डॉ. राधिका विंझे
शाळेत आपण विज्ञानाच्या तासाला विविध गोष्टी शिकतो. ऋतुचक्र, ज्वालामुखी, चांद्रयान, इ.विषयी आपण जाणून घेतो, पण त्याचबरोबर आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विज्ञानाची तत्त्वं सापडतात. बर्फ, पाणी, वाफ यांतून पदार्थाच्या स्थायू, द्रव, वायू अवस्थांचं उदाहरण दिसतं. स्वयंपाकघरात विविध मसाले वापरून पदार्थ शिजवताना त्यात घडणाऱ्या रासायनिक क्रिया अनुभवायला मिळतात.
बॅडमिंटन खेळताना वाऱ्याच्या दिशेने फूल भिरकावलं की लांब जातं, पण ते विरुद्ध दिशेला भिरकावण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. उंचावरून खाली टाकलेला चेंडू पुन्हा उसळी मारतो. शाळेतून येताना पावसात भिजलो की ओलं दप्तर अचानक जास्त जड वाटू लागतं. या आणि अशा सहज घडणाऱ्या गोष्टींतून मनात कुतूहल निर्माण होतं आणि प्रश्न पडतो, हे ज्यामुळे होतंय, ते काय असतं?
हेही वाचा : बालमैफल : मी… अनादी, अनंत!
विज्ञानात एखाद्या संकल्पनेचा उगम कसा होतो, त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यात वापर कसा केला जातो, तो वापर करताना त्यात वेळोवेळी सुधारणा कशा केल्या जातात हे जाणून घेताना आपल्याला पाठ्यपुस्तकातल्या संकल्पनांची नव्याने ओळख होते. मग ते फक्त पुस्तकी ज्ञान न राहता त्यावर विचार केला, त्यातला कार्यकारणभाव शोधला की नवीन काही तरी समजल्याचा आनंद होतोच, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठीही मदत होते.
‘ते काय असतं?’ या सदरात आपण अशाच काही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, त्यांच्या शोधाची कहाणी, प्रक्रिया आणि त्यांचा आत्ताच्या जगातील उपयोग याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग, विज्ञानाच्या या सफारीसाठी तयार होऊ या!