स्वाती केतकर-पंडित
मुलांना गोष्टी सांगणे हे बऱ्याच पालकांसाठी कठीण काम असते, कारण मुलांच्या गोष्टींत जरी कल्पनेच्या भराऱ्या असल्या तरी त्या घेताना त्यातही एक सुसंगती लागते. शिवाय या गोष्टी मुलांना आवडणाऱ्याही हव्यात. जाणत्या पालकांच्या आणखी अपेक्षा असतात; त्या म्हणजे या गोष्टीतून मुलांना काहीतरी संदेश मिळायला हवा. असा संदेश जरी थेट दिलेला नसला तरी मुलांच्या भावविश्वात त्या गोष्टीने काहीतरी भर टाकायला हवी. या साऱ्या कसोटीवर उतरेल अशी गोष्टी सांगणे म्हणूनच खूप कठीण.
मुलांच्या कल्पनाविश्वामध्ये अनेक भन्नाट गोष्टी घडत असतात. त्यांना पडणारे प्रश्नही एकदम आगळेवेगळे असतात. अनेकदा पालक, ‘काहीतरीच काय विचारतात ही मुले?’ असे म्हणत मुलांच्या मनातले हे प्रश्न झिडकारून लावतात. परंतु या प्रश्नांतूनच मुलांचे भोवतालाबद्दलचे आकलन पक्के होत असते. उदा. नारळाच्या झाडाला सगळे नारळच का येतात? डोंगर कु ठे येत-जात नाहीत का? पक्ष्यांसारखे पंख माणसांनाही मिळाले तर..? आणि मुलांचा सगळ्यात लाडका विषय म्हणजे बाहेर खातो ती पाणीपुरी आणि भेळपुरी रोजच्या रोज घरी खायला मिळाली तर? सगळी मोठी माणसं छोटी झाली तर..? या सगळ्या प्रश्नांना पुस्तकात शब्दबद्ध केलं आहे राजीव तांबे यांनी आणि चित्रकार श्रीनिवास बाळकृष्णन यांनी! ‘किती मज्जा येईल’, ‘असं झालं असं’, ‘असं का’ या पुस्तकमालेत मुलांच्या मनातले अगणित प्रश्न आणि त्यांची गमतीदार चित्रं दडलेली आहेत. माशालाही पंख, पक्ष्यांनाही पंख- मग ते दोघे उडत का नाहीत? आठ पाय असूनही खेकडा वाकडा का चालतो? एखाद्या चिमुरडीला आपण सहज ‘काय हो चिऊताई’ म्हणतो.. पण एखादी मुलगी खरोखरच चिमणी झाली तर? मग या पंखवाल्या चिऊच्या डोक्यावर वेणी असेल का? एखाद्याची मान लांब असेल तर आपण सहज म्हणतो, ‘अगदी जिराफासारखी लांब मान आहे.’ पण खरोखरच एखाद्या मुलाची मान जिराफासारखी लांबच लांब झाली तर काय मज्जा होईल? अशा सगळ्या कल्पनांच्या भराऱ्या आणि त्याला जोडून तितकीच समर्पक चित्रं या पुस्तकांत आहेत. पुस्तकांत शब्दांबरोबरच चित्रंही महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांच्या भावविश्वाचा अचूक ठाव घेतील अशी ही मोहक चित्रं आहेत. बाळकृष्णन् हे लहानग्यांचे भावविश्व नेमकेपणी टिपणारे चित्रकार आहेत याचा प्रत्यय पुस्तकातील चित्रांमधून येतो. चित्रांमुळे ही पुस्तकं अधिक देखणी आणि समर्पक झाली आहेत. लेखकाच्या शब्दांना उत्तम चित्रांची साथ हा या पुस्तकांचा विशेष म्हणावा लागेल.
याच पुस्तकमालेतील आणखी पुस्तके म्हणजे ‘वारा’, ‘प्रकाशच प्रकाश’, ‘पाऊस’, ‘नदी’ आणि ‘रंगीत जादू’! पाऊस मुलांच्या आवडीचा. नदीचे झुळझुळणारे पाणीही मुलांना आवडते. वारा आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी म्हणजे निसर्गाची जादूच. या सगळ्याबद्दल नेटक्या शब्दांत या पुस्तकांतून माहिती दिलेली आहे. जोडीला या सर्वाचा प्रत्यक्ष अनुभव देणारी- जणू काही पानापानांतून वारा वाहतोय, पाणी झुळझुळते आहे आणि प्रकाश पसरला आहे असा अनुभव देणारी चित्रे आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकांतून कुठेही मुलांना या गोष्टींबद्दल शिकवण्याचा आव आणलेला नाही; तर वारा, प्रकाश, पाणी या तत्त्वांबद्दल मुले जे सहज अनुभव घेतात तेच पुस्तकांत शब्दबद्ध व चित्रबद्ध के लेले आहे. जंगल आणि त्यातील प्राणी हे मुलांचे मित्रच. लहानपणापासूनच्या गोष्टींत भेटणाऱ्या या प्राण्यांनाही आपल्यासारखेच आइस्क्रीम, सीताफळ हवेसे वाटले तर..? एखाद्या प्राण्याला त्याचा नेहमीचा रंग सोडून वेगळा रंग हवासा वाटला तर..? तर जी काही गंमत येईल, ती ‘रंगीत जादू’ या पुस्तकात वाचायला आणि पाहायला मिळते.
याच मालिके त ‘साराचे मित्र’ आणि ‘अय्या, खरंच की..’ ही आणखी दोन पुस्तके आहेत. सारा आणि तिचे दोस्त पशुपक्षी यांच्या गमतीजमती या पुस्तकांतून वाचायला मिळतात. या पुस्तकांसाठी गिरीश सहस्रबुद्धे यांनी चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांतली गोबऱ्या गालांची, कु रळ्या के सांची सारा लहानग्यांना अगदी आपल्यातलीच एक वाटेल अशी आहे. तिचा दोस्तसमुदायही मोठा गोंडस आहे.
‘किती मज्जा येईल’, ‘असं झालं असं’, असं का’, ‘वारा’, ‘प्रकाशच प्रकाश’, ‘पाऊस’, ‘नदी’, ‘रंगीत जादू’,‘साराचे मित्र’, ‘अय्या खरंच की..’ लेखक- राजीव तांबे, चित्रे- श्रीनिवास बाळकृष्णन् आणि गिरीश सहस्रबुद्धे,
विवेक प्रकाशन, पृष्ठे- प्रत्येकी १६, किंमत- प्रत्येकी ५० रुपये.