अलकनंदा पाध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आई, माझं सोलार किट नक्की आज येईल ना गं? संध्याकाळी आर्यन आणि मी उद्याच्या प्रॉजेक्टची इथं आधी नीट प्रॅक्टिस करणार आहोत.’’ जयचा हा प्रश्न आईला सकाळपासून ३ वेळा विचारून झाला होता. पण त्याचा उत्साह पाहून आईनं पुन्हा शांतपणे ‘‘होय राजा.. मगाशीच सांगितलंय ना तुला की सोलर किटचं पार्सल आजच येईल असा त्यांचा मेसेज आलाय.’’ जयच्या शाळेत उद्या विज्ञान प्रदर्शन होतं. वर्गातील मुलांनी गट बनवून वेगवेगळ्या विषयांवर प्रॉजेक्ट तयार करून सगळ्यांना त्याबद्दल माहिती सांगायची असं ठरलं होतं. जयला लहानपणापासून चारचाकी गाडय़ांबद्दल प्रचंड उत्सुकता होती. कुठलीही गाडी- मग ती कार असो.. की जीप असो की ट्रक असो.. तिच्याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्याची प्रचंड धडपड चाले. जसं की, ती गाडी कुठल्या कंपनीनं बनवली, केव्हा बनवली, कशावर चालते, किती धावू शकते.. असे असंख्य प्रश्न त्याला पडायचे आणि त्याची उत्तरे मिळेपर्यंत तो स्वस्थ बसत नसे. त्याचे खेळण्याचे कपाट फक्त आणि फक्त वेगवेगळ्या गाडय़ांनी ओसंडून चालले होते. आपल्या प्रॉजेक्टसाठी त्यानं सोलार एनर्जीवर चालणाऱ्या गाडय़ांचा विषय निवडला होता. याला साथ होती मोटार गाडय़ांबद्दलचं कुतूहल असणाऱ्या त्याच्या खासमखास मित्राची- आर्यनची. गेल्या आठवडय़ापासून दोघांनी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून म्हणजे मिठाईचा रिकामा खोका, बाटल्यांची झाकणं, तार, रंगीत कागद वगैरे वस्तू वापरून एक छानशी चारचाकी गाडी तयार केली होती. छोटंसं सोलार पॅनल आणि चिमुकली मोटर अशा सोलार किटच्या साहाय्याने त्यांची गाडी प्रॉजेक्टमधे सर्वाना चक्क चालवून दाखवायची त्यांची आयडिया होती. त्यासाठी आजूबाजूला बाजारात त्यांनी अशा सोलार किटचा खूप शोध घेतला, पण तसं सोलार किट कुठेच मिळालं नाही. मुलांचे हिरमुसलेले चेहरे पाहून आईनं ऑनलाइनवर सोलार किट मिळतंय का पाहिलं आणि ते मिळतंय म्हटल्यावर ताबडतोब घरी मागवलंसुद्धा. तोच सोलार पॅनल आता एकदाचा आला की ते दोघं आधी घरी ती गाडी चालवून बघणार होते. आपलं प्रॉजेक्ट सगळ्यात भारी होणार याची त्या दोघांना खात्रीच होती.

