फारूक एस. काझी

गजल सकाळी उठली. उठल्याबरोबर तिने आपल्या उजव्या हाताची तर्जनी नाकात घालून फिरवली. नंतर डाव्या हाताची तर्जनी नाकात घातली.

अम्मीने हे पाहिलं आणि ती ओरडली, ‘‘गज्जो, नाकात बोटं नको घालू. नाहीतर तुझं नाक हिप्पोसारखं होईल.’’

गजलने बोट काढलं खरं, पण तिच्या डोक्यात विचार आला, ‘हिप्पो म्हणजे काय? त्याचं नाक कसं असतं? आणि नाकात बोट घातल्याने माझं नाक हिप्पोसारखं कसं काय होईल?’ असा विचार करता करता गजलने पुन्हा नाकात बोट घातलं.

अम्मी पुन्हा ओरडली. गजल उठून बाहेर आली. डोक्यात एकच विचार होता-हिप्पो कसा असतो? त्याचं नाक कसं असतं?

‘भय्याला विचारावं का? त्याला माहीत असतं खूप काही.. का अब्बूंना विचारावं?’

अम्मीला विचारण्यात अर्थ नव्हता. ती आपल्याला सोडणार नाही. आधीच नाकात बोट घातल्यामुळे ती चिडतेय सारखी. आता माझ्या नाकात बव्वा आहे तर मी काय करू? नाकात बोट घातलं की तो बव्वा गप्प बसतो, बाहेर जातो. बाहेर नाही गेला तर मला गुदगुल्या होतात.

गजल दिवसभर खेळत राहिली. नाकात बोट जाईच. अम्मी ओरडे. गजलला आता गम्मत वाटू लागली होती. आपण नाकात बोट घातलं की अम्मी मोठय़ाने ओरडते. तिचा साउंड सुरू होतो. मज्जा..!!

संध्याकाळी तिचा भया शाळेतून घरी आला.

गजल धावतच त्याच्याजवळ गेली.

‘‘भया..ये भया.. तुला हिप्पो म्हंजे काय माहितीय का? अम्मी मला म्हणते नाकात बोटं घालशील तर तुझं नाक हिप्पोसारखं होईल.’’

अलफाज हसला. ‘‘अरे, हिप्पो म्हंजे, हिप्पोपोटॅमस. पाणघोडा.’’

‘‘तू बघितलाय का कधी?’’ गजलला उत्सुकता लागली होती.

‘‘हो, पण पुस्तकात आणि व्हिडीओत. खराखुरा नाही बघितला.’’

‘‘मला दाखव की.’’ गजलने हट्टच पकडला.

अलफाजने काहीसं वैतागत तिला घरातल्या पुस्तकांच्या कपाटातलं प्राण्यांचं पुस्तक काढून दिलं. पुस्तक जाडजूड होतं. गजलला आवरत नव्हतं.

‘‘कुठंय?’’ गजलने अधाशीपणाने पुस्तक उघडलं.

‘‘जरा थांब ना, इतकी कसली घाई झालीय तुला? नाहीतर तो हिप्पो येईल आणि तुला उचलून घेऊन जाईल.’’ अलफाजने गजलला भीती घातली.

गजल घाबरली. चुपचाप बसली.

अलफाजने पुस्तक उघडून चाळायला सुरुवात केली.

‘‘कुठं गेला बरं हिप्पो? का गेला आफ्रिकेच्या जंगलात? आमच्या गजलूला घेऊन जा रे बाबा !’’ असं म्हणत तो हसत होता. गजल अजूनच घाबरली होती.

तिचा भया हुशार आहे असं तिला नेहमी वाटे.

अलफाजला हिप्पो सापडला एकदाचा. ‘‘हां!! हा हिप्पो सापडला. बघ त्यात त्याचं नाक.’’ एवढं बोलून अलफाज बाहेर खेळायला पळाला.

