फारूक एस. काझी
घ ण घण घण… मधल्या सुट्टीची घंटा झाली. घाईत जेवण उरकून सगळी मुलं खेळायला पळाली. साहिल आणि त्याचे मित्र लगोर खेळत होते. चौथीच्या वर्गातील इतर मुलंही त्यांच्यासोबत खेळत होती. धीरजनं चेंडू फेकला आणि लगोर पाडली. साहिल चेंडू पकडायला पळाला. चेंडू थोडा दूरवर गेला होता. साहिल तिकडे गेला. शाळेच्या पाण्याच्या टाकीचं पाणी जिथं वाहून येत होतं तिथं गुलाब, अबोली अशी फुलझाडं लावली होती. सदाफुली तर बहरून आली होती.
साहिल चेंडू शोधू लागला. सदाफुलीच्या झुडुपात चेंडू सापडत नव्हता. त्यानं झुडुपं इकडंतिकडं करून पाहिली, पण चेंडू दिसला नाही. इतक्यात एक अजब घटना घडली. त्या झुडुपांतून फुलपाखरांचा थवाच्या थवा बाहेर पडला. पिवळी, गुलाबी, लालसर, निळी फुलपाखरं आकाशाकडे झेपावली. साहिलला काहीच कळलं नाही. तो नवलाने ते सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यांत सर्व रंग फेर धरून नाचत होते. फुलपाखरं गोलाकार फिरून वरवर चालली होती. साहिल मान वर करून ते दृश्य पाहत होता. अखेर सर्व फुलपाखरं वर उडून गेली.
साहिल अजूनही भांबावलेला होता. त्याला खरंच कळत नव्हतं की आपण खरीखुरी फुलपाखरं पाहिली की हे स्वप्न होतं? की आपल्याला भास झाला.
‘‘साहिल आरं फेक की बॉल लवकर.’’ मुलं मोठ्यानं ओरडत होती. पण साहिलला तो आवाज कुठून तरी दुरून येत असल्यासारखा वाटत होता. इतक्यात त्याच्या दंडाला धरून कुणीतरी हलवतंय असं वाटलं. तो भानावर आला.
‘‘आरं कुठं ध्यान आहे तुजं?’’ शरद त्याला विचारत होता.
‘‘हम्म… हम्म…’’ साहिल भानावर आला. चेंडू समोरच होता. शरदनं तो उचलून घेतला. ‘‘समोर तर होता बॉल, मग का नाही उचलला?’’ साहिल अजूनही गप्पच होता. फुलपाखरं कुणालाच कशी काय दिसली नाहीत? दिसली असती तर सगळी मुलं पळतच आली असती. किती गोंधळ घातला असता सगळ्यांनी. पण कुणीच आलं नाही. म्हणजे कुणीच फुलपाखरं पाहिली नाहीत. असं कसं शक्य आहे? साहिल गप्प गप्पच होता. तो घरी आला. हात पाय धुवून खेळायला बाहेर पडला. मन अस्वस्थ होतं. त्यानं आपला मित्र धीरजला हे सांगितलं.
‘‘तू सपान बगितलं असल. आमी सगळे तितंच तर हुतो. आमाला का बरं दिसली नाहीत?’’ धीरजनं विचारलं.
काय आणि कसं सांगणार? साहिलकडे काहीच उत्तर नव्हतं. तो निराश होऊन घरी परत आला. रात्री तो नीटसं जेवलाही नाही. घरात कुणाच्या ते लक्षात आलंही नाही. पण तो उदास आहे, काळजीत आहे हे आईनं जाणलं होतं, पण ती काहीच बोलली नाही. साहिल झोपला आणि डोळ्यांसमोर मोठमोठाली फुलपाखरं दिसू लागली. ती आकारानं खूप मोठी होती. त्यांनी सर्व आसमंत व्यापून टाकला होता. त्यात काळ्या, करड्या आणि गडद निळसर रंगांची फुलपाखरं खूप होती. ती साहिलभोवती गोलगोल फिरत होती. वरवर चालली होती. सोबत साहिललाही नेत होती. साहिलही गोलगोल फिरत होता. ओरडत होता. साहिल घाबरून उठून बसला. गटागट तांब्याभर पाणी पिऊन तो पुन्हा झोपी गेला. आईनं त्याला थोपटून झोपवलं.
‘‘साहिल, रात्री स्वप्न पडलं होतं का रे?’’ आईनं सकाळी विचारलं.
‘‘हम्म…’’ साहिलला ते स्वप्न आठवून अंगावर शहाराच आला. ‘‘आई, काल मला शाळेत रंगीबेरंगी फुलपाखरं दिसली होती, पण फक्त मलाच. बाकी कुणालाच नाही दिसली. असं का? मला अजूनही कोडं उलगडेना.’’
‘‘दिवसापण स्वप्नं बगायला का तू?’’ असं म्हणून आई हसली.
‘‘हसू नको. खरंच मला दिसली फुलपाखरं.’’
आई काही बोलली नाही. साहिल शाळेत गेला. शाळेत गेल्यावर त्याला शेख सरांची आठवण आली. तो ऑफिसमध्ये गेला. ‘‘सर, बाहेर येता का? जरा कामय.’’ साहिल सरांना हळू आवाजात म्हणाला. सर बाहेर आले. साहिलला सगळं सांगायचं होतं. पण कसं सांगू तेच कळेना. सरांनी पारावर बैठक मारली. आणि साहिलला विचारलं. ‘‘हम्म, आता बोल. काय कामय?’’
साहिल थोडा वेळ चुळबुळला आणि त्यानं धडाधड सगळं सांगून टाकलं. सर काळजीपूर्वक सगळं ऐकत होते.
‘‘साहिल तुला फुलपाखरांचं स्वप्न पडलं यात वाईट काहीच नाही. पण ती तुलाच का दिसत आहेत? आठव बरं मागच्या काही दिवसांत काही झालं होतं का?’’ सरांनी शंका बोलून दाखवली.
साहिलला काही आठवेना. काही घडलंय का? असा तो विचार करू लागला. पण काहीच आठवेना.
‘‘थोडा विचार कर आणि मग येऊन सांग मला.’’ सर असं बोलून उठले. शाळा भरण्याची बेल व्हायची वेळ झाली होती. साहिल तिथून निघाला. चार पावलं चालला असेल नसेल त्याला आठवलं. तो तसाच परत सरांकडे आला. ‘‘सर, सर.. आठवलं. तीनचार दिवसांपूर्वी मी आणि माझ्या मित्रांनी काही फुलपाखरं पकडली होती. आणि आमच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवली.’’
सरांनी साहिलकडे पाहिलं. नकारार्थी मान हलवली. ‘‘असं चुकीचं वागून काय मिळतं?’’ असं काही त्यांना बोलायचं होतं. साहिल धावतच वर्गात गेला. त्यानं आपला कप्पा उघडला. दोन-तीन फुलपाखरं निपचित पडलेली होती. त्यानं त्यांना उचलून बाहेर काढलं. त्यांच्यात अजून जीव होता. त्यानं त्यांना सदाफुलीच्या झुडुपात सोडलं. त्यांनी हलचाल केली. साहिलचा चेहरा उजळला. डोळ्यांत चमक आली. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. शेख सर तिथं आले. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. थोपटलं. साहिलला खूप आधार वाटला. स्वप्नातली फुलपाखरं समोर होती आणि साहिल मनातून खूप खूश होता. फुलपाखरांचे घाबरवणारे रंग आता डोळ्यांत हसू लागले होते.
farukskazi82@gmail.com