आमच्या मांजरीनं तीन पिल्लांना जन्म दिला होता. आम्ही त्या पिल्लांचे खूप लाड करायचो. पण दरम्यान मांजरीणीच्या तोंडाला काहीतरी जखम झाली आणि त्या जखमेतून रक्त गळायचं आणि म्हणून मग ती घरात यायचीच बंद झाली. त्या पिल्लांचं दूधसुद्धा बंद झालं. मग आम्ही त्यांना म्हशीचं दूध द्यायला लागलो, पण ते त्यांना पचेना म्हणून आजोबा त्यांना शेतात सोडून आले. रात्री झोपताना आईनं मला हे सांगितलं, त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी खूप रडले आणि तशीच झोपी गेले. मध्यरात्र झाल्यावर मांजरीनं त्यातलं एक पिल्लू माझ्याजवळ आणून ठेवलं आणि जोरजोरात ओरडू लागली. त्याने मला जाग आली. पिल्लू माझ्या उशाशी होतं. मी त्याला उचलून एका कापडात बांधून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं बाकीची दोन पिल्लं तोंडात धरून आणली. मग मी त्यांनाही कापडात बांधून बॉक्समध्ये ठेवलं.
या प्रसंगामुळे आईचं प्रेम काय असतं हे मला कळून चुकलं. त्या मांजरानं एक प्राणी असूनही आपली पिल्लं त्या शेतातून मध्यरात्री तोंडात पकडून आणली होती. खरंच आई ही आई असते- मग ती प्राण्यांची असो वा माणसाची. आईचं प्रेम हेच जगातील महान प्रेम असतं. आईविना मीसुद्धा अधुरी अपुरी आहे. आई घरी नसली की घरसुद्धा घर राहत नाही. म्हणूनच म्हणतात ना ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..’ – समृद्धी उत्तम वांद्रे, ७ वी, केंद्र शाळा, वि. मं. परेणोली, कोल्हापूर