युनेस्कोनं प्रकाशित केलेलं ‘व्हॉट्स मेक्स अस ह्युमन’ हे व्हिक्टर डी. ओ. सँटोस यांनी लिहिलेलं आणि त्याला आना फोरलाती यांची समर्पक चित्रं असलेलं पुस्तक खूप गाजलं. याच पुस्तकाचा मिलिंद परांजपे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘आपल्याला माणूसपण कोणी दिलं’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाच्या संकल्पनेपासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं. आजमितीस जगात ७१६४ भाषा अस्तित्वात आहेत; परंतु या शतकाच्या अखेरपर्यंत जगातील अर्ध्याअधिक भाषा नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. मौखिक, लिखित आणि खुणांची अशी तीन प्रकारांत भाषा अस्तित्वात आहे. भाषा नष्ट होते म्हणजे नेमकं काय होतं? भाषा नष्ट होते तेव्हा एक संस्कृतीही लोप पावते हे सत्य आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा संस्कृती लोप पावते तेव्हा त्या संस्कृतीमधील जीवनपद्धती, मूल्ये, खाद्यासंस्कृती, माणूस म्हणून आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या अनेक गोष्टी लोप पावतात. भारतात अनेक भाषा, बोली भाषा लोप पावत चालल्या आहेत. त्या जगविण्यासाठी अनेक लोक प्रयत्नही करत आहेत, परंतु अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत. किंवा अनेकांना भाषा मेल्याने आपण किंवा आपली पुढची पिढी काय गमावेल याची जाणीवही नसते. हे पुस्तक नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते. लहानपणापासून मुलांना भाषेची गरज, तिचं महत्त्व पटवून देणं हेच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. आणि जेव्हा व्हिक्टर डी. ओ. सँटोस भाषेविषयी सांगतात त्याला अधिक महत्त्व आहे. कारण ते बालसाहित्यिक आहेतच, पण भाषाशास्त्र या विषयात पीएच.डी. आहेत. या पुस्तकाचे चित्रकार आना फोरलाती हे इटालियन चित्रकार आहेत. भाषा हा त्यांचा प्रेमाचा विषय… अशी भाषेविषयी आत्मीयता असलेली माणसं या पुस्तकाचे कर्ते आहेत, त्यामुळे या पुस्तकाला आणि भाषा जगविण्याच्या प्रयत्नांना अधिक महत्त्व प्राप्त होतं. आपली भाषा टिकविण्याचा संस्कार लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजायला हवा हा या पुस्तकाचा मूळ उद्देश. भाषेच्या अस्तित्वाविषयीची सुंदर आणि सोप्या भाषेत मांडणी हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.
‘मी सगळीकडे आहे. प्रत्येक देशात, प्रत्येक शहरात, प्रत्येक शाळेत, अगदी प्रत्येक घरातसुद्धा.’ किंवा ‘मला माऊच्या पिल्लागत मऊ होता येतं किंवा हाडं गोठवणाऱ्या थंडीसारखं बोचरंही’, ‘माझी नाळ संस्कृतीशी जोडली गेली आहे.’ अशा छोट्या छोट्या वाक्यांतून भाषा आपली समृद्धी, महत्त्व, व्यथा सांगत जाते.
या छोटेखानी पुस्तकातून सहजपणे भाषा, भाषेचं महत्त्व, तिच्या अस्तित्वाविषयी, तिच्यावरचं प्रेम लेखक मांडतो आणि त्याला मिळाली आहे उत्तम चित्रांची जोड… बोली भाषांचं अस्तित्व धोक्यात येत असताना हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरतं. भाषेविषयी आत्मीयता असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांही हे पुस्तक खूप काही सांगून जातं. हे पुस्तक युनेस्कोचा प्रकल्प आहे आणि मूळ इंग्रजी पुस्तक मराठीत आणलं आहे ज्योत्स्ना प्रकाशनाने. पुस्तकाची मांडणी नेहमीप्रमाणे उत्तम आहे.
‘आपल्याला माणूसपण कोणी दिलं’, – व्हिक्टर डी. ओ. सँटोस, चित्रं – आना फोरलाती, ज्योत्स्ना प्रकाशन, युनेस्को, पाने – ४१, किंमत – १२५ रुपये.
हेही वाचा…बालमैफल : मराठमोळा वाढदिवस
अन्वय आणि फुलपाखरांची गंमत
राजीव तांबे यांचं ‘पुस्तक वाचणारं फुलपाखरू’ हे पुस्तक म्हणजे गोष्टीतला अन्वय आणि फुलपाखरू यांची मस्त धमाल मस्ती आहे. निरागस अन्वय आणि फुलपाखरू यांच्यातील निखळ बालसुलभ संवाद, मस्ती वाचावी अशीच आहे. या गोष्टीतलं फुलपाखरू अन्वयसोबत शाळेत जातं. अन्वय फुलपाखराचे पंख घेतो तर फुलपाखरू अन्वयचे पाय… आणि हे दोघं जी धमाल करतात ते प्रत्यक्ष गोष्ट वाचताना मुलांना अनुभवता येईल.
या पुस्तकातील मुलांना आवडेल अशी एक गोष्ट म्हणजे यातील गोष्टीला अनुरूप अशी सुंदर चित्रं. शुभांगी चेतन यांची उत्तम चित्रं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. शब्दांतून उलगडत जाणारी गोष्ट चित्रातून हुबेहूब चित्रित केली आहे, त्यामुळे हे पुस्तक पाहणंदेखील एक सुखद अनुभव आहे.
‘पुस्तक वाचणारं फुलपाखरू’, – राजीव तांबे, चित्रं – शुभांगी चेतन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने – ९४, किंमत – २९५
हेही वाचा…बालमैफल : नावात काय आहे
निसर्गप्रेमी मुलांची गोष्ट
मुलं जास्तीत जास्त मोबाइलमध्ये रमण्याच्या काळात निसर्गावर प्रेम करणाऱ्या, निसर्ग राखण्यासाठी झटणाऱ्या मुलांची गोष्ट म्हणजे ‘अजब खजिना निसर्गाचा’ ही सलीम सरदार मुल्ला यांची बालकादंबरी. ही बालकादंबरी म्हणजे गुड्डू आणि तिच्या मित्र-मैत्रिणींची गोष्ट. या मुलांना झाडं, फुलं, पानं, पक्षी, प्राणी असा सभोवतालचा सगळा निसर्ग खूप आवडतो. ती निसर्गात रमतात, पण अभ्यास-सहलीलाही जातात. जखमी प्राण्यांची देखभाल करतात. ‘फुलपाखरू मंडळ’ स्थापन करून माहिती गोळा करतात… आणि हो, गावातल्या तळ्यातले मासे वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढाही देतात. या कादंबरीतल्या भाषेत, लिखाणात वेगळा गोडवा आहे. निसर्गातील घटना सुंदर भाषेत मांडताना लेखकाच्या भाषेचं सौंदर्य वारंवार जाणवतं, परिणामी कादंबरी वाचताना ही भाषा वाचकाच्या मनाची पकड घेते आणि सुंदर वाचनानुभव गाठीशी येतो. ही बालकादंबरी म्हणजे वाचनाचा सुखद अनुभव आहे. निसर्ग जपणाऱ्या निरागस, चौकस आणि साहसी मुलांची ही कादंबरी वाचताना बालमनावर वेगळ्या भाषेचा संस्कार होत जातो, आणि तो फार महत्त्वाचा आहे याची जाणीव होत जाते. मुलांना आवर्जून वाचायला द्यावी अशी ही कादंबरी आहे.
‘अजब खजिना निसर्गाचा’, – सलीम सरदार मुल्ला, रोहन प्रकाशन, पाने- १०३, किंमत- १५० रुपये.
लहानग्यांसाठी चौकस गोष्टी
‘‘हाय! मी रंगा, तुझा पेनफ्रेंड.’’ अचानक पेनातून आवाज आला. दीपूच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्याने ते पेन झटकल्यागत टेबलावर फेकलं आणि तो मागे सरकला… ‘या पेनामध्ये अल्लाउद्दीनच्या जिन वगैरेसारखा तर कुणी नसेल ना?…’ या मजेशीर गोष्टींचा खजिना म्हणजे ‘पेनफ्रेंड’ हे खास मुलांसाठीचं गोष्टंचं पुस्तक. या गोष्टीबरोबरच क्रिकेटमधून रोहनला शिकवणारं ‘टीम-स्पिरिट’, एलीला मायेची ऊब देणारी ‘आजीची दुलई’, शिक्षकांची नक्कल करणाऱ्या शंतनूला ‘नवी दिशा’ दाखविणारे शिक्षक, रियाला जिंकण्या-हरण्यापलीकडे स्पर्धेत उभं राहण्याची उमेद देणारी आरोहीची ‘जिद्द’, घरातल्या साऱ्यांना जीव लावणाऱ्या आज्ञाधारक जर्मन शेफर्ड ‘अमिगोची स्पेस’, एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला समजता कामा नये, असे ‘देणाऱ्याचे हात’, डू-इट-युवरसेल्फ हा आत्मविश्वास शार्वीला मिळवून देताना घेतलेला ‘शोध स्वत:चा’ आदी नऊ गोष्टींचा संग्रह म्हणजे ‘पेनफ्रेंड’. सहज-सोपी प्रवाही-संवादी भाषा, किशोरवयीन जीवनात येणाऱ्या विविध घटनांतून- अगदी फॅण्टसीतूनही- जाताजाता चौरस शिकवण देणाऱ्या या साऱ्या गोष्टी मराठी आणि इंग्रजीतून उपलब्ध झाले आहे.
‘पेनफ्रेंड’, प्राची मोकाशी, ज्योत्स्ना प्रकाशन, पाने- ४८, किंमत-१०० रुपये.
हेही वाचा…बालमैफल : जलसाक्षरता
बालसुलभ कविता
डॉ. सुरेश सावंत यांचा ‘एलियन आला स्वप्नात’ हा बालकवितासंग्रह म्हणजे बालसुलभ मनाला भावतील अशा कविता आहेत. या कवितांमध्ये पेंग्विन, जिराफ, एकशिंगी गेंडा, देवमासा, काटेरी साळिंदर असे अनेक प्राणी आणि त्यांच्याविषयीच्या गमतीदार गोष्टी या कवितांमधून कळतात. तसेच या कवितेत स्वप्नात येणारा एलियन, त्याचं मजेशीर दिसणं, आजी, तिची देवपूजा, लाडका लाडोबा आपल्याला भेटतात. कवितेतीत छान छान चित्रांमुळे हे पुस्तक वाचण्यास अधिकच गंमत वाटते. लहानग्यांना आवडतील आणि त्यात ते रमतील अशा या कविता आहेत.
‘एलियन आला स्वप्नात’, – डॉ. सुरेश सावंत, चेतन बुक्स, पाने – ५६, किंमत- ३६० रुपये