-अलकनंदा पाध्ये
जयकडे मिळालेल्या दूधपावावर ताव मारून झाल्यावर आपल्या छोट्याशा पंजानं मिशा आणि तोंड पुसत चेरीनं झक्कास आळस दिला आणि धिम्या पावलांनी ती वॉचमनकाकाच्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसली. पुढचे दोन पाय ताणून डोळे किलकिले करून तिनं आजूबाजूला चॉको दिसतोय का बघितलं, पण तो काही दिसला नाही. आजकाल तो सोसायटीच्या कंपाऊंडबाहेरही फारच भटकायचा, त्यामुळे चेरीला त्याचा खूपदा रागही यायचा. जय आणि त्याचे दोस्त केतकी, आर्यन मोकळे असले की तिच्याशी खेळायचे. एरवी चॉकोशिवाय तिच्याशी खेळायला कुणी नव्हतेच. पुण्यातल्या गारठ्यात अंगावर पडणाऱ्या कोवळ्या उन्हात बसल्यावर चेरीला डुलकी लागली. मासे घेऊन येणाऱ्या कोळणीला अजून बराच अवकाश होता. पण एका अख्ख्या माशावर एकटीच ताव मारतेय असं मस्त स्वप्न ती बघत होती. इतक्यात खुसपुस ऐकून तिनं कान टवकारले. बघते तर… चॉको तिला खेळायला बोलावत होता. एवढं छान स्वप्न तोडल्यामुळे तिला चॉकोचा खूप रागच आला होता. सोसायटीतल्या गाड्या धुतल्यानंतर साचलेल्या पाण्यात नाचण पक्षी रोजरोज येऊन उड्या मारायचे, कलकलाट करायचे. आजही त्यांचं हुंदडणं पाहून चेरी-चॉकोला खूप राग आला. पंखाचे फलकारे पसरून नाचणाऱ्यांच्या अंगावर चेरी चिडून धावून गेली आणि तिच्या पाठोपाठ चॉकोसुद्धा. पक्षी भुर्रकन् उडून जायचे आणि नंतर पुन्हा पाण्यात येऊन बसायचे. बराच वेळ त्यांच्याबरोबर पकडापकडीचे प्रकार झाल्यावर पक्षी एकदाचे उडून गेले. मात्र त्या सगळ्या प्रकारात थोडी भिजलेली चेरी जयच्या गाडीच्या बॉनेटमध्ये शिरली. पाठोपाठ चॉकोही तिच्या शेजारी येऊन बसला. एवढ्या धावपळीनं दोघंही दमून गेले होते.
‘‘छान आहे ना ही जागा? आपल्याला लपायला आणि इथं थंडीपण वाजत नाहीये.’’ चॉको म्हणाला. त्यावर चेरी काही बोलणार तोच बाजूच्या मोठ्या काळ्या यंत्रातून काहीतरी आवाज सुरू झाला. त्यांना काहीतरी विचित्र जाणवायला लागलं.
हेही वाचा…बालमैफल : कासवाची हुशारी
‘‘काहीतरी फिरतंय असं वाटतंय कारे चॉको?’’ चेरीनं घाबरून विचारलं. त्यानं मुंडी हलवली. दोघांनी माना इकडेतिकडे करून खाली उडी मारायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आजूबाजूच्या विचित्र आवाज करणाऱ्या गरम हवा सोडणाऱ्या यंत्रातून त्यांना बाहेर पळायला त्याक्षणी कुठंही जागाही नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ती गाडी आता चालू झालीय आणि ते दोघं त्या गाडीतून कुठंतरी चाललेत. गाडी थांबेपर्यंत त्यांना इंजिनाचे आवाज सहन करत फारशी हालचाल न करता बसून राहावे लागणार आहे.
‘‘ए चॉको, कुठे चाललोय रे आपण? मला खूप भीती वाटतेय. आपल्या जयची आठवण येतेय रे मला.’’ रडवेल्या सुरात चेरी म्हणाली.
‘‘हो ना ग. मलापण… छे… आपण उगाच तिथं लपायला गेलो ग.’’ चॉकोने दुजोरा दिला. गाडी थांबायची वाट पाहात दोघे एकमेकांना घट्ट चिकटून बसले. त्या काळ्या इंजिनातून काहीतरी घाण आपल्या अंगावर पडतेय असं वाटून चेरी-चॉको पुन्हापुन्हा आपलं अंग जिभेने चाटताना दमून गेले. यंत्रातून येणारी गरम हवा नकोशी वाटत होती. भूकही लागली होती. जय कंपनीची आठवण काढता काढता दोघे पुन्हा झोपून गेले.
