शुभांगी चेतन
shubhachetan@gmail.com
आपण राहतो त्या घरात, परिसरात साऱ्या ठिकाणी कलेचा वावर असतो. जसा पहिल्या मिनिटाला जगलेला क्षण पुढच्याच मिनिटाला इतिहास होतो. आपली जमीन, त्यावरचे उंच-सखल भाग, निसर्ग यांतला भूगोल, तापमानाचं अंश सेल्सियसमध्ये बदलत राहणं यातलं गणित, आकाशात उडणाऱ्या विमानातलं विज्ञान, हातात असणारे मोबाइल्स आणि हवं तेव्हा दुसऱ्याची देशातही बोलता येण्यातलं तंत्रज्ञान. याचा अर्थच आपले हे सगळे विषय आपल्या दैनंदिनीत (सामील) सहभागी असतात. प्रत्यक्ष शिकताना मात्र विविध विषयांमध्ये यांचं वर्गीकरण करून आपण शिकतो. त्यामुळे मी शाळेत असताना मला अनेकदा हा प्रश्न पडे की, या विषयांची आणि आपल्या रोजच्या दिवसाची सांगड कशी घालायची? जेव्हा पुढे मी ‘खरा अभ्यास’ करायला लागले तेव्हा हे प्रश्न सोडवता आले.
तर अशा या अनेक विषयांप्रमाणेच ‘कला’ ही आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे. मग ती केवळ चित्रकलाच असते असं नाही तर त्यात संगीत, नृत्य, वादन, गायन या साऱ्यांचाच समावेश आहे. एक गंमत सांगते, मी अनेकदा काम करायला (चित्र काढायला) बसते, तेव्हा त्या कोऱ्या कागदाकडे कितीही पाहिलं तरी चित्र काही सापडायला तयार होत नाही. मग मी ए. आर. रहमानचं ‘रॉकस्टार’मधलं एखादं गाणं ऐकते किंवा मग किशोरीताईंचं ‘अवघा रंग एक झाला’ ऐकते. खूपच छान वाटतं. त्या कोमेजलेल्या रोपावर पाणी शिंपडल्यावर त्याला कसं ताजं वाटत असेल, ते दिसतंही उत्साही, अगदी तसंच. ते सूर मनात रुंजी घालायला लागतात आणि माझं चित्रंही उमटायला लागतं. प्रत्येक कला ही अशीच दुसरीच्या हातात हात घालून गुंफलेली असते. नृत्याचंही तसंच. त्यांचा रंगमंच हा त्यांचा कागद, अवकाश आणि संगीताच्या, सुरांच्या साहाय्याने ते शारीरिक हालचालीतून त्यावर चित्रच रेखाटत असतात. तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडेल की, प्रत्येकालाच कुठे कळतं त्यातलं? मुळात ती सर्वप्रथम आवडली पाहिजे. रंग, नृत्य, गाणं, वाद्यं हे सारं आवडतंय ना, मग स्वत:ला छान वाटावं म्हणूनही काही गोष्टी करायच्या असतात. समजणं, कळणं हे त्यानंतर येतं.
या चित्रात जे दिसतंय ते कथ्थकली या शास्त्रीय नृत्यातला एक रचनेतला राक्षस आहे. नृत्य पाहिल्यावर हा राक्षस खूप आवडलेला, कारण त्याचा मेकअप फारच अप्रतिम होता. म्हणून मग एका मोठय़ा कागदावर रंग आणि कोलाज, ड्राय पेस्टल्स वापरून हा राक्षस आकाराला आला. कधीही ड्राय पेस्टल्स वापरताना, ते कागदावर घट्ट बसावेत म्हणून चित्र झाल्यावर त्यावर फिक्जेटिव्ह स्प्रेसारखं वापरायचं. त्यामुळे ते रंग कागदाला चिकटतात. तुम्हीही असे कार्यक्रम पाहत असाल- नृत्य – नाटक, तर हे अशी वेगवेगळी पात्रं त्यात असतात. एखादं तरी आपल्या कायम लक्षात राहतं. तुम्हाला ते तुमच्या सोबत राहावं असं वाटतं, तर ते कागदावर साकारण्यासाठी माध्यमं तुमच्याकडे असतात. अगदी वर्तमानपत्र चिकटवून, त्यातून कोलाज करून, पेन्स, रंगीत पेन्स असं नेहमी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनही तुम्ही हे करू शकता. तुमच्या या उपक्रमातूनच तुम्हाला नवीन मित्र सापडतील. सूर, नृत्य, शब्द, रंग, रेषा नव्याने भेटतील.