मेघश्री दळवी
सुट्टीत सुजय त्याच्या आईबाबांबरोबर आजोबांच्या गावाला गेला होता. एका संध्याकाळी आजोबा त्याला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गेले. वाऱ्याचा गारवा आणि लाटांचा खळाळता आवाज ऐकत सुजय खूप खूश होता.
‘‘आजोबा, किती मस्त स्वच्छ वाळू आहे ना? आम्ही मागे गेलो त्या बीचवर किती कचरा पडला होता!’’
‘‘हो रे. येणारेजाणारे कचरा करतात म्हणून आम्ही इथे खाऊच्या गाड्या लावायला देत नाही. आणि जागोजागी कचरापेट्या ठेवल्या आहेत.’’
‘‘मस्त!’’ उड्या मारत सुजय इकडे तिकडे पळत होता, वाळूत घसरून पडत होता.
‘‘सावकाश रे बाळा!’’ आजोबांनी हाक दिली.
‘‘शंखशिंपले खूप आहेत इथे. हा बघा केवढा मोठा शिंपला!’’ सुजय थक्क होऊन एक एक गोष्ट पॅंटच्या खिशात भरत चालला होता. मध्येच तो कशालातरी अडखळला. ‘‘आई ग!’’ म्हणत त्याने तिथेच बसकण मारली.
‘‘आजोबा, हे बघा काहीतरी कडक कडक आहे वाळूत पुरलेलं.’’
आजोबा बाजूला येऊन वाकून बघायला लागले. ‘‘अरेच्चा! ही तर एक पेटी दिसते आहे. जरा गंजलेली दिसते आहे. तुला कुठे टोचली तर नाही ना?’’ सुजयने नाही म्हटलं तेव्हा आजोबांना हायसं वाटलं.
‘‘आजोबा, आपण उघडून बघूया? काय असेल आत?’’
‘‘बघूया.’’ म्हणत आजोबांनी जोर लावून ती छोटी पेटी उचकटून काढली. तिला कुलूप नव्हतं. फक्त कडी लावलेली होती. त्यांनी खिशातून रुमाल काढून पेटीवरची वाळू झाडली. एव्हाना सुजयला भारी उत्साह वाटू लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बालमैफल : मी… अनादी, अनंत!

‘‘आजोबा, ज्या कुणाची असेल त्याला आपण परत नेऊन द्यायची ना? आत बघूया? त्यांचा पत्ता असेल तर?’’
‘‘चालेल,’’ म्हणत आजोबांनी ती पेटी हलकेच उघडली. आत एक जुना, पिवळट पडलेला फोटो होता. फोटोत दोन मुली आणि एक मुलगा समुद्रकिनाऱ्यावर खेळत होते. समुद्रात दोन नावा होत्या आणि मुलांच्या मागे वाळूत रुतलेली एक बोट दिसत होती. आजोबांनी फोटोच्या मागे पाहिलं तर तिथे सुमन, विमल, कृष्णाजी, १९७० असं लिहिलेलं होतं.
‘‘कृष्णाजी? म्हणजे तो आपट्यांचा तर नव्हे?’’ आजोबा विचारात पडले.

‘‘हा मुलगा पाचसहा वर्षांचा दिसतो आहे. कृष्णापण १९७० मध्ये त्या वयाचा असेल. आणि या त्याच्या चुलतबहिणी.’’
‘‘आजोबा, तुम्ही ओळखत असाल तर आपण जाऊया का त्यांच्याकडे?’’
‘‘अरे, कृष्णा नि त्याचं कुटुंब मागेच मुंबईला गेलं. त्यांचं घर आता बंद असतं.’’ मग आजोबांनी त्या पेटीतून पाच आणि दोन पैशांची नाणी बाहेर काढली. ‘‘ही बघ रे, त्या वेळची नाणीपण आहेत. मला माझे आजोबा कधीतरी पाच पैसे द्यायचे आणि मी त्याच्या लेमन गोळ्या आणून खायचो.’’
आजोबांच्या तोंडून त्यांच्या आजोबांविषयी ऐकून सुजयला गंमत वाटली. ‘‘आणखी बघा काय काय आहे या पेटीत,’’ म्हणत त्याने एक एक वस्तू बाहेर काढली. त्यात एक गोंडस लाकडी खेळणं होतं, कदाचित त्या फोटोतल्या मुलाचं लाडकं. कशिदाकाम केलेला रुमाल, तो त्यांच्या आईने प्रेमाने तयार केला असावा. एक वही होती, त्यात मुलांनी हाताने काही मजेशीर चित्रं काढली होती. आणि शिंपल्यांची एक माळ होती, त्यातले शिंपले म्हणजे याच किनाऱ्यावर घालवलेल्या क्षणांच्या आठवणी होत्या.

हेही वाचा : बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

आजोबांनी सोबतचा लिफाफा उघडला. आतल्या जीर्ण कागदावर लिहिलं होतं, ‘‘तुम्हाला ही कालकुपी सापडली म्हणजे तुम्ही आमच्या समुद्रकिनाऱ्यावर आला आहात. या ठिकाणी आम्ही खूप खेळलो होतो. आमच्यासाठी हा किनारा खूप खास होता. आता तुम्हालाही ही कालकुपी मिळाल्याने हा किनारा कायम आठवणीत राहील. तुम्ही कदाचित एकविसाव्या शतकात राहात असाल. उडत्या गाड्यांनी प्रवास करत असाल, सुट्टी घालवायला चंद्रावर जात असाल. पण इथेही येत राहा.’’
‘‘कालकुपी?’’
‘हो.’’ सुजयच्या प्रश्नाला उत्तर देत आजोबा म्हणाले, ‘‘ती एक गमतीशीर कल्पना आहे. कालकुपी म्हणजे एका काळाच्या माणसांनी भविष्यातल्या काळासाठी ठेवलेली आठवण. बघ ना, १९७० साली पुरलेली ही पेटी म्हणजे जणू पंचावन्न वर्षांपूर्वीचा संदेश आपल्याला मिळाला आहे.’’
‘‘‘आजोबा, मला एक कल्पना सुचली!’ सुजय उत्साहाने म्हणाला. ‘‘ही कालकुपी घेऊन आपण घरी आईबाबांना दाखवूया, आणि आपणही एक कालकुपी तयार करूया. त्यात आपले फोटो आणि माझा लाडका रुबिक क्यूब ठेवू. असं लिहूनही ठेवूया. भविष्यात कोणीतरी ती कालकुपी उघडून आपली गोष्ट वाचेल, आणि त्यांनाही वाटेल की आपण त्यांच्याशी काहीतरी बोलत आहोत. हो ना?’
आजोबांनी समाधानाने मान डोलावली. ‘‘सुजय, माझ्या लहानपणी या किनाऱ्याने आम्हाला असाच आनंद दिला होता. आता तू या आठवणी पुढच्या काळात पोहोचवशील तर हे फार छान होईल!’’

meghashri@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal article on memories written on paper in a box found on beach css