परीला पाळणाघरातून आणायला आज बाबा आला होता. बाबाला बघून परीनं आनंदानं ना उडी मारली ना ‘बाबा’ म्हणून मोठ्यानं हाक मारली. तिनं सरळ आपल्या दोन्ही बॅगा उचलल्या व बाबाकडे चालत आली.
‘‘परी बाय…’’ असं म्हणत संचितनं टाटा केला, पण परी रागात होती. तिनं त्याच्याकडे रागानं कटाक्ष टाकला व कुणालाही बाय न करताच पाळणाघरातून बाहेर येऊन जिना उतरू लागली.
बाबांनी पाळणाघरवाल्या काकूंचा घाईनं निरोप घेतला व ते धावत परीजवळ पोहोचले. तिच्याकडून दोन्ही बॅगा घेऊन चालता चालता विचारलं, ‘‘आज काकूंनापण टाटा नाही… एवढा कसला राग आला आहे आमच्या परीराणीला? काकू रागवल्या का तुझ्यावर?’’
हेही वाचा…बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड
‘‘काकू माझ्यावर कधीच रागवत नाहीत. मी गुड गर्ल आहे माहिती आहे ना!’’ बाबाकडे रोखून बघत परी म्हणाली.
‘‘मग कुणाशी भांडणवगैरे…’’
‘‘मी भांडकुदळ नाहीए बाबा.’’ त्रासिक नजरेनं परीनं उत्त्तर दिलं.
‘‘अरे हो… तू तर गुणी बाळ. मग…’’
‘‘तो नवीन आलेला संचित आहे ना?’’
‘‘तो पुण्याहून आलेला?’’
‘‘हो, तो मला चक्क वेड्यात काढत होता.’’
‘‘का बरं?’’
‘‘आधी मला सांग, आपण ३१ डिसेंबर का साजरा करतो?’’
‘‘कारण त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन वर्ष सुरू होतं.’’
‘‘म्हणजे १ जानेवारीला आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो ना?’’
‘‘हो.’’
‘‘मी त्या संचितला हेच सांगत होते. तर मला म्हणाला की, नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतं आहे. तो सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होता. आता मला सांगा उद्या १ जानेवारी आहे का?’’
‘‘नाही.’’
‘‘मी त्याला तेच सांगत होते. तर तो मला वेड्यात काढत होता. सगळ्या मुलांना सांगतो की परीला एवढंही माहीत नाही. मग मला राग आला. मी कट्टी घेतली त्याच्याशी.’’
‘‘परी, १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं ते इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आणि गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होतं ते मराठी कॅलेंडरप्रमाणे.’’
हेही वाचा…बालमैफल : चेरीचॉकोचा साहसी प्रवास
‘‘पण आपण तर इंग्रजी महिनेच वापरतो ना.’’
‘‘बरोबर आहे. आपण दैनंदिन व्यवहारासाठी इंग्रजी महिने जास्त विचारात घेत असलो, तरी आपण मराठी महिन्यांचा वापर करत असतोच. सगळे सण आपण मराठी महिन्यानुसारच साजरे करतो. खरं तर आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच सुरू होतं.’’
‘‘ते कसं काय बाबा?’’
‘‘गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणजे शालिवाहन राजा. एका कुंभाराच्या पोटी जन्माला आलेल्या या राजाने मातीचे सहा हजार सैन्य बनवून त्यात प्राण फुंकले व बलाढ्य अशा शकांचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन राजानं नवीन कालगणना सुरू केली. तेव्हापासून शालिवाहन शक सुरू झालं व आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली.
याच दिवशी ब्रह्मदेवानं विश्वाची निर्मिती केली असंही मानलं जातं. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरीत गुढ्या उभारल्या होत्या. अशा अनेक पौराणिक कथा गुढीपाडव्याशी म्हणजेच हिंदूंच्या नवीन वर्षारंभाशी जोडलेल्या आहेत.
हेही वाचा…बालमैफल : कासवाची हुशारी
तुला माहीत आहे परी, शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, या पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटायला सुरुवात होते. वृक्षवल्ली टवटवीत दिसून सृष्टीत नवचैतन्य निर्माण व्हायला लागतं. वसंत ऋतूचं आगमन होतं. शेतकरी खरीप पिकासाठी आपले शेत तयार करायला सुरुवात करतो. आपल्या घरच्या सुखाचं, समृद्धीचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण दारात गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने करतो. म्हणूनच सगळे गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.’’
‘‘अच्छा… उद्या गुढीपाडवा आहे म्हणूनच संचित सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होता, बरोबर ना! ’’
‘‘अगदी बरोबर.’’
बापलेक बोलत बोलत त्यांच्या घराच्या दारात आले. आईनं दरवाजा उघडाच ठेवला होता. परी चप्पल काढून धावत घरात आली. आई गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य पिशवीतून बाहेर काढत होती. त्यात आंब्याच्या डहाळ्या, कडुलिंब, कैरी, झेंडूच्या फुलांचं तोरण, साखरेची माळ अशा बऱ्याच गोष्टी होत्या.
हेही वाचा…सुखाचे हॅश टॅग : मनाची परीक्षा
‘‘आई, उद्याच्या नवीन वर्षाची तयारी ना…’’
‘‘हो गं राणी…’’ प्रेमानं परीचा गालगुच्च्या घेत आई म्हणाली.
‘‘बाबा, मी उद्या संचितला आणि सगळ्या मित्र-मैत्रिणींना फोन करून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नक्की देणार!’’
बाबानं हातातल्या बॅगा ठेवत खुर्चीत बसत आपल्या उजव्या हाताचा अंगठा उंचावून हसून ‘ओके’ असं दाखवलं; आणि परीनंही हसत हसत आपला अंगठा उंचावून ‘ओके’ म्हणून दर्शविला…
mukatkar@gmail.com