ऋषिकेश चव्हाण
मागील लेखामध्ये आपण माशांबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये आपण पृथ्वीवरील सर्वात मोठय़ा माशाविषयी- व्हेल शार्कविषयी- जाणून घेऊ या.
व्हेल शार्क बरेचसे व्हेल्ससारखे दिसत असले आणि त्यांच्या नावातही व्हेल असलं, तरीदेखील ते शार्कच आहेत; व्हेल अर्थात देवमाशांच्या गटातले नव्हेत. तुम्हाला आठवत असेलच, देवमासे हे तर सस्तन प्राणी आहेत, मासे नव्हेत. व्हेल शार्क मात्र मासे आहेत. वयस्क व्हेल शार्क तब्बल २० टन वजनाचे असू शकतात. हे वजन जवळजवळ चार पूर्ण वाढलेल्या हत्तींच्या वजनाएवढं आहे! हे ४० फूट लांब वाढतात. व्हेल शार्कने तोंड पूर्ण उघडल्यावर ते अवाढव्य पाच फुटांपर्यंत रुंद, अर्थात सर्वसामान्य माणसाच्या उंचीएवढं उघडलं जातं. किती मोठ्ठा आ वासतात हे मासे याची कल्पनाच केलेली बरी! या एवढय़ा मोठ्ठय़ा तोंडामध्ये ३०० दात असतात.
या एवढय़ा मोठय़ा आकाराचा, प्रचंड आ वासणारा आणि तोंडामध्ये शेकडय़ाने दात असणारा व्हेल शार्क मोठमोठे मासे, डॉल्फिन्स किंवा खूप मासे खात असणार. माझ्या वाचक मित्रांनो, असा विचार करत असाल तर तुम्ही साफ चुकलात बरं का! व्हेल शार्कस् खरं म्हणजे चिमुकल्या प्लवकांवर, सागरी शेवाळ्यावर आणि छोटय़ा माशांची शिकार करून आपलं पोट भरतात. आहे की नाही आश्चर्यकारक?
व्हेल शार्क इतर माशांप्रमाणे अंडी घालतात. मात्र इतर माशांविपरीत ही अंडी मादी आपल्या पोटातच उबवते आणि पोटातच त्यातून पिलं बाहेर येतात. बाहेरून पाहताना व्हेल शार्कची मादी थेट पिल्लांनाच जन्म देते असं वाटतं, हे आणि एक वैशिष्टय़पूर्ण आश्चर्य म्हणता येईल. तर व्हेल शार्कची मादी एका वेळी साधारण ३०० पिल्लांना जन्म देते. मात्र, यातली बरीचशी मोठी होतच नाहीत, त्याआधीच ती मरून जातात किंवा Bतर माशांची शिकार होतात.
व्हेल शार्क कोमट पाण्याचे प्रदेश पसंत करतात. त्यामुळेच जगभरात हे मासे उष्ण कटिबंधीय महासागरी प्रदेशांमध्ये आढळतात. भारतात गुजरात राज्यामधील कच्छच्या आखातात हे मासे हमखास पाहायला मिळतात.
अवाढव्य २० टन वजन, ४० फूट लांबी आणि पाच फूट रुंद उघडणारा जबडा.. व्हेल शार्क महाकाय असले तरी त्यांचं भक्ष्य मात्र चिमुकलं असतं.
rushikesh@wctindia.org