श्रीनिवास बाळकृष्ण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वीवरल्या प्रिय मित्रा,

हाय फाय,

तुझ्या निमित्तानं या वर्षभरात जगभर चिक्कार फिरलो. वाळवंटातल्या उन्हातान्हात, जंगलातल्या गर्द अंधारात, खोल समुद्रात तर कधी गोठवून टाकणाऱ्या बर्फाळ प्रदेशात.. तिथल्या शेकडो लोकांशी आणि अगणित प्राण्यांशी बोलून तुझ्यासाठी निवडक

२३ चित्रपुस्तकं वर्षभरात आणली. कथा,

चित्रं उलगडून दाखवली. त्या पुस्तकांमधल्या खास चित्रपद्धतीबद्दल बोललो. अजूनही शेकडो उत्तम पुस्तकं तुझ्यापर्यंत पोहोचावीत म्हणून उडय़ा मारतायेत. पण आधीच्या पुस्तकाचाच डोक्यात ओव्हरडोस झालाय की आणखी भडिमार नको.

छोटी-मोठी मध्यम आकाराची, देशी-विदेशी, कळणाऱ्या न कळणाऱ्या भाषांतली, शब्द नसलेली, रंगीत, काळी-पांढरी, उभी, आडवी, उलटी-सुलटी, उलगडणारी, मिटणारी कठीण सोपी अशी चित्रपुस्तकं. त्यात वापरलेली नवी नवी रंग माध्यमं लक्षात आहेत ना? जलरंग, अ‍ॅक्रॅलिक, कोलाज, डिजिटल, माती, फोटो, मिक्स मीडिया अशा अनेक तंत्रांनी सजलेली ही पुस्तकं. ती कशी करायची हेही सांगितलेलंच आहे म्हणा. तू करून पाहिलंस का? त्यासाठी चित्रकार, इलस्ट्रेटर यांनी दिवसरात्र केलेली मेहनत शब्दश: रंग आणत होती.

आपल्याला चांगली चित्र पाहून काय मिळतं हे आपल्यालाच ठाऊक. चित्रासोबत न दिसणारे लेखक, अनुवादक, डिझायनर, प्रिंटर, वितरक यांच्या मेहनतीनं ही पुस्तकं तुला दिसू शकली. या सर्वाना ज्या प्रकाशन संस्थेनं एकत्र आणलं, सुरुवातीचे पैसे लावले, त्या सर्वाचेच आज आभार मानूयात आणि शुभेच्छाही देऊयात- पुढच्या चांगल्या पुस्तकनिर्मितीसाठी!

पत्रास कारण हे की, वर्षांअखेरीस माझा पृथ्वीवरचा व्हिसा संपल्यानं आता यापुढे असं रविवारी भेटणं शक्य नाही. त्यामुळे आता थांबतो. पुढे मी आता तिसऱ्याच ग्रहावरच्या मुलांना नव्या चित्रमय गोष्टी सांगायला जाणार आहे. त्याआधी तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. यापुढे तुला माझं गोष्टी सांगण्याचं आणि त्यातील चित्रं पाहण्याचं काम चालू ठेवावं लागेल. नाहीतर आपल्या आजवरच्या भेटीला काही अर्थच नाहीये. आजूबाजूच्या हजारो पुस्तकांतून तू आता उत्तमोत्तम पुस्तकं बरोबर ओळखू लागला असशील, अशी मला खात्री आहे. तशीच आणखी पुस्तकं तू निवड, वाच, करून पाहा आणि तो अनुभव मलाही कळवत जा. तुला माझी, या पुस्तकांची पुन्हा आठवण आली तर ‘लोकसत्ता’च्या ई-आवृत्तीच्या ‘बालमैफल’मध्ये तुला सर्व लेख पुन्हा वाचायला मिळतील. रंगीत चित्रं पाहायला मिळतील. ती तू मित्रांना पाठवू शकतोस. जमतील ती पुस्तकं विकत घेऊन मित्रांना पाहायला देऊ शकतोस. एखाद्या गोष्टीचं छोटू नाटक बसवू शकतोस. त्यातील चित्रांप्रमाणे वेशभूषा करवू शकतोस. ती वेशभूषा करवून पुस्तकाचं वाचन करणारे व्हिडीओ यूटय़ूबवर टाकलेस तर भलताच फेमस होशील, हा माझा कानमंत्र लक्षात ठेव बच्चा!

तुझ्या सोबतच्या मित्रांपेक्षाही घरातल्या छोटय़ा पालकांनाही चांगली पुस्तकं दाखवायचं काम आता तुझं आहे. ते बिचारे त्यांच्या काळातील लायब्ररीतल्या पुस्तकांत अडकले आहेत. चांदोबा, चंपक, चाचा चौधरीच्या पुढे येत नाहीयेत. फटक्यात बालपण संपल्यानं असं होत असावं. इंटरनेटवरल्या नव्या लायब्ररीची त्यांची फारशी ओळख नसेल तर त्यांचं बोट धरून त्यांना ती दाखव. ‘लहान मुलांची पुस्तकं आम्ही काय वाचायची?’ म्हणून ते दुर्लक्ष करतील, पण खरं सांगू, ती लहान मुलांची सर्व पुस्तकं खरं तर मोठय़ांसाठी जास्त उपयोगी आहेत. या जगातल्या खूपशा गोष्टी त्यांनी अजून पहिल्याच नाहीयेत. त्यांना समजल्यादेखील नाहीत. तुझ्याइतका नवा विचार, प्रेम, संवेदनशीलता त्यांच्यात हीच पुस्तकं रुजवणार आहेत. त्यांचं जग तुझ्याशिवाय सुंदर होऊच शकत नाही.

तू असं का नाही करत, आई किंवा बाबांकडून त्यांची गोष्ट घेऊन त्यावर तुझी चित्रं काढ. त्यांना वेळ नसेल तर आजी-आजोबांशी बोल. तुम्ही सगळे मिळून एक छोटं पुस्तक बनवा. तुझ्या कुटुंबाचं पाहिलं छोटं पुस्तक असेल. मज्जाच.

करशील ना हे माझं काम?

काही लागलं तर कळव. तुझ्या माहितीत नवं पुस्तक आलं तर तेही सांग. कुठल्याही ग्रहावर गेलो तरी माझा ई-मेल पत्ता हाच असणार आहे. तिथंच भेटूयात.

तुझ्यासकट सर्वाचा,

पोटलीबाबा

shriba29@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about picture story for children picture story books for kids zws