मैत्रेयी केळकर

‘‘मग, येशील ना तू आज? बरोबर सहा वाजता ये. चल बाय.’’ वैष्णवीने फोन ठेवला आणि ती स्कूल बॅगमधून पुस्तकं काढायला लागली. आई हे सगळं स्वयंपाकघरातून पाहत होती. आज काहीतरी वेगळाच रंग दिसत होता. नाहीतर एरवी शाळेतून आल्या आल्या वैष्णवीची बॅग सोफ्यावर. मग दहा वेळा ‘ती उचल, जागेवर ठेव’ म्हणून तिच्या मागे लागायला लागे. पण आज स्वारी कशात तरी अगदी गढून गेली होती.

‘‘वैशू, जेवायला चल बाळा. पानं घेतलीत.’’ आईने आवाज दिला तशी ती मुकाटय़ाने जेवायला आली. जेवताना देखील ती कुणाशी फार बोलली नाही. परत आपली पुस्तकं उघडून तिचं काम सुरू झालं होतं. आवराआवर करून आई बाहेर आली आणि तिनं उत्सुकतेनं तिच्या वहीत डोकावून पाहिलं. Importence of mangroves असं नाव देऊन ती भराभर त्या खाली एका पुस्तकातली माहिती उतरून काढत होती. हं, म्हणजे प्रोजेक्ट दिलाय तर शाळेत. म्हणून बाईसाहेब इतक्या बिझी होत्या तर. आईने ओळखलं.

‘‘वैशू, प्रोजेक्ट वाटतं- मॅनग्रुव्हवर.’’ -आई

‘‘हो गं, बघ ना! याच शुक्रवारी द्यायचाय आणि अजून काही इन्फम्रेशनच नाही मिळालेय. हे एक पुस्तक कसंबसं लायब्ररीमिसने दिलंय. उद्या परत करायचंय. इतर मुलांना हवंय म्हणे!’’ – वैष्णवी.

‘‘ओह, म्हणजे तर कठीणच आहे.’’आई म्हणाली.

‘‘हो ना गं. टीचरनी अगदी बजावून सांगितलंय इंटरनेटवरची माहिती तशीच्या तशी नको. काहीतरी इनोव्हेटिव करा. मी आज परीलाही बोलावलंय मदतीला, ती पण माझ्याच ग्रुप मध्ये आहे ना!’’

‘‘मी काही सुचवू का गं?’’

‘‘काय?’’

‘‘उद्या तसाही शनिवार आहे. तू चल माझ्याबरोबर, मी करते मदत तुला या कामात.’’ आई म्हणाली.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजता वैष्णवी आणि तिचं मित्रमंडळ आईबरोबर निघालं. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाताना जवळच डाव्या बाजूला गाडी वळली आणि एक छोटासा रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्ही कडेला मिठागरं होती. पांढरं शुभ्र मीठ सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होतं. वैष्णवी कुतूहलाने ते सगळं पाहत होती. सकाळच्या प्रसन्न वेळी केलेला तो प्रवास हवाहवासा वाटत होता. बरंच दूरवर गेल्यानंतर आईने गाडी थांबवली. आजूबाजूला दाट झाडी होती. अगदी हिरवीगार. पाण्यात निवांत पाय सोडून बसलेल्या खोडकर मुलांसारखं हिरवंगार तिवरांचं रान चहूकडे पसरलं होतं. वातावरण अगदी प्रसन्न होतं. सकाळचं कोवळं पिवळसर उन सगळीकडे दाटलं होतं. पक्ष्यांची गोड किलबिल ऐकू येत होती.

‘‘काकू, आपण कुठे आलो आहोत?’’ गाडीतून उतरता उतरता मधुरने हळूच विचारलं.

‘‘आपण आलोय कांदळवनात म्हणजे तिवरांच्या जंगलात. यालाच खारफुटीचं वन म्हणतात आणि  तुमच्या भाषेत सांगायचं तर हे आहे  mangrove forest.’’ वैष्णवीची आई म्हणाली.

‘‘जंगल, आणि हे?’’ परीने विचारलं. वैष्णवीच्या आईला अगदी अपेक्षित असलेलाच प्रश्न मुलं विचारत होती.

‘‘तुमच्या सगळ्या गटाला मॅनग्रोव्हज्वर प्रोजेक्ट करायचाय, हो ना? मग त्यासाठीच मी तुम्हाला इकडे घेऊन आले आहे. आपण समोर पाहतोय ते खाडीच्या दलदलीच्या प्रदेशात असलेलं तिवरांचं म्हणजे खारफुटीचं जंगल आहे.

खारफुटी म्हणजे अशा वनस्पती, ज्या पाण्यातल्या मिठाच्या जास्त प्रमाणाला सहन करू शकतात.’’ आई म्हणाली.

‘‘काकू, हे जंगल आहे असं तुम्ही म्हणता, पण इथे किती घाण आहे. पाणीसुद्धा किती काळं काळं आहे आणि जंगलासारखं इथे झाडाखालून फिरताही येत नाहीए.’’ परीने शेवटी तिला वाटतं ते सांगूनच टाकलं.