शेजारच्या आज्जींची तब्येत विचारायला आई थोडा वेळ तिथं गेली आणि दार बंद करताना जयला आईचा मोबाइल दिसला. काल संध्याकाळी मोबाइलवर गेम खेळताना त्याची लेव्हल अर्धवटच राहिली, कारण आईनं तेव्हा त्याला घडय़ाळ दाखवले हो.. कारण अर्धा तासच त्याला मोबाइल वापरायला मुभा होती. तरीही नेटानं त्यानं थोडा मस्का मारायचा प्रयत्न केला. पण बाबानंसुद्धा आईप्रमाणेच मोबाइल बंद करायला सुचवलं आणि त्याचं लक्ष वळवायला त्याच्या ऑफिसातल्या काहीतरी गमती सांगायला स्वत:जवळ बोलावलं. अखेरीस नाईलाजानं.. नाराजीनं त्यानं मोबाइल ठेवून दिला होता. पण गेमची ती लेव्हल पूर्ण करायची संधी आत्ता मात्र त्याच्यासमोर चालून आली होती. आई नेमकी शेजारच्या आजींकडे.. बाबा ऑफिसात आणि जयच्या समोर रिकामा वेळ आणि आईचा मोबाइल.. झालं, एका झटक्यात त्यानं मोबाइलवरचा कालचा गेम उघडला आणि खेळायला सुरुवात केली. हा हा म्हणता कालची लेव्हल पूर्ण झाली त्याबरोबर उत्साहानं त्यानं दुसरी लेव्हल खेळायला सुरुवात केली. इतक्यात फोनवर कुठला तरी अनोळखी नंबर दिसला. अनोळखी नंबर दिसला तर तो फोन घ्यायचा नाही हे माहीत असल्यानं त्यानं तिकडे दुर्लक्ष करत खेळायला सुरुवात केली. पण पुन्हा थोडय़ा वेळानं मगाच्याच नंबरवरून फोन आला. पुन्हा तिकडे दुर्लक्ष करत जयनं नंतरची लेव्हल पार केली. १० मिनिटांनी पुन्हा एकदा त्याच नंबरवरून फोन वाजला. एकाच नंबरवरून सारखा फोन येतोय म्हटल्यावर फोन घ्यावा का, असा प्रश्न मिनिटभरासाठी जयला पडला, पण आई यायच्या आत जमतील तेवढय़ा लेव्हल्स पूर्ण करायच्या कल्पनेनं त्याला जाम पछाडलं होतं म्हणून त्यानं तिसऱ्यांदा आलेल्या फोनकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि गेममधे डोकं घातलं. पुढची लेव्हल पूर्ण व्हायला आणि आई घरात शिरायला एकच गाठ पडली. गुपचूप मोबाइल टेबलावर ठेवून जय आतल्या खोलीत गेला.

थोडय़ा वेळानं बाहेर आईचा फोनवर कुणाशी तरी वैतागून बोलण्याचा आवाज येत होता. पाठोपाठ चिडक्या आवाजातली आईची हाक ऐकून जय बाहेर आला. ‘‘जय, मला सांग मी आजींकडे गेले तेव्हा माझा फोन वाजला होता ना? तू मला बोलावलं का नाहीस? काय करत होतास तू? तुला माहितेय का.. काय गोंधळ झालाय तो? तुझं सोलार किट घेऊन त्या कंपनीचा माणूस इथं जवळ आला होता. त्याला पत्ता नीट समजत नव्हता म्हणून त्याने एकदा नाही .. तीन वेळा मला फोन केला. पण उचलला नाही म्हणून तो पार्सल घेऊन परत गेला. आता त्यांचा मेसेज आला म्हणून मला समजलं. आता उद्या दुपारनंतर आणून देणार म्हणतात.. आपल्याला तर ते किट सकाळी शाळेत न्यायचंय. इतके वेळा फोन वाजल्यावर मला आणून द्यायचास ना तिकडे फोन.. कशात एवढा बिझी होतास सांग ना?’’ आई खूप म्हणजे खूपच वैतागली होती. जयच्या डोक्यात आता नीटच प्रकाश पडला.. बापरे.. गेम खेळताना वाजणारा तो फोन आपल्याच कामासंबंधी होता तर.. आता आपल्या प्रॉजेक्टचा फज्जा उडणार लक्षात आल्यावर जयला तर एकदम रडूच यायला लागलं. मुसमुसत आईच्या ओढणीत तोंड खुपसत त्यानं सगळं खरं खरं काय ते सांगून टाकलं. पण आता खूप उशीर झाला होता. मोबाइल गेमच्या वेडापायी त्याच्या मेहनतीनं केलेल्या प्रॉजेक्टमधली मज्जाच निघून गेली होती.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal fuzzy of the project solar kit science project amy
Show comments