रोहनच्या मामाचं लग्न होतं त्यामुळे आठ दिवस सगळ्यांची चैन होती. आज लग्नाचं सूप वाजल्यामुळे सगळे घराकडे परतत होते. गाडीत बसणार एवढ्यात रोहनला तहान लागली. ‘‘आई, पाणी दे ना.’’ रोहनने आईकडे मोर्चा वळवला. आई आधीच खूप दमली होती. ‘‘जा घरात जाऊन पाणी पिऊन ये पटकन.’’ आईनं सांगताच रोहन घरातून छोटी पाण्याची बाटली घेऊन आला. घोटभर पाणी प्यायला आणि ‘‘आई ही बाटली ठेव,’’ म्हणत घाईघाईने ड्रायव्हरशेजारी बसला. दुसरे काही उद्याोग सुचले नाही की ‘पाणी’ हे रोहनचं नाटक आईला माहिती होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘रोहन पाण्याची बाटली ठेव तुझ्याजवळ. पुन्हा लागेल तुला.’’ चुळबुळ्या रोहनला बाटली सांभाळायची नव्हती. त्यानं बाटलीतील पाणी ओतून टाकण्याचा खेळ केला आणि बाटली फेकून दिली. शांतपणे बसून राहिलेल्या आजीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्या वेळी ती काही बोलली नाही इतकंच. दोन-चार दिवसांनी शाळेतून आल्यावर आजी आणि रोहनच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!

आजी म्हणाली, ‘‘रोहन, तुला एक गोष्ट सांगायची आहे कधीपासून, ये आत्ताच सांगते.’’
रोहन उड्या मारत आजीच्या मांडीवरच येऊन बसला. ‘‘अरे, परवा मी भंगार गोळा करणाऱ्या बाईला पाहिलं.’’ ‘मग त्यात काय विशेष’ असे भाव रोहनच्या चेहऱ्यावर उमटले होते.

‘‘अरे, तिच्या पोत्यातून पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढीग काढला तिनं.’’
‘‘रिकाम्या बाटल्या टाकूनच द्यायच्या असतात ना आजी.’’ रोहन पुटपुटला.

‘‘हो रे, तिचं ते कामच होतं, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायचं. ते तिनं केलं. ते करताना तिच्या लक्षात आलं की त्या प्रत्येक बाटलीत थोडं थोडं पाणी आहे. तू ओतलंस, तसं तिनं तिथंच ओतून टाकलं असतं तरी चाललं असतं; पण तिनं ते रस्त्यावर ओतून दिलं नाही.’’
‘‘काय केलं आजी तिनं?’’ रोहन लक्ष देऊन ऐकू लागला.

हेही वाचा…बालमैफल: क्रांतीचे प्रतीक

‘‘तिनं आजूबाजूच्या कुंड्यांमधील रोपं, झाडं यांच्या मुळाशी एकेक बाटली रिकामी केली. दुसऱ्याला काही तरी खाऊ देताना कौतुकाचा, आनंदाचा भाव असतो ना चेहऱ्यावर, तसाच भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. झाडांना तिनं पाणी पाजलं. पाणी म्हणजे जीवन. जणू त्या हरित सृष्टीला जीवनच बहाल केलं. त्यासाठी आपला वेळ दिला. वाढीव कामच तिनं केलं- तेही स्वत: अर्धपोटी असताना. या हिरव्या सोयऱ्यांची तिनं काळजी घेतली. त्यांना त्यांचा खाऊ दिला आणि हे करताना पाण्याचा अपव्यय टाळला. ते फुकट जाऊ दिलं नाही. पाण्याचं महत्त्व तिनं ओळखलं होतं. पाणी वाचवताना झाडंही वाचवली होती. ही जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? खरं तर ती बाई अशिक्षित, निरक्षर तिला वर्तमानपत्र वाचता येत नाही. ‘जलसाक्षरता’ हा शब्दही तिला माहीत नाही. तिला कोणीही पाण्याचं महत्त्व सांगितलेलं नाही. पाऊस कमी पडलाय, तलावांमधील पाण्याची पातळी खाली घसरलेली आहेत, हेही तिला माहीत नाही. तरी ‘विवेका’नं तिनं ही गोष्ट केली. खरं तर आपल्यासारख्या सुशिक्षितांपुढे नकळत आदर्श उभा केला आहे. बरोबर बोलते आहे ना मी रोहनशेठ. आजीनं हळूच टपली मारल्यावर रोहन उभा राहिला.

हेही वाचा…बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

‘‘आजी माझं थोडं चुकलं बरं का! मी पुन्हा असं पाणी ओतून देणार नाही.’’

आजीचा हेतू साध्य झाला होता.

suchitrasathe52@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal story for kids of water literacy its importance and save water message psg
Show comments