‘‘खरं आहे तुझं म्हणणं. हे नेहमीच्या जंगलासारखं मुळीच नाहीए, पण म्हणून या जंगलाला कमी लेखू नका हं. खारफुटी ही एक महत्त्वाची परीसंस्था (ecosystem) आहे.’’ आईने हळूच मधुरचा हात पकडत म्हटलं आणि ती सगळ्यांना घेऊन तिथल्याच एका सपाट जागेवर बसली.

‘‘काकू, पण इथली ही घाण, त्याचं काय?’’ अमोलने विचारलं.

‘‘सांगते सगळं सांगते. परी, मघापासून तू इथल्या कचऱ्याबद्दल विचारते आहेस तर जरा निरखून पाहा बरं, हा झाडांच्या मुळांमध्ये अडकलेला कचरा कोणता आहे तो. हे आहे मोठय़ा प्रमाणात वाहून आलेलं प्लास्टिक. हा कचरा मुळात शहरातून आलाय. भरतीच्या पाण्याबरोबर तो वहात आलाय आणि ओहोटीच्या वेळी तो इथे झाडांमध्ये अडकून पडलाय.’’ आईने समजावलं.

मुलांचे चेहरे विचारमग्न झाले. समोर खरंच झाडांच्या मुळांमध्ये अडकलेल्या असंख्य प्लास्टिकच्या पिशव्या फडफडत होत्या.

‘‘पण या झाडांची मुळं ही अशी काय आहेत- हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेसारखी- एकदम भीतीदायक.’’ यशने एका दमात विचारूनच टाकलं. वैष्णवीच्या आईला त्याच्या कल्पनेचं हसूच आलं.

‘‘हं आहेत खरी भीतीदायक.’’ आई म्हणाली.

‘‘पण एकदा त्यांचं महत्त्व कळलं की तुम्हाला ती तशी वाटणार नाहीत. त्याचं काय आहे, सर्वसामान्य झाडंझुडपं अशा दलदलीत आणि खाजणात वाढू शकत नाहीत. केंजळीतल्या या विशिष्ट वनस्पती मात्र इथे तग धरून राहतात. पाण्यातलं मिठाचं प्रमाण सहन करत टिकून राहतात. यातल्या काही झाडांना जमिनीत तिरकी घुसणारी मुळं असतात, तर काही झाडांच्या मुळांना दलदलीतून वर आलेले फाटे असतात; ज्यांच्यावर असंख्य छिदं्र असतात. दलदलीत वाढणाऱ्या मुळांना कमी पडणारा प्राणवायू या मुळांद्वारे मिळतो.

‘‘पण काकू, या झाडांना का जपायचं हे काही माझ्या अजूनही लक्षात आलं नाही.’’ अमेयने विचारलं.

‘‘हां, हा प्रश्न अगदी खरा आणि योग्य आहे बरं का अमू!’’ असं म्हणत आई पुढे सांगू लागली.

‘‘ही रानं आपल्याला इतकी महत्त्वाची का आहेत. तर एक म्हणजे, ही वातावरणातला कार्बन मोठय़ा प्रमाणावर शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात. दुसरं म्हणजे ही किनाऱ्याची धूप थांबवतात, माती धरून ठेवतात आणि वादळांचा जोर कमी करतात. या झाडांच्या मुळांच्या आधारानेच मासे अंडी घालतात. अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना अधिवास मिळतो. शिवाय महत्त्वाचं म्हणजे, इथे वाढणारे वृक्ष हे आपल्याला फळं, फुलं, लाकूड आणि औषधी पुरवतात.

‘‘इतके उपयोग?’’ अमेय म्हणाला.

‘‘मग आपण त्यांना का तोडतो?’’ जियाने कुतूहलाने विचारलं. आईला तिच्या निरागस प्रश्नाने हसूच आलं. तिचा हलकासा गालगुच्चा घेत आई म्हणाली, ‘‘अगं राणी, जे तुला कळतंय ते मोठय़ांना नाही कळत ना, म्हणून!’’

‘‘पण काकू, खरंच मलाही हेच विचारायचंय, ही जंगलं का तोडतात हो!’’ विराजने विचारलं.

पहिली गोष्ट म्हणजे, ही इतकी उपयुक्त जंगलं आहेत हेच फारसं कोणाला माहीत नसतं. आणि मुंबईत जागांचा किती मोठा प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा ही जंगलं तोडली जातात.’’ आईने समजावलं. मुलांचा आणि आईचा संवाद मस्त रंगला होता.

त्यांचं शंकासमाधान करण्यात आई गढून गेली होती, त्यामुळे सुहिताताई आलेली तिला कळलीच नाही. सुहिताताई याच विषयावर अभ्यास करत होती. तिला आलेलं पाहून आईने मुलांना तिच्या हाती सोपवलं. ताई सगळ्यांना मॅनग्रोव्ह रिसर्च सेंटरमध्ये घेऊन जाणार होती. झाडावरच अंकुरणारं खारफुटीचं फळ, मिसवाक टुथपेस्ट ज्या झाडापासून बनते ते झाडं, सागरगोटा, चिपीचं झाड अशी औषधी झाडं ताईला मुलांना दाखवायची होती. सगळेच मग उत्साहाने निघाले. भरपूर माहिती मिळाली, फोटो काढले गेले.

मग काय, दुसऱ्या दिवशी मुलांनी सादर केलेला प्रोजेक्ट एक नंबर झाला.

mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader