फारूक एस. काझी
हॉलच्या दारासमोर लावलेला बोर्ड निरखून पाहत उबेद एका कोपऱ्यात उभा होता. मोठय़ा लोकांची होणारी ये-जा पाहत पाहत तो समोरचा बोर्डही पाहत होता. बोर्डवर काही चित्रं व त्यात इंग्रजीत काहीतरी लिहिलेलं दिसत होतं. त्याला चित्रं आवडली होती, पण काय लिहिलंय हे कळलं नाही. त्याने एबीसीडीतली सुटी सुटी अक्षरं वाचायला सुरुवात केली.
P…a…i…n..t…i…n…g
E…x…h…i…b..i…t…i…o…n
A…n…w…a…r
H…u…s…a…i…n
पण ते नेमकं काय, हे त्याला कळेना. बोर्डवर काही चित्रं दिसताहेत म्हणजे आत चित्रं असणार की अजून काही? काही खेळ असेल का? आतून कसलाच आवाज येत नव्हता. त्याला प्रश्न पडला. शांत बसून कोणता खेळ खेळतात? एवढं शांत बसून खेळ खेळता येतो? संगीत ऐकू येतंय. हळू आवाजातलं. डॉल्बी का नाही लावला? हमारे गाव में तो सबीच लगाते डॉल्बी.
मला आत जाऊन बघायला हवं. उबेद आत जायला निघाला. त्याला जत्रेतला तंबूतला खेळ आठवला. खूप मज्जा येते तो खेळ पाहताना.
‘मौत का कुआं’, ‘पन्नालाल गाढव’, ‘जादूगार भैरव’.. असलं बरंच काही त्यानं पाहिलं होतं. तसलंच काही त्याच्या मनात आलं.
तो गर्दीबरोबर आत जायला लागला. कुणीतरी त्याला धक्का मारला, त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. आसपासचे काही लोक थांबले आणि त्यांनी ‘‘अले, पललास काय ले बाला? उठ. उठ. लागलं नाही ना तुला?’’ कुणीतरी असं बोलून त्याला उठायला मदत म्हणून हात समोर केला. उबेदला खरं तर खूप राग आला होता. त्याच्याशी असं बोबडं बोललेलं त्याला अजिबात आवडत नव्हतं. मोठे लोक असं लहानांसारखं का वागतात बरं? बोबडं काय बोलतात. लाडाने काय बोलतात. मला स्पष्ट बोलता येतं. मी बोबडं बोलत नाही. हे यांना कळत कसं नाही?
उबेदने कोणाची मदत घेतली नाही. तो उठला. कपडे झटकले. कुठं घाण लागलेली नाही ना, हे उजवीकडे एकदा वळून पाहिलं. मग डावीकडे वळून पाहिलं. घाण नव्हती. तो गर्दीबरोबर पुढं पुढं जात होता. ‘हा खेळ खूपच भारी दिसतोय. कित्ती लोक आलेत इथं?’ तो मनातल्या मनात गर्दी पाहून अंदाज बांधत होता. तो थोडा पुढं आला.
आता त्याला वेगळीच काळजी लागली होती.
‘‘धत्त तेरी.. मेरे पास पसे कहां है?’’
उबेद अडखळला. थांबला. खिसा तपासला. गर्दीतून थोडं बाजूला व्हायचा प्रयत्न करू लागला. जोर लावला. नाही जमलं. परत जोर लावला. नाही जमलं.
‘‘आय्यो..!!’’ असं तो जोरात ओरडला. आसपासचे लोक थांबले.
कुणाला काय झालंय हे पाहू लागले. सगळ्यांची नजर उबेदवर खिळली. उबेदला अवघडल्यासारखं झालं. आपण ओरडून चूक केली काय, असं वाटून गेलं. गर्दी आपल्याकडे बघतेय हे कळताच तो जास्तच लाजून गेला. तिथंच उभ्या असलेल्या गार्डने त्याला बाजूला बोलावलं. उबेदला धीर आला. हुश्श करत तो गार्डकडे सरकला. गर्दीने त्याला वाट दिली.
‘‘छोटे नवाब, कुठे निघालाय एकेकटे? का ओरडला तू?’’
छोटे नवाब हा शब्द ऐकून त्याला हसूच आलं. आज बाहेर जायचं म्हणून अम्मीने शेरवानी घातली होती. हसू दाबत तो म्हणाला, ‘‘किसी ने मेरे पर पर पर दिया.’’
‘‘असं काय? तुझे मम्मी-पप्पा कुठं आहेत? तुला एकटय़ाला सोडून कुठं गेले?’’
उबेदने क्षणाचाही उशीर न करता थाप ठोकली..
‘‘अम्मी-अब्बू आत गेलेत. मलाही जायचंय. जाऊ द्या.’’ उबेदचं लाडात येऊन बोलणं गार्डला आवडलं. त्याने उबेदचा गालगुच्चा घेतला. उबेदला हे आवडलं.
उबेद पुन्हा गर्दीत घुसला. भीती दूर झालेली. त्यामुळे तो अगदी घाईघाईत पुढे निघाला. ढकलाढकली करत. तो आत घुसला तेव्हा खूप शांत वाटलं. कसलासा सुगंध सगळीकडे पसरलेला होता. िभतींवर खूप सुंदर सुंदर चित्रं लावलेली होती. लोक रांगेत चित्रं पाहत होती. पुढे जात होती. उबेदने जेव्हा चित्रांकडे पाहिलं तेव्हा त्याला थोडं नवल वाटलं. ‘एवढी मोठी चित्रं? एवढा मोठा कागद कुठून आणला असेल यांनी? कित्ती रंग लागले असतील? बाप रे!!’
उबेद रांगेत शिरून चित्रं पाहू लागला. चित्रं पाहून त्याला आपला मोहल्ला आठवत होता. मस्जिदचे मिनार आठवत होते. तो हरवून गेला होता. पुढं आल्यावर एका चित्रात एक फेटा घातलेले दादा सायकल चालवत आहेत असं दिसलं. त्याला गावातला बिरूमामा आठवला. त्याचा लाडका बिरूमामा. पटकन् उचलून घेणारा, पांढरीशुभ्र राठ राठ मिशी टोचवत जोरात पापी घेणारा. त्याच्या तोंडाला तंबाखूचा वास यायचा. म्हणून उबेद त्याची पापी पुसून टाकायचा. उबेदला बिरूमामा आठवला आणि हसू आलं.
पुढं शाळेला जाणाऱ्या एका मुलीचं चित्र होतं. त्याला त्याच्या अंगणवाडीजवळच्या मोठय़ा शाळेतली माधवीदीदी आठवली. रोज चॉकलेट देणारी. त्याचा गालगुच्चा घेणारी. ‘गाल नको वडत जावू. फुगून ढब्बू होतील,’ असं गाल फुगवून तो बोलला की माधवी आणि तिच्या मत्रिणी खूप हसायच्या. त्याची पापी घेऊन शाळेकडे पळायच्या. उबेदने माधवीदीदीची पापी कधीच पुसली नाही. अजून एक पापी त्याने कधीच पुसली नाही ती विक्रमभयाची.
विक्रमभया त्याचा खास दोस्त होता. भारी क्रिकेट खेळायचा. पण त्याचं चित्र त्याला कुठंच दिसेना. चित्रकार विसरले वाटतं चित्र काढायला.
उबेदला एक चित्र खूप आवडलं. त्यातल्या झाडाला फुलं नाही तर तारे लटकत होते. अम्मी नेहमी ‘तारों का झाड’ म्हणते ते हेच असावं. पण या चित्र काढणाऱ्यांना हे झाड कुणी दाखवलं? अम्मी म्हणते ‘झाड न दिकता. खाली तारे दिकते.’ अम्मीला झाड दिसलं नसावं बहुतेक. या चित्रकाराची अम्मी उंच असणार, म्हणून त्यांना झाड दिसलं असावं.
उबेद एका चित्राजवळ येऊन थांबला. एक बाई आपल्या मुलाला कडेवर घेऊन चाललीय. क्षणभर त्याचे डोळे चमकले. थोडं थोडं पाणी डोळ्यांत साठून गेलं. त्याने हात उचलून त्या बाईला स्पर्श करायचा प्रयत्न केला. इतक्यात त्याच्यावर कुणीतरी खेकसलं.
‘‘ए, हात नको लावू?’’
उबेदने रागाने त्यांच्याकडे पाहिले. हे मोठे लोक स्वत:ला समजतात काय? सगळं यांनाच कळतं का? त्याला फाडफाड काहीतरी बोलायची इच्छा झाली होती. पण त्याला अम्मीची आठवण येऊ लागली होती. तो पुढं सरकला. काहीजण त्याच्यावर खेकसले, काहीजण लाडाने बोलले. उबेदला काहीच आवडलं नाही. त्याने एक चित्र पाहिलं. त्यातला माणूस त्या खोलीतल्या टेबलाजवळ उभ्या असलेल्या माणसासारखा दिसत होता. थोडंसं टक्कल पडलेलं आणि डोळ्यावर चष्मा. ते सर्वाना नमस्कार करत होते. हसून बोलत होते.
