युनेस्कोनं प्रकाशित केलेलं ‘व्हॉट्स मेक्स अस ह्युमन’ हे व्हिक्टर डी. ओ. सँटोस यांनी लिहिलेलं आणि त्याला आना फोरलाती यांची समर्पक चित्रं असलेलं पुस्तक खूप गाजलं. याच पुस्तकाचा मिलिंद परांजपे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘आपल्याला माणूसपण कोणी दिलं’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाच्या संकल्पनेपासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं. आजमितीस जगात ७१६४ भाषा अस्तित्वात आहेत; परंतु या शतकाच्या अखेरपर्यंत जगातील अर्ध्याअधिक भाषा नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. मौखिक, लिखित आणि खुणांची अशी तीन प्रकारांत भाषा अस्तित्वात आहे. भाषा नष्ट होते म्हणजे नेमकं काय होतं? भाषा नष्ट होते तेव्हा एक संस्कृतीही लोप पावते हे सत्य आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा संस्कृती लोप पावते तेव्हा त्या संस्कृतीमधील जीवनपद्धती, मूल्ये, खाद्यासंस्कृती, माणूस म्हणून आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या अनेक गोष्टी लोप पावतात. भारतात अनेक भाषा, बोली भाषा लोप पावत चालल्या आहेत. त्या जगविण्यासाठी अनेक लोक प्रयत्नही करत आहेत, परंतु अनेक जण याबाबत अनभिज्ञ आहेत. किंवा अनेकांना भाषा मेल्याने आपण किंवा आपली पुढची पिढी काय गमावेल याची जाणीवही नसते. हे पुस्तक नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते. लहानपणापासून मुलांना भाषेची गरज, तिचं महत्त्व पटवून देणं हेच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. आणि जेव्हा व्हिक्टर डी. ओ. सँटोस भाषेविषयी सांगतात त्याला अधिक महत्त्व आहे. कारण ते बालसाहित्यिक आहेतच, पण भाषाशास्त्र या विषयात पीएच.डी. आहेत. या पुस्तकाचे चित्रकार आना फोरलाती हे इटालियन चित्रकार आहेत. भाषा हा त्यांचा प्रेमाचा विषय… अशी भाषेविषयी आत्मीयता असलेली माणसं या पुस्तकाचे कर्ते आहेत, त्यामुळे या पुस्तकाला आणि भाषा जगविण्याच्या प्रयत्नांना अधिक महत्त्व प्राप्त होतं. आपली भाषा टिकविण्याचा संस्कार लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजायला हवा हा या पुस्तकाचा मूळ उद्देश. भाषेच्या अस्तित्वाविषयीची सुंदर आणि सोप्या भाषेत मांडणी हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा