथे टिकायचं आहे. पण तरीही आपल्या सूर्यमालेत वसाहत करायची असेल तर तो हाच ग्रह सर्वात उत्तम आहे.
या कल्पना प्रत्यक्षात आणायच्या तर नवं तंत्रज्ञान लागेल. नवी साधनं लागतील. नवे विचार लागतील. अर्थात, तीच तर अवकाशात जाण्याची खरी मजा आहे ना!
meghashri@gmail.com