मॅटिल्डा अ‍ॅथनी डिसिल्वा

दसरा संपला तसं सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले. शाळेतसुद्धा सहामाही परीक्षा संपत आल्या होत्या. सोहम आणि जिमी दोघेही खूश होते. लवकरच दिवाळीची सुट्टी लागणार होती. सोहमचं सगळं लक्ष आता दिवाळीच्या तयारीकडे लागलं होतं. घराची साफसफाई करायची होती; त्यासाठी आईला मदत करायची होती. मोठा आकाशकंदील बाबा विकतचा आणत असत. पण दुसरे छोटे आकाशकंदील बनवायला ते सोहम आणि त्याची छोटी बहीण संपदा हिला मदत करत असत. दिव्यांची रोषणाई करायची होती. मुख्य म्हणजे दिवाळीसाठी नवीन कपड्यांची खरेदी करायची होती. खूप कामं होती, पण उत्साहही तेवढाच होता. सोहमच्या घराजवळच जिमीचं घर होतं. म्हणूनच सोहमला मदत करायला जिमीदेखील त्यांच्या घरी जात असे. जिमीचीही धाकटी बहीण होती. सारा तिचं नाव. त्या दोघांनाही सोहमच्या घरी दिवाळी साजरी करायला आवडत असे.

‘‘सोहम, झाले का रे आकाशकंदील?’’ जिमीनं विचारलं.
‘‘हो रे, होतच आले आहेत. फक्त त्या झिरमिळ्या लावायला संपदाला मदत कर.’’ सोनमनं सांगितलं.
‘‘सोहम दादा मीपण करते मदत संपदाताईला.’’ आपल्या दोन वेण्या हलवत छोटी सारा म्हणाली.
‘‘सारा, या बघ तुझ्यासाठी आईनं साध्या पणत्या आणल्या आहेत.’’ संपदानं साराला सांगितलं.
‘‘अरे व्वा! किती छान!! आता मी त्या घरी नेऊन छान रंगांनी रंगवीन. संपदाताई, तुलापण देईन हं थोड्या.’’ सारा आनंदानं म्हणाली.
‘‘अगं सारा, मी संपदासाठीही आणल्या आहेत पणत्या. तुला रंगवायला आवडतात म्हणूनच तुझ्यासाठीही आणल्या.’’ सोहमची आई घरातून बाहेर येत म्हणाली.
‘‘खूप थॅंक्यू काकू. माझी आई सांगते, दिवाळी दिव्यांचा सण आहे ना, म्हणून आपणपण आपल्या घरी पणत्या लावू.’’ सारा अगदी लाडात बोलत होती. तिचं ते लाडीक बोलणं ऐकायला सगळ्यांनाच बरं वाटत होतं.

हेही वाचा : बालमैफल: मुरीकाबुशी

‘‘चला, पटापट हात हलवा बरं. दोन दिवसांनी नरकचतुर्दशी आहे. म्हणजे पहिली
अंघोळ !’’ बाबा हसत हसत म्हणाले.
‘‘काका, पहिली अंघोळ म्हणजे काय असते हो? आपण दररोज तर अंघोळ करतोच ना!’’ जिमीला प्रश्न पडला.
‘‘अरे, पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंगस्नान म्हणतात त्याला. आपण काही पहिल्यांदाच अंघोळ करतो असा नाही त्याचा अर्थ…’’ सोहमचे बाबा म्हणाले.
‘‘मी सांगते तुला पुढे.’’ आई सांगू लागली.
‘‘अशी गोष्ट सांगितली जाते की, नरकासुर नावाचा एक दुष्ट राजा होता. तो सर्वांना बंदी बनवायचा. मग एकदा भगवान श्रीकृष्णानं त्या सर्वांना सोडवलं आणि नरकासुराचा वध केला. तोच हा नरक चतुर्दशीचा दिवस.’’ सोहमची आई गोष्ट सांगत होती.
‘‘पण त्याचा आणि अभ्यंगस्नानाचा काय संबंध?’’ सोहमलाही शंका आली.
‘‘असे म्हणतात की, मरण्यापूर्वी नरकासुरानं श्रीकृष्णाकडे एक वर मागितला.’’ आई पुढे सांगू लागली.
‘‘काय वर मागितला काकू?’’ जिमीनं विचारलं.
‘‘या दिवशी पहाटे जो मंगलस्नान करील त्याला नरकाची बाधा होणार नाही, असा वर मागितला. श्रीकृष्णानं त्याला वर दिला. म्हणून या दिवशी पहाटे पवित्र व मंगलस्नान करायची पद्धत सुरू झाली.’’ आईनं सांगितलं.

‘‘म्हणून एवढ्या पहाटे स्नान करावं लागतं का?’’ संपदाला आता समजलं होतं.
‘‘फक्त हे एकच कारण नाही रे मुलांनो. दुसऱ्याही काही गोष्टी आहेत.’’ बाबा म्हणाले.
‘‘आणखी काय काका?’’ जिमीची उत्सुकता वाढली.
‘‘आपली दिवाळी येते तेव्हा बहुधा थंडीचे दिवस असतात, बरोबर! थंडीत आपली त्वचा कोरडी पडते. मग तिला तेलानं मालिश केलं की ती मऊ होते, तजेलदार होते.’’ बाबा सांगत होते.
‘‘हो आणि तेलानं मालिश केल्यावर आपले स्नायू बलवान होतात. हाडांना बळकटी मिळते.’’ आई पुढे म्हणाली.
‘‘हो खरंच, आई तेलानं मालिश केल्यावर खूप छान वाटतं.’’ सोहम म्हणाला.
‘‘मग अंगाला उटणं लावतात. यात नागरमोथा, वाळा, आंबे हळद असे सगळे सुगंधी आणि आयुर्वेदिक औषधी चूर्णांचं मिश्रण असतं.’’ आई सांगत होती.
‘‘त्यामुळे पहाटेच असं अभ्यंगस्नान केलं की मन एकदम प्रसन्न होऊन जातं.’’ बाबा हसत म्हणाले.
‘‘त्यामुळे दिवाळीची मजा अजून वाढते, हो ना आई.’’ संपदाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
‘‘आणि ऐकलं का जिमी बाळा, आयुर्वेदाच्या सांगण्याप्रमाणे असं स्नान खरं तर रोज करायला हवं. पण हल्लीच्या काळात एवढा वेळच नसतो आपल्याकडे.’’ बाबा म्हणाले.
‘‘खरंच काकू, प्रत्येक गोष्टीमागे काही तरी वैज्ञानिक कारण असतंच नाही का?’’ जिमी म्हणाला.

हेही वाचा : बालमैफल: नफा तोटा

‘‘हो हे अगदी खरं आहे. पूर्वीच्या लोकांना पटावं म्हणून सर्व गोष्टींना धार्मिकतेची जोड देऊन समजावलं जात होतं.’’ बाबा म्हणाले.
‘‘चला, झाली का तुमची कामं? अंधार होईल आता.’’ आईनं आठवण करून दिली.
‘‘काकू… माझ्यासाठीपण उटणं आणाल का? मी पण माझ्या आईला मला अभ्यंगस्नान घालायला सांगेन.’’ घरी जाता जाता जिमीनं सोहमच्या आईला सांगितलं.
‘‘नक्की आणिन हं जिमी…’’ आई हसून म्हणाली.
‘‘काकू मलापण…’’ छोटी सारा चिवचिवली.
‘‘हो गं चिमणे… तुझ्यासाठीसुद्धा… फराळाला या हं पण अभ्यंगस्नान झालं की…’’ काकू हसत हसत म्हणाल्या.
‘‘हो काकू…’’ असं लाडात म्हणून सारा आपल्या दादाचा हात धरून आपल्या घरी निघाली.
matildadsilva50 yahoo.co.in