मुक्ता चैतन्य
तुमच्या आई-बाबांच्या फोनवर व्हॉट्सअप मोमो चॅलेंजबद्दलचे मेसेजेस नक्की आले असतील. त्याबद्दल त्यांनी तुम्हालाही सांगितलं असेल. पण समजा तुम्हाला याबद्दल काही माहीत नसेल तर माहीत व्हावं यासाठी हा आजचा लेख- विशेषत: ऑनलाइन गेम्सच्या संदर्भात!
मोबाइल आणि ऑनलाइन गेम्समध्ये विविध प्रकार असतात. त्यात बुद्धीला चालना देणारे, लॉजिकल कौशल्ये विकसित करणारे, एखादं शहर वसवायला सांगून टाउन प्लॅनिंगसारख्या किचकट गोष्टीतून अनेक कौशल्ये वापरण्याची संधी देणारे खेळही असतात. पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही, कारण हे खेळ मेहनतीने खेळावे लागतात. विचार करावा लागतो. लॉजिक लावत. आपली प्रत्येक मूव्ह ठरवावी लागते. त्यामुळे हे खेळ खेळण्यापेक्षा ज्यासाठी विशेष मेहनत लागत नाही, किंवा ज्यात काहीतरी थ्रिल आहे असे खेळ खेळण्याकडे बहुतेक मोठय़ांचा आणि तुम्हा बच्चे कंपनीचाही कल असतो. मला सांगा, गाडय़ांची रेस, कॅण्डी क्रश किंवा छोटय़ा मुली- जे बाहुल्यांना नटवण्याचे खेळ खेळतात त्यातून वेगळं काही मिळतं का? शिवाय या सगळ्या गेम्समध्ये ठरलेले ऑप्शन्स असतात. चार वेळा खेळलं की पाचव्यांदा तुम्हा मुलांना हे लक्षात येतं, की नेमकं काय केलं की पुढच्या लेव्हलला जाता येईल. तरीही तुम्ही सतत वेगवेगळे खेळ खेळत असता. आपण एखादी गोष्ट का करतोय याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. विशेषत: अशा गेम्सच्या बाबतीत जिथे तुम्हाला कोणीतरी तिऱ्हाईत व्यक्ती काहीतरी चॅलेंज करायला सांगते आणि तुम्ही आई-बाबांना न सांगता किंवा त्यांच्यापासून लपून अशी चॅलेंजेस पार करता. हे खूप डेंजरस असू शकतं. अनेकदा शाळेत कुणीतरी एखादा गेम खेळत असतं, आपण खेळत नाही असं इतर मित्रमत्रिणींना समजलं तर ते आपल्याला हसतील, आपली गंमत करतील या भीतीने आपण तो खेळ खेळायला लागतो. होतं की नाही असं? यालाच म्हणतात पिअर प्रेशर! पिअर प्रेशर म्हणजे बरोबरच्या मित्रमत्रिणींनी आपल्याला हसू नये, आपली गंमत करू नये, आपल्याला कमी लेखू नये म्हणून त्यांच्या दबावाखाली येऊन आपण अनेक गोष्टी करत राहतो.
पण असं बाकीची मुलं आपल्याला काय म्हणतील याचा विचार करून आपण काय खेळायचं, काय नाही, मुळात गेमिंग करायचं की नाही, याचे निर्णय घ्यायचे असतात का? विचार करा हं!
या गोष्टी करा-
१) कुठलाही गेम खेळायला सुरुवात करताना तो तुम्ही का खेळणार आहात हे एकदा स्वत:ला विचारा. तुम्ही तो गेम खेळताय आणि का खेळताय हे आई-बाबांना सांगा.
२) तुम्हाला गेम खेळताना कसलंही विचित्र चॅलेंज कुणीही दिलं तर ते पूर्ण करू नका. उलट तो गेम मोबाइलमधून लगेच काढून टाका.
३) समजा, तुमच्या मित्रमत्रिणींपैकी कुणी फार जास्त गेमिंग करत असेल तर त्याला जागं करा. तो ऐकत नसेल तर शिक्षक किंवा तुमचे पालक यांच्या कानावर घाला. मित्र असणं म्हणजे फक्त गुपितं जपणं नसतं. आपला मित्र वा मत्रीण चुकत असेल तर ते लक्षात आणून देणंही आपलं काम असतं.
४) गेमिंगसाठी वेळ ठरवून घ्या. एक लक्षात घ्या, गेमिंग कितीही केलं तरी अजून करावं असं वाटतंच! शेवटची पाच मिनिटं असं म्हणत तासन् तास जातात, त्यामुळे गजर लावून गेमिंग करायला सुरुवात करा. किंवा आई-बाबांनी ‘आता बास’ म्हटलं की कुठल्याही लेव्हलला असलात तरी गेम थांबवण्याची शिस्त पाळा.
५) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हुशारीने गेम्स निवडा. अमुक एका गेमची क्रेज आहे, मित्रमत्रिणी खेळतात, अमुक एक गेम खेळला नाही तर वर्गात मुलं टर उडवतात म्हणून गेम्स खेळायचे नसतात.
सतत गेमिंग केल्याने काय होतं?
१) सतत गेमिंग केल्याने फक्त गेमिंगच करत राहावंसं वाटतं. मग अभ्यास मागे पडू शकतो. बाहेर खेळायला जाण्यापेक्षा गेमिंग करावं असंच वाटायला लागतं.
२) डोळे, पाठ, मान, बोटं यांना त्रास होतो. ते थकतात.
३) मित्र-मत्रिणींबरोबर खेळणं आपण विसरून जातो, किंवा ते कमी कमी होत जातं.
४) कुणीही आपल्याला गेमिंग थांबवा, असं सांगितलं तर आपली चिडचिड होते. राग येतो.
५) गेमिंगमुळे रिलॅक्स होण्याऐवजी एक एक लेव्हल्स पार करण्याचं टेन्शन आणि प्रेशर वाढत जातं. त्यामुळे गेमिंगमुळे विषयांतर होत असेल, आराम नक्कीच मिळत नाही. त्यामुळे कधीतरी गेमिंग केलं तर ठीक आहे, पण सतत गेमिंगचे फारसे फायदे नाहीत.
तुम्हा मुलांच्या डोक्यातून भन्नाट कल्पना येत असतात. त्यांना भरपूर खतपाणी घाला. आता ‘Team Livewire’ म्हणून सहावी ते आठवीच्या मुंबईतल्या मुलांचा गट आहे. त्यांनी काय केलं, तर बाथरूममध्ये फ्लश टँकमध्ये जे वाया जातं ते पाणी वाचवता येईल का, यासाठी एक प्रयोग केला. एकदा फ्लश टँक वापरलं की १० लिटर पाणी वापरलं जातं. खरं तर इतक्या पाण्याची गरज नसते. मग पाण्याचा वापर कमी कसा करता येईल यासाठी या टीमने काही प्रयोग केले. इतकंच नाही तर ही टीम आता सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित ‘फ्लेक्सी फ्लश’ तयार करत आहेत. यांची संपूर्ण गोष्ट तुम्हाला वाचायची असल्यास https://www.thebetterindia.com/147688/news-mumbai-kids-prevent-water-wastage ही लिंक पाहा.
muktaachaitanya@gmail.com
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)