उबेदने अंदाज केला. ‘‘मंजे ही चित्रं यांनी काढलीत तर!! शाब्बास !! भारी आहेत चित्रं.. एकच नंबर!’’
उबेद पुढं सरकला.. तिथंच एका कोपऱ्यात रंग ठेवलेले होते. उबेदच्या चेहऱ्यावर चमक आली. डोळे लकाकले. तो हळूच तिकडे सरकला. मोठय़ा कागदाच्या पाठीमागे जाऊन बसला. ‘आपण कुणाला दिसत नाही ना?’ हे त्याने आधी निरखून पाहिलं. तो दिसत नव्हता. खात्री पटली. गर्दीमुळे त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
उबेदने एक कोरा कागद आणि रंगपेटी उचलली. हळूच तो मोठय़ा कागदाच्या मागे गेला. कागद जमिनीवर ठेवून फतकल घालून बसला. ‘कोणतं चित्र काढावं?’ डोकं खाजवत तो विचार करू लागला आणि त्याला ते मघाचं चित्र आठवलं- आई आणि मुलाचं. त्याने आठवून तसंच चित्र काढायला सुरुवात केली. रेघोटय़ा, काही ठिपके, गिचमिड असं काहीसं करत त्यानं चित्र पूर्ण केलं. शेजारी ‘तारों का झाड’ ही काढलं. तारे लटकवले.
उबेद थकला होता. त्याच्या पापण्या जडसर झालेल्या. त्याने तसंच डोकं खाली टेकवलं. चित्रावरून हात फिरवला आणि तिथंच झोपी गेला. त्याच वेळी खोलीच्या दाराशी एक जोडपं मोबाईलमधला फोटो दाखवून लोकांना काहीतरी विचारत होतं. गार्डही सोबत होता. त्याने उबेदचा फोटो ओळखला होता. विचारत विचारत ते आत आले. चित्रकार अन्वर हुसेन यांनी त्यांना ‘काय झालंय,’ असं विचारलं. त्यांनी ‘आपला चार-साडेचार वर्षांचा शेरवानी घातलेला मुलगा चुकून इकडे आलाय आणि आम्ही त्याला शोधतोय असं सांगितलं. गार्डनी सांगितलं की तो आत आलाय. तो शहरात पहिल्यांदा आलाय.’ चित्रकार यावर मंदसं हसले. त्यांनी पालकांना त्यांच्यासोबत यायला सांगितलं. चित्रकारांनी उबेदला आधीच पाहिलं होतं. त्याचं चित्र पाहणं, चित्रात काहीतरी शोधणं त्यांनाही आवडून गेलं होतं. शेवटी कागद व रंग घेऊन जाताना पाहून त्यांना गंमत वाटली होती. ‘आता प्रदर्शन ठेवलं की मुलांसाठी एक कोपरा ठेवायचाच असा,’ असं काहीतरी त्यांनी ठरवूनही टाकलं होतं. उबेद चित्र काढताना एवढा गुंतला होता की चित्रकार येऊन त्याला पाहून गेल्याचंही त्याला कळालं नाही. अन्वर हुसेन नंतर आपल्या कामात गुंतून गेले.
ते सर्वजण सरळ मोठय़ा बॅनरच्या मागे आले. पाहिलं तर उबेद झोपी गेलेला. अम्मीने त्याला पटकन उचलून घेतलं. पटापट त्याचे मुके घेतले. छातीशी घट्ट धरून ठेवलं.
चित्रकार अन्वर हुसेन यांनी उबेदनं काढलेलं चित्र उचलून घेतलं. त्याच्या रेघा- टिंबातली आई आणि मूल आणि जवळचं ताऱ्यांचं झाड पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
‘‘क्या ये मं रख लूं?’’ उबेदच्या अम्मी-अब्बांनी अवघडूनच ‘हो’ म्हटलं.
‘‘बच्चा होशियार है आपका.’’ असं म्हणून त्यांनी उबेदच्या पाठीवरून हात फिरवला. उबेदचे अब्बू आणि अम्मी ‘‘शुक्रिया’’ म्हणून निघून गेले.
चित्रकार अन्वर हुसेन मात्र बराच वेळ हातातल्या चित्राकडे पाहत होते. खिशातला पेन काढून त्यांनी चित्राच्या खाली लिहिलं..
उबेद..
arukskazi82@gmail.com