मस्तीखोर बिंबोला सतत कुणीतरी बरोबर खेळायला हवं असायचं. बॉबला (घरच्या म्हाताऱ्या कुत्र्याला) त्याची सततची मस्ती नकोशी वाटायची. कोझीला (घरातल्या दुसऱ्या मोठय़ा मांजरीला) कधी कधी चालायचं, पण तिला जरा ज्यादा वाटलं तर ती बिंबोला डावलीचा चांगला एक फटका द्यायची. ते अर्थातच बिबोला चालायचं नाही. सुधी नि मधी (त्याच्या छोटय़ा मालकिणी) शाळेत गेल्यावर तर त्याला फारच कंटाळा यायचा.

‘कुणी खेळायला मिळालं तर किती बरं होईल. माझ्यासारखंच कुणीतरी बावळट- ज्याला माझ्यासारखंच शेपटीचा पाठलाग करणं, पलंगाखाली लपून बसणं, इकडे तिकडे उगाचच उडय़ा मारणं, स्वत:च्या डावल्यांशी खेळणं.. असे खेळ आवडतील.’ बिंबो स्वत:शीच विचार करत बसायचा. आणि एके दिवशी बिंबोला एक सवंगडी मिळाली. बिंबो आला होता त्यापेक्षा बऱ्याच मोठय़ा टोपल्यातनं ती आली. रेल्वे स्टेशनातनं तिला गाडीनं आणण्यात आलं. टोपली जेव्हा मुलींच्या खोलीत आली तेव्हा त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.

‘यात एक छान कुणीतरी आहे.’ आई टोपल्याचा पट्टा सोडता सोडता म्हणाली.

‘कोण आहे आई? सांग ना. आमच्यासाठी आहे?’ सुधीला धीर धरवत नव्हता.

‘अगदी तुमच्यासाठीच. तुमच्या मालकीचं नि तुमच्याबरोबर तुमच्या खोलीत राहणारं. ही आहे ‘टॉप्सी’ नावाची छोटुकली कुत्री!’

आईनं टोपल्याचं झाकण तर काढलं, पण कुणीच उडी मारून बाहेर आलं नाही. आई नि मुली टोपलीत डोकावल्या. त्यात सुंदरसं काळभोर डोकं नि शेपटी असलेलं फॉक्स टेरियर जातीचं एक पिटुकलं पांढरंशुभ्र कुत्र्याचं पिल्लू गवताच्या मऊ गादीवर बसलं होतं. तिनं लुकलुकत्या चॉकलेटी डोळ्यांनी तिघींकडे पाहिलं. बिचारी घाबरली होती.

सुधी हळुवारपणे म्हणाली, ‘ये गं टॉप्सी, घाबरू नको. तू एका चांगल्या घरी आली आहेस. आम्ही तुला खूप प्रेमानं सांभाळू. मार बघू उडी बाहेर. आम्हाला बघू तरी दे तुला!’

टॉप्सी उभी राहिली. ती एक पाच महिन्यांची भलतीच गोड पिल्लू होती. तिनं थोडी थोडी शेपटी हलवली- आपल्यालाही सगळ्यांशी मत्री करायची आहे असं जणू सांगायला.

मधी म्हणाली, ‘बिच्चारी किती घाबरलीय. आम्हाला समजतंय गं आईपासून नि तुझ्या घरापासून तुला दूर पाठवल्यामुळे तू गोंधळलीयस. तुला हे फार चमत्कारिक वाटतंय. काळजी करू नको. तुला आमची ओळख नि सवय लवकरच होईल.’

सुधीनं तिला त्या टोपल्यातनं बाहेर काढलं. मधीनं तिच्यासाठी दूध नि बिस्किटं एका ताटलीत घालून आणली. त्याचा वास आल्याबरोबर टॉप्सी तिकडे धावली नि भराभर खाऊ लागली. मग तिनं सुधीच्या मांडीवर चढायचा प्रयत्न केला. सुधीनं तिला उचलून मांडीवर घेतल्यावर तिनं सुधीचे हात चाटले.

‘माझ्या मांडीवर तिला दे नं,’ म्हणत मधीनंही तिला मांडीवर घेऊन तिचे लाड केले. मधीला खेळणी आणि छोटे प्राणी खूपच आवडायचे. टॉप्सीला हळूहळू कळायला लागलं की तिला खरंच एक छान नवीन घर मिळालंय.

