मेघश्री दळवी

मागे ‘पोकेमॉन गो’ हा खेळ खूपच गाजत होता. आपल्या मोबाइलमध्ये टिपलेल्या दृश्यात चक्क पोकेमॉन आलेले बघून सगळे वेडावून गेले होते. त्यात मग खूप जण धडपडले, चुकीच्या जागी पोचले, काही तर हरवले देखील!

ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे वास्तवात आभासी भर घालणारं हे तंत्रज्ञान आता फक्त नवलाईचं राहिलेलं नाही. हल्ली मिक्स्ड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानात त्यातल्या आभासी गोष्टी आपण हाताळू शकतो. आपल्या सभोवताली प्रत्यक्ष दिसणारं आणि त्यात जोडीला आणखी काही असं हे मिश्रण अनेक ठिकाणी वापरलं जातं आहे.

विमान उडवण्याचं प्रशिक्षण, अग्निशमन तंत्र, किंवा अत्याधुनिक युद्धसाधनं, यात प्रत्यक्ष सराव करण्याआधी मिक्स्ड रिअ‍ॅलिटी वापरण्याचा खूप फायदा होतो. तसाच फायदा होतो तो वैद्यकशास्त्रात. मानवी शरीराचा अभ्यास करताना वेगवेगळ्या अवयवांची अंतर्गत रचना समजून घ्यायला मिक्स्ड रिअ‍ॅलिटीची मदत होते. शस्त्रक्रियेच्या सरावासाठी आणि प्रथमोपचार करतानासुद्धा या तंत्राचा उपयोग होतो आहे.

अलीकडे मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचा आणखी एक डोकेबाज वापर झाला तो हवामानाची माहिती देताना. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर फ्लोरेन्स हे चक्रीवादळ धडकणार होतं. अशा वेळी माहिती देताना अमुक वेगाचा वारा, तमुक उंचीच्या लाटा असं नेहमी सांगतात. काही ठिकाणी ही माहिती चित्ररूपाने दाखवतात. पण त्याच्याही पुढे जाऊन खऱ्याखुऱ्या जागी या तुफानाचं थैमान दाखवता आलं तर? फक्त कल्पना करण्याऐवजी ते डोळ्यांसमोर उभं करता आलं तर? अशा प्रकारे धोक्याचा इशारा देता आला तर?

नॉर्थ कॅरोलायना राज्यात असा अनोखा प्रयोग तिथल्या वेदर चॅनेलने केला. रस्त्यावर वाढणारं पाणी, बघता बघता ते माणसाच्या उंचीइतकं झालेलं, त्यात हेलकावणाऱ्या गाडय़ा, वाऱ्याने झोडपलेली झाडं, पाणी आणखी वाढल्यावर बैठी घरं पूर्ण बुडून गेलेली- वादळाचा तडाखा दाखवणारं हे दृश्य इतकं जिवंत वाटत होतं, की हे खरं नाही, मिक्स्ड रिअ‍ॅलिटी आहे असं त्या चॅनेलला पुन्हा पुन्हा सांगावं लागत होतं!

meghashri@gmail.com

Story img Loader