मुक्ता चैतन्य
तुम्ही शाळेत कुठल्या कुठल्या भाषा शिकता?
मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत.. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असाल तर फ्रेंच आणि जर्मनही शिकायला मिळू शकते. खरं तर अनेकदा संस्कृत, फ्रेंच, जर्मन या भाषा चांगलं स्कोअिरग देतात म्हणून आपण शिकतो, घेतो. पण तुम्हाला गंमत माहीतेय का, आपल्याला जितक्या जास्त भाषा येतील तितकं आपल्या जगभरातील निरनिरळ्या भाषा बोलणाऱ्या समुदायांची संस्कृती, साहित्य आणि रोजचं जगणं समजून घ्यायला मदत मिळू शकते. जितक्या नवीन भाषा आपण शिकू तितकं जग समजून घ्यायला आपल्याला मदत मिळते. आणि मोठेपणी भाषा शिकण्यापेक्षा लहानपणी त्या चटकन येतात.
आता तुम्ही म्हणाल की, आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतो, आम्हाला संस्कृत सोडून दुसरी कुठलीही भाषा शाळेत शिकण्याचा स्कोप नाहीये. किंवा तुम्ही म्हणाल, आम्ही इंग्लिश मीडियममध्ये आहोत, संस्कृत, फ्रेंच आणि जर्मनशिवाय इतर भाषांचे पर्याय कुठे उपलब्ध आहेत? मग आम्ही भाषा शिकायची कशी?
कशाला काळजी करता. तुम्हाला जी कुठली भाषा शिकायची असेल- परदेशी किंवा भारतीय- ती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शिकू शकता. डोरेमॉन बघता, मग जपानी शिकावीशी वाटली तर ‘गुगलदादा’ची मदत घ्यायची आणि शिकायची भाषा. किंवा बंगाली, तेलगू, पंजाबी कुठलीही भाषा शिकायची तर इंटरनेटच्या सोबतीने आज सहज शक्य आहे.
इंटरनेटवर फी भरून भाषा शिकवणाऱ्या साइट्स आहेत, तशाच विविध भाषांचे मोफत धडे देणाऱ्या साइट्सही आहेत. निरनिराळ्या लिपी कशा लिहायच्या, अक्षरांची वळणं कशी काढायची हे शिकवणाऱ्या साइट्स आणि व्हिडीओज् उपलब्ध आहेत. त्यासाठी क्लासला जायला नको, त्यावर पसे खर्च करायला नको. तुम्हाला हवी ती भाषा जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता. सुरुवातीला हवं तर आई-बाबांची मदत घ्या. म्हणजे ‘ई लìनग’ कसं चालतं हे समजून घ्यायला मदत होईल.
मी काही साइट्स देतेच आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही भारतातली आणि जगभरातली कुठलीही भाषा शिकू शकता.
शिवाय ‘गुगलदादा’ आहेच. त्याच्यावर सर्च केलात की असंख्य साइट्स मिळतील.
भारतीय भाषा शिकवणाऱ्या साइट्स
https://www.languageshome.com
http://www.languagereef.com
https://www.dwibhashi.org
मोफत परदेशी भाषा शिकवणाऱ्या काही साइट्स
https://www.futurelearn.com/courses/categories/languages-and-cultures-courses?all_courses=1&filter_availability=open&all_courses=1
https://www.duolingo.com/
http://www.bbc.co.uk/languages/index.shtml
https://www.italki.com/home
रेड अलर्ट
- कुठलीही वेबसाइट ओपन करताना ती सुरक्षित आहे ना हे बघा.
- ऑनलाइन भाषा शिकताना जर व्हिडीओज् असतील तर ते काळजीपूर्वक डाउनलोड करा. ते डाउनलोड करताना जर तुमच्या संगणकाने अलर्ट केलं तर लगेच साइट बंद करून डाउनलोडिंग बंद करा.
- ऑनलाइन प्रशिक्षणात समोरून वेब कॅम वापरून काही संवाद अपेक्षित असेल तर आई-बाबांना त्याबद्दल सांगा. त्यांची मदत घ्या. म्हणजे संवाद सुरक्षित चालू आहे की नाही याचा अंदाज त्यांना घेता येईल.
- भाषा ऑनलाइन शिकायची असली तरी संगणकासमोर बसताना वही, पेन, पेन्सिल घेऊन बसा. म्हणजे तुमच्या नोंदी तुम्हाला काढता येतील.
(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)