जगातल्या सगळ्या ताई, मामी, काकी, मावश्या, आया, बाया ज्या प्राण्याला बघून मोठय़ाने किंचाळूनच टाकतात तो दुसरा नंबरचा प्राणी म्हणजे उंदीर! दादा, बाबा, काका, मामा लोक मनातल्या मनात घाबरत असल्याने त्यांच्याबद्दल खरी माहिती हाती लागत नाही. पण कलेच्या जगात मात्र हाच प्राणी सर्वाना आवडून जातो. नुसता आवडून जात नाही तर त्यांना डोक्यावर घेतात.

याचेच सर्व जिवंत उंदरांना आश्चर्य वाटते. सर्व उंदीर म्हणजे उंदराचेही खूप प्रकार आहेत बरं! आपल्याला काळे उंदीर माहित्येत तसेच पांढरे उंदीरदेखील माहित्येत आणि रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगांत दिसणारी जाडजूड डेंजर डॉन अशी घूसपण माहित्येय. रॅट व माउसमध्ये काय फरक आहे तो गुगलदादाला विचारा! काळे उंदीर, ब्राउन उंदीर तसेच शहरी उंदीर व जंगली उंदीर असेही वेगळे गट आहेत. शहरी आहेत चपळ व जंगली आहेत आळशी. मला तर वाटते, अभ्यासकांनी मुंबईचे उंदीर व पुण्याचे उंदीर असेही संशोधन करून पाहावे.

तर या फोटोत दिसतायेत ते हिरो उंदीर! थ्रीडी अ‍ॅनिमेशनच्या  साहाय्याने बनवलेत.. अ‍ॅनिमेशन म्हणजे हलते चित्र! एकदम खरे. त्यातला एक काळा आहे तो मोठय़ा हॉटेलचा मुख्य आचारी (शेफ) आहे, तर दुसरा सफेद आहे तो आलिशान कुटुंबाचा भाग बनून गेलाय. अगदी रुबाबात जगतो. बघा, आणि आपण घरातल्या उंदरांना किती छळतो! या फेमस उंदरांना समजलं ना, तर ते तुमच्या घरावर मोर्चा काढतील. एक उंदीर- कोटी उंदीर! आणि दिवाळीच्या दिवसांत फराळ घरात असताना ही रिस्क कोण घेईल?

याशिवाय खूप श्रीमंत असे आणखी दोन हिरो आहेत. त्यांची प्रॉपर्टी चिक्कार मोठी आहे. कार्टूनमधला ‘जेरी’ खूप बदमाश, पण क्यूट आहे. तो ६० ते ७० वर्षे जुना आहे. ‘मिकी माउस’ तर त्याहून जास्त वयाचा आहे. आपण म्हातारे होऊ , पण तरीही ते म्हातारे होत नाहीत, यातच खरी गंमत आहे. पुढील लेखात इतर चित्रांतील उंदीर पाहू.

– श्रीनिवास आगवणे

shreeniwas@chitrapatang.in