डॉ. नंदा हरम
मनीषा : आई, परवा तू अळूची भाजी केलीस, तेव्हा त्यात चिंचेचा कोळ घातलास ना?
आई : अगं बाई, बाईसाहेबांचं चांगलंच लक्ष आहे स्वयंपाकघरात!
मनीषा : सकाळी मी शाळेत जायच्या घाईत होते, पण तू आज सुरणाची भाजी चिरून ठेवल्यावर त्यातही चिंच घातलीस ना?
आई : अगदी बरोब्बर मनू. चांगलं निरीक्षण आहे तुझं!
मनीषा : मला एक सांग, सर्व भाज्यांमध्ये तू चिंच घालत नाहीस, मग याच भाज्यांमध्ये का घातलीस?
आई : चांगली शंका आहे तुझी. अगं, या भाज्यांमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात.
मनीषा : हे कुठून येतात?
आई : सांगते सगळं. या दोन भाज्या तू घरात पाहिल्यास म्हणून. पण जवळ जवळ २५० हून जास्त कुलातील वनस्पतींमध्ये कॅल्शिअम ऑक्झलेट किंवा कॅल्शिअम काबरेनेटचे (अरॅगोनाइट) स्फटिक असतात. वनस्पतींमध्ये जे जस्ताचं कॅल्शिअम असतं ना, ते या स्वरूपात साठवलं जातं.
मनीषा : या स्फटिकांचा आकार कसा असतो?
आई : चांगला प्रश्न विचारलास. हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. उदाहरणार्थ- समचतुर्भुज, मोठे लांब आयताकृती, सूच्याकृती (सुईसारखे), कोनाकृती इ.(चित्र पाहा)
मनीषा : तू आधी सांगितलंस, तेवढंच कार्य आहे? की आणखी काही?
आई : हुश्शार गं माझी बाई! संरक्षण हे दुसरं कार्य! शाकाहारी प्राणी या वनस्पती खायला येतात, त्यांच्यापासून संरक्षण मिळविण्याकरिता या सूच्याकृती स्फटिकांचा उपयोग होतो.
मनीषा : तो कसा काय? समजावून सांगत्येस?
आई : हो सांगते ना! सुईसारखे अणकुचीदार असलेले स्फटिक २५० मायक्रोमीटर म्हणजे १ मिलिमीटरच्या एक चतुर्थाश एवढे लहान असतात. ते अगदी सूक्ष्म अशा इडिओब्लास्ट या घटकाच्या विशेष रिक्तिकांमध्ये असतात. वनस्पतीच्या अधित्वचेत असलेल्या इडिओब्लास्टमध्ये हे स्फटिक एकत्रितपणे रचलेले असतात.
मनीषा : या स्फटिकांचा शाकाहारी प्राण्यांना उपद्रव कसा होतो?
आई : जेव्हा शाकाहारी प्राणी वनस्पतींची पानं ओरबाडून खातात, तेव्हा दबावाखाली इडिओब्लास्टमधून हे स्फटिक बाहेर पडतात. प्राण्यांनी पानं गिळण्यापूर्वीच त्यांच्या तोंडातील श्लेष्मल अस्तरामध्ये हे स्फटिक टोचले जातात. त्यामुळे तोंडात प्रचंड खाज सुटते आणि काही वेळा भरपूर लाळ स्रवायला लागते.
मनीषा : आई सुरणाची भाजी हाताला खाजते, म्हणजे नेमकं हेच होतं ना?
आई : अगदी बरोब्बर! तोंडाऐवजी हातावर ही गोष्ट घडते.
मनीषा : बरं, हे सगळं समजलं. पण या स्फटिकांचा आणि चिंचेच्या कोळाचा काय संबंध?
आई : अगं मनू, चिंचेमध्ये टार्टारिक अॅसिड (आम्ल) असतं. त्याची या कॅल्शिअम ऑक्झलेटबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शिअम टार्टारेट तयार होतं. त्यामुळे आता ऑक्झलेट स्फटिक घशात बोचत नाहीत. म्हणूनच अळूची किंवा सुरणाची भाजी बनवताना त्यात चिंचेचा कोळ घालतात.
मनीषा : आई, आता कळलं मला, वनस्पती किती हुशार आहेत! त्यांनी जास्तीच्या कॅल्शिअमची तर चोख व्यवस्था केलीच, पण स्वत:ला सुरक्षा कवचही निर्माण केलं. अगदी- एका दगडात दोन पक्षी!
आई : योग्य म्हण निवडलीस बघ! बरं, तू किवी फ्रूट खाल्लं आहेस ना पूर्वी?
मनीषा : हो. त्यातही हे स्फटिक असतात की काय?
आई : हो तर. पण जास्त प्रमाणात नाही.
मनीषा : फळ तर आपण तसंच खातो, पण ते कुठे खाजतं?
आई : निरीक्षण शक्ती उत्तम आहे हं मनू! ताज्या फळांमध्ये हे स्फटिक श्लेष्मकामध्ये गुंडाळलेले असतात, त्यामुळे त्यांचा त्रास होत नाही.
मनीषा : व्वा. निसर्गानेच सोय केली म्हणायची! आपण स्वयंपाकघरात रसायनशास्त्र किती छान वापरतो!
आई : हो तर.. स्वयंपाकघरातील शास्त्राचा चांगलाच अभ्यास केलेला आहे.
मनीषा : यापुढे सर्व गोष्टींवर मी नजर ठेवेन.
आई : नक्की.. गुणाची माझी बाई!
nandaharam2012@gmail.com