तेवढय़ात मुलींच्या खोलीत काय गडबड चालली आहे ते पाहायला बिंबो तिथे धावत आला. टॉप्सीला बघताच स्वारी ब्रेक लावल्यासारखी थांबली. ‘बॉब असा छोटासा कसा दिसतोय?’ पण त्याला वेगळा वास आला- ‘एक नवीन छोटा कुत्रा दिसतोय.’ तो मनाशीच पुटपुटला.

टॉप्सीही मधीच्या मांडीवरनं उतरून बिंबोच्या नाकाला नाक लावायला आली. बिंबोनं घाबरून ‘फिस्स्’ केलं- ‘हा कुत्रा अचानक पाठलाग करायला लागला तर?’

टॉप्सीनं घाबरत घाबरत आपली शेपटी जरा हलवली. बॉबनं बिंबोला शिकवलं होतं की कुत्रा आपली मत्री दाखवण्यासाठी शेपटीचा उपयोग करतो. बिंबोनं जेव्हा टॉप्सीची हलणारी शेपटी पाहिली तेव्हा त्यानं ‘फिस्स् फिस्स्’ करायचं बंद केलं नि बिस्किटं व दुधाचा वास येणारं टॉप्सीचं तोंड हुंगलं.

टॉप्सीनं खुशीत आणखी जोरात शेपटी हलवली- स्प्रिंग लावल्यासारखी इकडून तिकडे, तिकडून इकडे. थोडं थोडं भुंकत मग तिनं बिंबोभोवती धावणं सुरू केलं- ‘चल, खेळ माझ्याशी.’

‘अगदी बरोबर!’ असं म्हणत बिंबो खुर्चीच्या पायामागे सरपटत गेला, टॉप्सी जवळ आली की तिच्यावर उडी मारायला- ‘पकडून दाखव बघू मला!’ याच आवेशात.

नि मग खुच्र्याच्या खालून वर, वरून खाली, पियानोच्या भवतीनं, बाहुल्यांच्या घरावरनं नि टेबलाच्या खालनं, त्या दोघांची खोलीभर अशी काय धावाधावी चालू झाली की विचारू नका.

सुधी आनंदानं ओरडली, ‘बघा, बघा, दोघांची मत्रीपण झाली. काय मजेशीर आहेत दोघं!’

बिंबो खेळण्याच्या कपाटात घुसला नि टॉप्सीला काही समजेना. मग तिनं आपल्या तीक्ष्ण नाकाचा उपयोग केला आणि तीपण घुसली कपाटात. आणि मग कपाटात सगळा गदारोळ  माजला. टेडी बेअर ढपकन् बाहेर फेकला गेला. चावीचा उंदीर बाहेर उडाला नि त्याची चावी पडली लांब-टिंग टिंग टिंग करत. डझनभर लाकडाचे गोल दांडके टिंग टिंग टांग टिंग करत बाहेर पडले.

सुधी ओरडली, ‘अरे, अरे, काय चालंवलंय काय? गाढवांनो, बाहेर या बघू आधी! सगळं खेळण्याचं कपाट उसकटून नाही टाकायचं. अजून त्याची साफसफाई करायची वेळ आलेली नाही.’

दोन्ही प्राणी उडी मारून बाहेर आले. टॉप्सीनं फुलारून आपलं अंग झटकलं नि आपली गुलाबी जीभ बाहेर काढून धापा टाकत ती खाली बसली. बिंबोनंही तिच्या बाजूला बसून चाटून चाटून आपली अंग सफाई चालू केली.

टॉप्सीनं त्याला विचारलं, ‘तुझं अंग काय गोड लागतं का? चाटत काय बसलायस?’

‘हीहीही, हाहाहा, काय पण विनोद!’ बिंबोनं आपली साफसफाई चालूच ठेवली. ‘टॉप्सी, मला तू खूप आवडलीस. माझी खात्री आहे तुला माझ्याशी खेळायला म्हणूनच आणण्यात आलंय. आपण एकमेकांचे छान मित्र होऊ; हो ना?’

‘वुफ् वुफ्, हो तर!’ म्हणत टॉप्सीनं एवढय़ा जोरजोरात शेपटी हलवली की तिला दोन दोन शेपटय़ा आहेत की काय असं वाटायला लागलं!

मूळ इंग्रजी लेखक : एनिड ब्ल्यायटन

अनुवाद : चारुता मालशे

cmalshe@yahoo.com