गजलने हळूच पुस्तक मांडीवर घेतलं. तिच्या मांडीवर ते बसत नव्हतं. तरीही तिने प्रयत्नाने पुस्तक मांडीवर घेतलंच.

‘‘हम्म, तू आहेस होय हिप्पो.. कसला जाडू आहेस बाबा तू? कमी खात जा. नाक बघू तुझं,’’ असं म्हणत तिने पुस्तकातल्या हिप्पोच्या नाकाला हात लावला.

इतक्यात कुणीतरी जोरात शिंकलं आणि गजल घाबरून गेली. पुस्तक मांडीवरून खाली पडलं.

‘‘आय्यो, कोण शिंकलं एवढय़ा मोठय़ाने?’’ गजल घाबऱ्या आवाजात बोलली.

अजून एक शिंक ऐकू आली. गजलने उडीच मारली.

थोडा शेंबूड तिच्या तोंडावर उडाला.

‘‘य्याक..’’ गजल कसनुसं तोंड करत मागे सरकली.

‘‘क्किती जोरात नाकात बोट घातलंस तू माझ्या..आ २२२ आं आक्कछी.’’ हिप्पो पुन्हा शिंकला. अजून थोडा शेंबूड उडाला. तो थेट गजलच्या फ्रॉकवर.

‘‘ईईईईईईई.. शेंबडय़ा.’’ फ्रॉक झटकत ती मागे सरकली.

‘‘माझ्या नाकात का बोट घातलंस?’’ हिप्पो रागावला होता.

‘‘मी तुझं नाक बघत होते. मला काय माहीत तू खराखुरा आहे म्हणून. आणि तू त्या पुस्तकात काय करतोय? तू एवढा जाडू ..आणि त्या एवढय़ाशा पुस्तकात कसा काय मावलास?’’ असं म्हणून गजल मोठय़ाने हसू लागली.

‘‘मी बाहेर येऊ का?’’ हिप्पोने विचारलं.

गजलला काय उत्तर द्यावं हे कळेना. तिला हिप्पो बघायचा होता. तिने त्याला ‘ये’ असं मानेने खुणावलं.

हिप्पो सरळ चालत चालत बाहेर आला. तिच्या शेजारी येऊन बसला. त्याला जागा पुरत नव्हती. त्याला बघून गजल जाम घाबरली. त्याचा जबडा कित्ती मोठा होता? बापरे! अख्खी गजल त्यात सहज बसेल एवढा. आपण भयाला बोलावून आणू या का? असा विचार तिच्या मनात आला. पण तिने नकोच, असं म्हणत तो विचार सोडून दिला.

‘‘हे बघ माझं नाक.’’ गजल आवाजाने दचकली.

कारण हिप्पो अगदी तिच्या नाकासमोर आला होता. दोन मोठय़ा नाकपुडय़ा समोर होत्या. जोराचा श्वास होत होता आणि कसलासा वास तिच्या नाकात शिरला. तिने तोंड वेडंवाकडं केलं. हिप्पो मोठय़ाने तोंड पसरून हसला. तेव्हा त्याचे ते मोठ्ठाले दात तिला दिसले.

‘‘तुझं नाक एवढं मोठं का आहे? माझी अम्मी मला म्हणते की नाकात बोटं घातली की तुझं नाक हिप्पोसारखं होईल.’’ यावर हिप्पो पुन्हा हसला.

‘‘ते निसर्गाने दिलंय. गरज लागते आम्हाला मोठय़ा नाकाची. मी पाण्यात राहतो, पण माझे डोळे आणि नाक मात्र पाण्याच्या बाहेरच असतं.’’

‘‘आणि पाण्यात असताना काय करतोस?’’ गजलने लगेच प्रश्न केला.

हिप्पोने हसून मान हलवली.

‘‘पाण्यात गेल्यावर माझे नाक आणि डोळे दोन्ही बंद असतात. कारण मी पाच मिनिटं श्वास रोखू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी पाण्यात नाही राहू शकत.’’ हिप्पोने शांतपणे उत्तर दिलं.

‘‘म्हणजे तुला पाण्यात श्वास नाही घेता येत?’’ गजलची उत्सुकता तिला शांत बसू देत नव्हती.

‘‘नाही. मी पाण्यात श्वास नाही घेऊ शकत.’’

गजलचं समाधान झालं तरीही हिप्पोच्या नाकाकडे पाहात होती. तिने त्याला परत हात लावला. हिप्पो मागे सरकला. आधीच त्याचं नाक फुरफुर करत होतं.

‘‘तुला तुझी अम्मी खवळत नाही का रे?’’

तिने सहज प्रश्न विचारला.

‘‘कशासाठी?’’ हिप्पो जबडय़ातल्या जबडय़ात हसत होता.

‘‘कित्ती फसाडं नाक केलंय तू.. सारखी नाकात बोटं घालत असशील. होय ना?’’

हिप्पो यावर खूप मोठय़ाने हसला. त्याचा जबडा आणि ते दात पाहून गजल घाबरली.

‘‘चल, मला जावं लागेल आता. मी जास्त वेळ उन्हात नाही राहू शकत. गवत खाण्यासाठी फक्त मी बाहेर येतो. थोडंसं ऊन खाण्यासाठीही. आता मला जायला हवं.’’

हिप्पो गडबड करू लागला. त्याला पटकन परत जायचं होतं.

‘‘हो, जा. तुझी अम्मी तुला शोधत असेल. आणि जाण्याआधी प्रॉमिस कर की पुन्हा नाकात बोटं घालत बसणार नाहीस. गंदी आदत आहे ती. कर प्रॉमिस.’’ असं म्हणत गजलने आपला हात पुढे केला. हिप्पोला प्रश्न पडला की आता काय करायचं?

त्याने आपलं तोंड तिच्या हातावर घासलं.

‘‘तूही मला एक प्रॉमिस कर. इथून पुढे तू कधीच नाकात बोट घालणार नाहीस. नाहीतर सगळे तुला हिप्पो म्हणून हाक मारतील.’’ असं म्हणत हिप्पो मोठ्ठय़ाने हसला.

गजलही हसली.

‘‘नाही. आता मी नाकात बोट नाही घालणार. पक्का प्रॉमिस.’’

‘‘कसलं प्रॉमिस गज्जो.. आणि कुणाला करतीयेस प्रॉमिस?’’ भयाचा आवाज ऐकून गजलने मागे चमकून पाहिलं.

‘‘अरे भया, हा हिप्पो बघ.. याला करत होते प्रॉमिस.’’

गजलने शेजारी हात केला. पाहते तर काय? हिप्पो गायब!

‘‘कुठंय हिप्पो, येडी कुठली. हिप्पो इथं कुठून येणार?’’ अलफाजने हसून गजलच्या डोक्यावर हलकेच टपली मारली.

‘‘अरे होता इथे आत्ता. परत गेला वाटतं,’’ असं म्हणून तिने पुस्तकात पाहिलं. हिप्पो पुस्तकात जाऊन बसला होता. आणि हसत होता.

गजलही हसली.

‘‘हा ढंपू इथं जाऊन बसलाय.’’ असं म्हणून तिने पुस्तक बंद करून टेबलावर ठेवलं.

‘‘मी प्रॉमिस केलंय त्याला. आता नाकात बोट नाही घालणार. आणि त्यानेही प्रॉमिस केलंय.. तोही आता नाकात बोटं नाही घालणार.’’ असं बडबडत गजल बाहेर निघून गेली.

अलफाज मात्र तिच्याकडे कोडय़ात पडल्यासारखा पाहात होता. ‘गजलू येडी झाली काय?’ असंच वाटलं त्याला. गजल मात्र मस्त खुशीत येऊन अंगणभर नाचत होती.

आता तिचं नाक हिप्पोसारखं होणार नव्हतं. तिने प्रॉमिस जे केलं होतं.

farukskazi82@gmail.com