हेही वाचा…सुखाचे हॅश टॅग : मनाची परीक्षा
‘‘अरे वा… कमाल आहे… विमानाच्या वेगाने आलास की काय?’’ कुणाच्या तरी बोलण्याने चेरी जागी झाली. एवढ्यात ‘‘हो आज वाटेत ट्राफिक अजिबातच नाही लागलं म्हणून लवकर पोचलो.’’ चेरीनं जयच्या बाबांचा आवाज ओळखला. चॉकोसुद्धा आवाजानं जागा झाला. गाडी थांबलीय आणि बाहेर जयचे बाबाच आहेत म्हटल्यावर दोघांनी खूश होऊन एकमेकांना हायफाय केलं आणि टुणकन् खाली उड्या मारल्या. त्याबरोबर ‘‘आईशप्पथ… मामा हे बघ कोण उतरलं गाडीच्या बॉनेटमधून?’’ म्हणत आयुषने- जयच्या आतेभावाने चॉको-चेरीला उचलायचा प्रयत्न केला. ‘‘अरेच्चा… बॉनेटमध्ये? कमाल आहे, तरीच मला समजलं नाही.’’ जयचे बाबा म्हणाले. तरीही त्यानं बॉनेट उघडून दोघं कुठे सुरक्षित बसले असतील याचा अंदाज घेतला. गाडीच्या बॉनेटमधून गुपचूपपणे पुण्याहून देवगडला पोचलेल्या दोन साहसवीरांना बघायला आयुषच्या अंगणात बरीच गर्दी जमली. त्यांच्या प्रवासावर बऱ्याच उलटसुलट चर्चा होऊन अखेर दोन्ही पाहुणे सुखरूप आल्याबद्दल सर्वांनी देवाचे आभार मानले.
‘‘अरे, यांना भूक लागली असेल रे, किती तासाचे उपाशी असतील बिचारे,’’ असं म्हणत आयुषच्या आईनं अंगणात मोठ्ठे वाडगे भरून दुधात पोळ्या कुस्करून ठेवलेल्या पाहून चेरी-चॉको आयुषच्या हातातून निसटून वाडग्याकडे पळाले.
‘‘इथं आलो म्हणून वाचलो ग चेरी, नाहीतर काय झालं असतं गं आपलं? बापरे.’’ चॉको खाताखाता चेरीजवळ पुटपुटला.
‘‘हो ना… आणि हा आयुष आपल्या जयसारखाच आहे ना रे. मला खूप आवडला. आणि यांचं घरपण छान दिसतंय.’’ चेरी म्हणाली. वाडगे चाटून पुसून स्वच्छ करून मिशा पुसत असतानाच त्यांच्यासमोर आयुषनं आणखी एका माऊ पिलू ठेवलं आणि म्हणाला, ‘‘चिनू, हे बघ आपल्याकडे पुण्याचे पाहुणे आलेत. शेकहँड कर त्यांना.’’ चिनू, चेरी आणि चॉको तिघेही एकमेकांकडे निरखून फुगवलेल्या शेपट्या उंचावून थोडा वेळ बघत राहिले. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि दोन कानांच्यामधे काळा टिळा असलेली चिनू दोघांनाही आवडली.
हेही वाचा…बालमैफल : नीट कान देऊन ऐक!
‘‘काय रे, करायची का दोस्ती?’’ चेरीनं चॉकोला विचारलं. चॉकोनंही डोळे मिटून मान डोलावली. त्याबरोबर चेरीनं म्यँव म्हणत चिनूला सलामी दिली आणि चिनूनेसुद्धा म्यँव म्हणत दोघांना छान प्रतिसाद दिला. ते पाहून ‘‘मामा, आता तू या दोघांना पुण्याला कसा घेऊन जाशील? त्यापेक्षा त्यांना इथंच राहू दे की. आमच्या चिनूबरोबर ते छान राहतील आत्ताच बघ त्यांची कशी दोस्ती जमलीय. चालेल ना आई?’’ आयुषनं आईकडे पाहिलं.
हेही वाचा…बालमैफल : मांजरीचं प्रेम..
‘‘दादा, खरंच तुला त्यांना परत इथून न्यायचा त्रास वाचेल. शिवाय आपल्याकडे गायी आहेत, त्यामुळे दुधदुभत्याची कमी नाही. तुमच्यासारखा जागेचाही प्रश्न नाही. फक्त जयला मात्र विचारून घे.’’ आई म्हणाली. तोवर आयुषनं जयला व्हिडीओ कॉल करून चेरी-चॉकोची सहसकथा सांगून त्यांना देवगडलाच ठेवण्यासाठी मस्का मारायला लागला. साहसकथा ऐकून जयकडे सगळे थक्क झाले. पण दोघे सुखरूप असल्यामुळे हायसं वाटलं. देवगडला चेरी-चॉकोची खाण्यापिण्याची चंगळ होणार याची खात्री होतीच, फक्त आता ते रोज भेटणार नाहीत या विचाराने जय थोडा बेचैन झाला. पण चेरी-चॉको-चिनूला अंगणात एकत्र खेळताना बघून त्यांना देवगडलाच ठेवायला अखेर जय राजी झाला.
alaknanda263@yahoo.com